‘डीपी वर्ल्ड’सारखे नाव सामान्यजनांना माहीतही नसते- त्यापेक्षा, चप्पलबुटांच्याही पाचसहा कंपन्यांची नावे कुणालाही सांगता येतील… पण आज जगात सुरू असणार्या व्यापारी वाहतुकीपैकी १० टक्के हिस्सा ‘डीपी वर्ल्ड’ या एकट्या कंपनीकडे आहे. एकंदर १० कोटी २० लाख ‘टीईयू’ (ट्वेन्टी फीट इक्विव्हॅलंट युनिट- म्हणजे वीस-वीस फूट लांबीच्या कंटेनरएवढी क्षमता) आणि एका जहाजात १० हजार ते २० हजार कंटेनर असल्याने साहजिकच पाच ते दहा हजार जहाजांपर्यंत या कंपनीचा व्याप वाढलेला आहे. भारतासह ८० हून अधिक देशांत कार्यरत असलेल्या या कंपनीचे जागतिक मुख्याधिकारी, हे पद नारायण यांच्याकडे आले आहे.
युवराज नारायण हे भारतीय वंशाचे चार्टर्ड अकाउंटंट आहेत डीपी वर्ल्डमध्ये २००४ सालापासून- म्हणजे दोन दशकांहून अधिक काळ काम केले आहे. ते २००५ मध्ये ग्रूप चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून नियुक्त झाले. तेव्हापासूनच्या गेल्या काही वर्षांत, नारायण यांनी कंपनीच्या आर्थिक धोरणाला आकार देण्यात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विस्तार करण्यात मध्यवर्ती भूमिका बजावली. या जगडव्याळ कंपनीचे आर्थिक व्यवस्थापन, भांडवल रचना, कॉर्पोरेट वित्त आदींवर देखरेखीचे काम त्यांनी सांभाळले. याच समूहाचे ते उपप्रमुख (डेप्युटी सीईओ) झाले.
डीपी वर्ल्डमध्ये येण्यापूर्वी, नारायण यांनी बँकिंग क्षेत्रातही वरिष्ठ पदांवर काम केले. एएनझेड बँक समूहात दक्षिण आशियासाठी प्रकल्प वित्तपुरवठा प्रमुख म्हणून काम केल्यानंतर ओमानमधील सलालाह या जलव्यापार कंपनीत मुख्य वित्तीय अधिकारी या पदावर ते होते. तिथून डीपी वर्ल्डमध्ये आले आणि दुबईवासी झाले. भारतात, दिल्लीच्या अतिउच्चभ्रू ‘स्टीफन्स कॉलेज’मधून अर्थशास्त्र विषयात पदवी मिळवतानाच त्यांनी सनदी लेखापाल होण्याचा चंग बांधला होता. तो पंचविशी गाठताना पूर्णही झाला आणि वयाच्या २८ व्या वर्षी (१९८४ साली) ते ‘एएनझेड’ समूहात वरिष्ठपदी आले.
नारायण यांना प्रामुख्याने श्रेय दिले जाते ते, ‘डीपी वर्ल्ड’साठी १.७५ अब्ज डॉलरच्या ३० वर्षं मुदतीच्या रोख्यांची यशस्वी विक्री आणि नंतर याच कंपनीची २१ अब्ज डॉलर मूल्याची प्राथमिक समभागविक्री (आयपीओ) लंडन स्टॉक एक्स्चेंजमध्येही करून दाखवल्याचे. मात्र कोविडकाळ आणि त्यानंतरचा ‘आत्मनिर्भर’, ‘ग्रेट अगेन’ अशा स्वरूपाच्या घोषणांचा काळ या दोहोंचे भान त्यांना आहे. अशा काळात जागतिक जलव्यापारानेही वाढीचे नवनवीन मार्ग शोधले पाहिजेत, असे त्यांचे मत आहे.
देशांतर्गत जलमार्गांचा विकास आणि त्याद्वारे जलव्यापारात वाढ, हा असा एक मार्ग असू शकतो.

