‘एमआय ६’- ब्रिटनची गुप्तहेर संघटना. बाँडपटांत या संस्थेचे सर्वोच्च पद ‘एम’ नामक महिलेने भूषविल्याचे दाखविण्यात आले होते. जुडी डेन्चने हे पात्र साकारले होते. मात्र प्रत्यक्षात या संघटनेच्या ११६ वर्षांच्या इतिहासात कधीही या पदाची धुरा महिलेकडे आली नव्हती. पडद्यावर कधीच घडून गेलेली ही घटना आता वास्तवात उतरणार आहे. एमआय६चे प्रमुख सर रिचर्ड मूर निवृत्त होत असून १ ऑक्टोबरपासून हे पद ब्लेझ मेट्रेवेली भूषविणार आहेत. रशिया, चीन, इराण, उत्तर कोरियासह हुथी बंडखोर आणि अल- कायदासारखी आव्हाने ब्रिटनसमोर उभी असताना करण्यात आलेली ही नियुक्ती ब्लेझ यांची कार्यक्षमता सिद्ध करणारी आहे.
बाँडपटांनी प्रेक्षकांच्या मनातील गुप्तहेरांविषयीच्या प्रतिमेला आकार देण्यात मोठा वाटा उचलला. त्यातील ‘क्यू’ हे तंत्रज्ञानप्रवीण, गॅजेट्सतज्ज्ञ पात्र ब्लेझ यांच्याशी मिळतेजुळते असल्याचे सांगितले जाते. परदेशांतून गुप्त माहिती गोळा करणे, जगभरातील हेरांमध्ये समन्वय साधणे, ब्रिटनची सुरक्षा व्यवस्था मजबूत राहील याची काळजी घेणे, दहशतवादाला आळा घालणे, शत्रुराष्ट्रांचे कट उधळून लावणे आणि सायबर सुरक्षिततेची खातरजमा करून घेणे ही एमआय ६ची जबाबदारी आहे. अमेरिकेत ‘सीआयए’ जी भूमिका पार पाडते, साधारण तीच भूमिका ब्रिटनमध्ये एमआय ६ची आहे.
४७ वर्षांच्या मेट्रेवेली सध्या गुप्तहेर यंत्रणांना आवश्यक तंत्रज्ञानाच्या विकासासाठी काम करणाऱ्या आणि ‘क्यू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विभागाच्या महासंचालक आहेत. गुप्तहेरांची ओळख उघड होऊ नये यासाठीच्या तरतुदी करण्याची जबाबदारी या विभागावर आहे. चीनसारख्या देशांची बायमेट्रिक पाळत निष्प्रभ ठरविण्यासाठी या विभागाच्या माध्यमातून नवनवीन तंत्रे आणि उपकरणे विकसित केली जातात.
ब्रिटनमधील ब्रेन्ट शहरात ब्लेझ यांचा १९७७ साली जन्म झाला. त्यांचे वडील रेडिओलॉजीच्या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि संशोधक होते. ब्लेझ यांनी केम्ब्रिज विद्यापीठातील पेमब्रोक महाविद्यालयातून सामाजिक मानववंशशास्त्राचा अभ्यास केला. त्या १९९९साली प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या. ब्रिटनची देशांतर्गत गुप्तचर संघटना असलेल्या ‘एमआय ५’ मध्ये त्यांनी संचालकपदाला समकक्ष पद भूषविले होते. त्यावेळी ‘डायरेक्टर के’ या सांकेतिक नावाने दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी ब्रिटनमधील हेरगिरीविषयक कायदे कालबाह्य झाल्याची टीका केली होती. व्लादिमीर पुतिन यांचा उल्लेख ‘कल्पनेपलीकडचे वादळ’ अशा शब्दांत केला होता. त्यांनी आपल्या कारकीर्दीचा बराचसा काळ पश्चिम आशिया आणि युरोपात काम केले.
एमआय ६च्या प्रमुखासाठी वापरले जाणारे ‘सी’ हे अक्षर चीफ या पदाचे आद्याक्षर म्हणून वापरले जात असावे, असा गैरसमज होण्याची शक्यता असते. प्रत्यक्षात ब्रिटनच्या सर्वांत पहिल्या गुप्तचर संघटनेच्या प्रमुखपदी रॉयल नेव्हीचे कॅप्टन मॅन्स्फिल्ड कमिंग होते. ते आपल्या आडनावाचे आद्याक्षर असलेल्या ‘सी’ या एकाच अक्षराची स्वाक्षरी करत. तेव्हापासून या पदाशी ‘सी’ हे अक्षर जोडले गेले ते कायमचेच. ब्लेझ यांच्या खांद्यावर पुढील पाच वर्षे ही धुरा राहण्याची शक्यता आहे. ब्रिटिश गुप्तहेर यंत्रणेच्या प्रमुखांचा कार्यकाळ साधारण पाच वर्षांचा असतो. त्यानंतर त्यांच्यापैकी बहुतेक जण सल्लागाराची भूमिका पार पाडतात किंवा खासगी क्षेत्राकडे वळतात.