हावे की, वर्तमानातील घडामोडींच्या पाऊलखुणा इतिहासात कधी उमटल्या होत्या, यात लक्ष घालावे, अशा पेचात सर्वसामान्य माणूस अडकलेला असावा, अशी राजकीय व्यवस्था मजबूत होत आहे. अशा काळात इतिहासकार रा. श्री. मोरवंचीकर यांचे निधन इतिहास, लोकसंस्कृती याविषयीच्या निकोप दृष्टी वाढीमध्ये मोठी पोकळी निर्माण करणारे आहे. मोरवंचीकर यांचा जलसंस्कृती या विषयावरचा अभ्यास असो की, इतिहासातील अर्थशास्त्राचा अभ्यास त्यांच्या विद्यार्थ्यांना नवी दृष्टी देणारा होता. वर्तमान आणि इतिहास याची जोड कशी असावी, याचे उदाहरण म्हणून मोरवंचीकर यांच्याकडे पाहिले जात होते.
इतिहासाचा अभ्यास म्हणजे एक प्रकारचा गुंताच असतो. त्याचे एक टोक पकडून वाचन करावे लागते. पण ते टोक आणि त्या अनुषंगाने लिहिलेली पुस्तके, याची संदर्भसूची म्हणजे रा. श्री. मोरवंचीकर. समजा नाथ संप्रदायाचा इतिहास वाचायचा असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘कानफाटाज्’ हे इंग्रजी पुस्तक मिळवून वाचा, असा सल्ला ते देत. एवढेच नाही, तर त्यात लेखकाने विस्ताराने काय दिले आहे, हेही मोरवंचीकर सांगायचे.
संदर्भ पुस्तके, संशोधन अहवाल जगात या अनुषंगाने सुरू असणारे सध्याचे काम याचा तपशील त्यांच्याकडे असे. तो त्यांनी कधी हातचा राखून ठेवला नाही. इतिहास लोकसंस्कृतीमध्येही कसा दडलेला असतो, याचे विवेचन त्यांच्या बोलण्यात सातत्याने असे. ४० वर्षे इतिहास शिकवणाऱ्या मोरवंचीकर यांचे पैठण या शहरावर विशेष प्रेम. १९७८ मध्ये त्यांनी पैठणचे पुरातत्त्वीय अंगाने केलेले संशोधन पूर्ण करून त्यावर आधारित प्रबंधावर विद्यावाचस्पती ही पदवी मिळवली.
धाराशिव जिल्ह्यातील तेर, भोकरदन आणि पैठण या तीन नगराच्या इतिहासाचे बारकावे तोंडपाठ असणाऱ्या मोरवंचीकर लोकसंस्कृतीवर बोलायचे तेव्हा ते जलसंस्कृतीच्या अंगाने. जगभरातील मानवी संस्कृतीचे जलसंस्कृतीय पुरावे ‘शुष्क नद्यांचे आक्रोश’ या पुस्तकातून मांडले. जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांनी जलसंस्कृतीवर मोरवंचीकर यांनी लिहावे, असे सूचवले होते. पाण्याचे लोकसंस्कृतीतील रंग त्यांनी उलगडून दाखवले आहेत. पैठणवर प्रेम करणाऱ्या या इतिहासकारास नवे तंत्रज्ञान कसे वापरले जावे, हे कळत असे. म्हणून पैठणीतील बुट्ट्याचे फॅशनच्या अंगाने पुस्तक व्हावे, यासाठी ते शेवटपर्यंत कार्यरत होते. कोणत्या विद्यार्थ्यांमध्ये कोणते गुण, वाचनाचा आवाका, यावरून इतिहासातील कोणते टोक त्यांच्या हाती द्यायचे, हे ते ठरवत असावेत. पुरातत्त्वीय दाखले आणि इतिहास याचा भक्कम पुरावा शोधताना त्या ठिकाणची भाषा, लोकसंस्कृतीतून आलेले शब्द याचे उदाहरण ते नेहमी देत. त्यांची १६ हून अधिक पुस्तके ही इतिहासाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन देणारी आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये इतिहास आणि पर्यटन विभागाचे प्रमुख म्हणून काम करणाऱ्या रा. श्री. मोरवंचीकर यांनी दोनशेहून अधिक संशोधन निबंध सादर केले. पैठणीतील आडवे-उभे धागे अर्थात तानेबाने टिपणाऱ्या या इतिहासकाराचा जनसंपर्कही दांडगा होता. त्यातूनच त्यांनी तेर आणि पैठणमधील पुराणवस्तू संग्रहालये उभारण्यासाठी पाठबळ दिले. अर्थशास्त्र असो की, वैद्याकशास्त्र, प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीला तिच्या क्षेत्राच्या इतिहासाविषयी हक्काने मार्ग दाखविणारे व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख मराठवाड्यासह राज्यातील इतिहासप्रेमींमध्ये होती.
