बऱ्याचदा वाईटातून चांगले घडते असे म्हटले जाते, पाय जमिनीवर असलेले उत्तुंग व्यक्तिमत्त्व- रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूहाची धुरा कोणाकडे असा प्रश्न साहजिकच निर्माण झाला. रतन टाटा यांच्यानंतर त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्याकडे टाटा न्यासांच्या अध्यक्षपदाची सूत्रे गेली. टाटा न्यासांचीच टाटा समूहातील कंपन्यांची सूत्रे हाती असलेल्या टाटा सन्समध्ये ६६ टक्क्यांची मालकी आहे. मात्र वर्ष उलटत नाही तोच, नोएल टाटा आणि रतन टाटांचे विश्वासू असलेले विश्वस्त असे न्यासांत दोन गट पडले. यातून टाटा समूहाचा वारसदार पुढे येणाच्या प्रक्रियेला चालना दिली गेली, असे आता म्हणता येईल. भावी नेतृत्व म्हणून नवीन नाव यातून अलगदपणे पटलावर आले आहे. नोएल आणि आलू मिस्त्री यांचा सर्वांत धाकटा मुलगा, नेव्हिल हे टाटा समूहाच्या पुढच्या पिढीचे प्रतिनिधित्व करतील, हे टाटा न्यासांवरील त्यांच्या ताज्या नियुक्तीने सुस्पष्ट झाले आहे.
भारतातील सर्वांत प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबात जन्म होऊन, शांतपणे पण स्थिरपणे नेव्हिल आपली छाप पाडत आहेत. आजवर प्रसिद्धी आणि प्रकाशझोतापासून दूर राहणे हे जाणीवपूर्वक घडले असे नव्हे तर तो त्यांचा स्वाभाविक नैसर्गिक गुणच आहे. लंडनमधील ‘बेयस बिझनेस स्कूल’मधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर, नेव्हिल २०१६ मध्ये टाटा समूहात सामील झाले. त्यांनी त्यांच्या आजी सिमोन टाटा यांनी स्थापन केलेल्या ‘ट्रेंट लिमिटेड’ या ब्रँडेड कपडे, पादत्राणे, अॅक्सेसरीज, वैयक्तिक निगा आणि होम फर्निशिंग यांसारख्या फॅशन आणि लाइफस्टाइल उत्पादनांच्या किरकोळ व्यवसायांत काम सुरू केले. ‘वेस्टसाइड’ (फॅशन), ‘झुडिओ’ (कपडे), ‘उत्सा’ (पारंपरिक भारतीय पोशाख) आणि ‘स्टार बाजार’ (सुपरमार्केट) अशा यशस्वी नाममुद्रा उभ्या केल्या. ‘ट्रेंट’चा उपक्रम असलेल्या ‘झुडिओ’मध्ये जाण्यापूर्वी त्यांनी प्रथम ‘पॅकेज्ड फूड अँड बेव्हरेजेस’ विभागाचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वात, ‘झुडिओ’ भारतातील सर्वांत मोठ्या पोशाख नाममुद्रेमध्ये रूपांतरित झाले. ‘झुडिओ’ला आकार देण्याचे श्रेय नेव्हिल यांना जाते. ‘स्टार बाजार’चे प्रमुख म्हणून २०२४ मध्ये पदभार स्वीकारण्यापूर्वी नेव्हिल यांनी टाटा समूहाच्या ‘ट्रेंट हायपरमार्केट’मध्ये बिगर कार्यकारी संचालक म्हणूनही काम केले.
त्यांचा कामाचा वाढलेला आवाका आणि वाढत्या जबाबदाऱ्या यातून नियोजनपूर्वक केलेली प्रक्रियाच दिसते. अर्थात त्यांच्या कार्याचा अनुभव आणि धोरणात्मक संतुलनही ती प्रतिबिंबित करते.
त्यांच्या व्यावसायिक जीवनापलीकडे, नेव्हिल यांचे कौटुंबिक संबंध भारताच्या औद्याोगिक परिदृश्यात खोलवर रुजले आहेत. त्यांच्या बहिणी, लीआ आणि माया टाटादेखील समूहात सक्रिय आहेत. लीआ ‘इंडियन हॉटेल्स’मध्ये तर माया ‘टाटा डिजिटल’मध्ये काम करते. दिवंगत उद्याोगपती विक्रम किर्लोस्कर यांची मुलगी मानसी किर्लोस्कर यांच्याशी लग्नबंधनात अडकलेले नेव्हिल कौटुंबिक आणि व्यावसायिक पातळीवर समतोल साधून आहेत. आता टाटा न्यासांवर नेव्हिल यांची नियुक्ती होणे हे टाटा समूहाच्या कंपन्यांच्या कारभारात येत्या काळात ते मोठी भूमिका बजावणार असल्याचेच पूर्वसंकेत आहेत. टाटा समूहाच्या वार्षिक कार्यक्रमात नियमित उपस्थिती लावणारे, पिढीजात वारशाचे महत्त्व जाणणारे नेव्हिल यांच्याच हाती हा वारसा येऊ घातला आहे.
