भारत आणि चीन यांच्यातला सीमातंटा १९४७ च्या आधीच्या १०० वर्षांतही कसकसा वाढत होता? आखाती युद्धांच्या काळातल्या कागदपत्रांचा अभ्यास या युद्धांबद्दल काय सांगेल? रशियाचे ब्रेझनेव्ह यांची आशियाई शांतता योजना दुर्लक्षित राहिली का आणि असल्यास का? या प्रश्नांची साधार उत्तरे शोधणारी (प्रत्येकी किमान ३०० पानी) पुस्तकेसुद्धा ए. जी. नूरानी यांनी लिहिली आहेत. तरीही त्यांना ‘राज्यघटनातज्ज्ञ’, ‘काश्मीरविषयक जाणकार’ आणि बहुसंख्यावादी जातीयवादाचे अभ्यासक म्हणूनच अधिक ओळखले जाते. याचे कारण, त्या विषयांवर त्यांनी आणखी अधिक पुस्तके लिहिली. काश्मीरप्रश्नाविषयी तीन, तर अयोध्या वादाविषयीचे दोन खंड, शिवाय रा. स्व. संघ व सावरकरांबद्दलची पुस्तके… ‘अनुच्छेद ३७०’च्या उगमापासून प्राथमिक वाटचालीपर्यंतचा सांविधानिक इतिहास, हेही त्यांचे ग्रंथ.

निष्णात वकील तर ते होतेच. परंतु त्यांच्या विक्षिप्तपणाचे किस्सेही अनेक सांगितले जात. दिल्लीच्या इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये ३८ क्रमांकाचीच खोली हवी, मुंबई उच्च न्यायालयाच्या उपाहारगृहातले अमुकच टेबल हवे, असे क्षुल्लक वाटणारे आग्रह ते धरत किंवा मी नमाज पढीन किंवा न पढीन- पण नमाजच्या वेळी मला भेटायला कोणी येऊ नये असा पवित्रा ठाम युक्तिवादाच्या पातळीवर घेत… इत्यादी! बुद्धीचा अहंकार हवाच, कारण तीच एक देणगी मानवाला लाभली आहे, अशा प्रकारच्या त्यांच्या विश्वासातून काहीजण दुखावलेही गेले असतील. मात्र व्यवहारांत पारदर्शकता, विचारांना नैतिकतेची, सभ्यतेची कसोटी यासारखे सज्जनपणाचे निकष त्यांनी नेहमी पाळले. या ‘मन सुद्ध तुझं…’ प्रवृत्तीमुळेच, पाकिस्तानी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांची मुलाखत (भारतीय नियतकालिकासाठी) घेतानाच ‘मुशर्रफ व अन्य दोन सहकारी चालतील पण १० मिनिटे मी व मुशर्रफ यांना एकट्याने संवाद करूदे’ अशी अट ते घालू शकले- ‘हे चौथे इथे नकोत- त्यांना निघूदे इथून’ हा ऐन मुलाखतीवेळी त्यांचा हेका बिनतोड असल्याने, जन. अश्फाक कयानी (पुढे आयएसआयप्रमुख) यांना खोलीबाहेर जावे लागले!

वयाच्या २३व्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयात उभे राहिलेले अब्दुल गफूर अब्दुल मजीद नूरानी ऊर्फ ‘गफूरभाई’ ३२ व्या वर्षी सर्वोच्च न्यायालयात पोहोचले, ते ‘नेहरूविरोधक काँग्रेसनेत्या’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालविका साराभाई यांनी एका बंदिवान राजकीय नेत्याच्या खटल्यासाठी त्यांचे नाव सुचवल्यामुळे. हा बंदिवान नेता म्हणजे शेख अब्दुल्ला. त्यांच्याशी पुढे नूरानींची मैत्रीच झाली. अब्दुल्ला घराण्याच्याच नव्हे तर काश्मिरींच्या तीन पिढ्यांचा संघर्ष नूरानींनी पाहिला. पण पुस्तके लिहिताना नेहमीच कागदोपत्री भक्कम आधार त्यांनी वापरले! २९ ऑगस्ट रोजी ते निवर्तल्यानंतरही, त्यांचे हे लिखाण मार्गदर्शक ठरेल.