‘मी माझे ऑलिम्पिकचे कांस्यपदक घ्यायला मंचावर उभी राहिले, तेव्हा सुवर्ण आणि रौप्य मिळविलेल्या बाजूच्या दोन्ही चिनी बॅडमिंटनपटू माझ्याकडे पाहत होत्या. माझ्या जागीही चिनी मुलगी असणे अपेक्षित असल्याचे त्यांच्या नजरेतूनच मला जाणवत होते. मग मी गोपी सर, कश्यप, किरण सर, माझे तंदुरुस्ती प्रशिक्षक यांच्याकडे पाहिले, तर त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. ते पाहीपर्यंत माझ्या जाणिवेत हे रुजलेच नव्हते, की मी नेमके काय यश मिळवले आहे…’ बॅडमिंटनमध्ये देशाचे नाव उंचावणारी ‘फुल’राणी असा जिचा लौकिक आहे, त्या सायना नेहवालने निवृत्त होताना जागवलेली ही आठवण.

या अव्वल बॅडमिंटनपटूने २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले, तेव्हा सर्व भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला. तोवर बॅडमिंटनमध्ये कोणाही भारतीयाला ऑलिम्पिक पदक मिळवता आले नव्हते. सायनाने देशाला काय दिले असेल, तर बॅडमिंटनसारख्या वैयक्तिक खेळात भारतातील मुलगे आणि मुलीही जग जिंकू शकतात, हा विश्वास. त्या अर्थाने तिने जिंकलेल्या पदकानंतरच्या पुढच्या दोन ऑलिम्पिक स्पर्धांत – रिओ (२०१६) आणि तोक्योमध्ये (२०२१) पी. व्ही. सिंधूने अनुक्रमे मिळवेली रौप्य आणि कांस्य पदके हे त्याचे एक प्रकारे दृश्य परिणाम.

गेली दोन वर्षे सायना गुडघ्याच्या दुखापतीमुळे बॅडमिंटनपासून दूरच होती. ती सहभागी झालेली अखेरची स्पर्धा – २०२३ मधील ‘सिंगापूर ओपन’. त्यानंतर तिने अधिकृतपणे निवृत्ती जाहीर केली नव्हती, तरी ती आता परत खेळू शकणार नाही, याची जाणीव बॅडमिंटन वर्तुळाला नक्की झाली होती. ‘मी या खेळात माझ्या अटी-शर्तींवर आले, त्याच आधारावर मी त्यातून बाहेर पडीन. तुम्हाला आणखी खेळत राहणे शक्य नसेल, तर समजून घ्यावे, की आता थांबावे;’ इति सायना – अन्य एका मुलाखतीत बोलताना.

सायना मूळची हरियाणाची. वडील कृषी क्षेत्रातील शिक्षकी पेशात. आई राज्य पातळीवरील बॅडमिंटनपटू. वडिलांच्या बदलीमुळे नेहवाल कुटुंब हिस्सारमधून हैदराबादला आले. भाषा अपरिचित, त्यामुळे मित्र-मैत्रिणी फारसे नाहीत. मग सायनाने स्वत:ला बॅडमिंटनमधून व्यक्त करायला सुरुवात केली. आठव्या वर्षी ही सुरुवात छंदातून झाली, पण आईचे स्वप्न होते, की सायनाने राष्ट्रीय स्तरावर चमकावे. पुढे ते सायनाचे झाले आणि लहान वयात तिने ते पूर्णही केले. इंडिया ओपन, इंडोनेशियन ओपन, सिंगापूर ओपनची जेतेपदे, अन्य अनेक स्पर्धांतील अव्वल कामगिरी, अर्जुन व राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार… यशाची यादी खूप मोठी आहे. जागतिक क्रमवारीत पहिले स्थान हा त्याचा कळस.

भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू गोपीचंदने सायनाला घडवले. मधल्या काही कालावधीत विमलकुमार तिचे प्रशिक्षक होते. पण तिची गेलेली लय पुन्हा सापडली, ती गोपीचंदकडे परतून आल्यावरच. सायनाच्या या सर्व प्रवासात तिच्या प्रशिक्षकांबरोबरच तिचा लहानपणीचा मित्र, सहखेळाडू आणि नंतर पती पारुपल्ली कश्यप याचाही मोठा वाटा, ज्याचा उल्लेख सायनाही नम्रपणे करते.

सन २०१८ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकानंतर दुखापतींनी सायनाचा कायम पिच्छा पुरवला, तो थेट परवा निवृत्ती जाहीर करेपर्यंत. गुडघ्याला झालेली दुखापत, वाढते वय यांमुळे तिने थांबण्याचा निर्णय घेतला. चिनी, कोरियन, जपानी स्पर्धकांना आपले बॅडमिंटनपटू हरवू शकतील, असा विश्वास निर्माण झाला तो सायनाने ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवल्यानंतर. तो विश्वास आणि त्यावर घडलेली बॅडमिंटनमधील पुढची पिढी हे खरे सायनाचे यश.