अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवून, वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी हनीफ कुरेशी यांचे निधन झाले. पण तेवढ्या आयुष्यात, त्यातही २०१० पासून पुढल्या फक्त १४ वर्षांत हनीफ यांनी निराळ्या दिशेने भरपूर काम केले! ही निराळी दिशा ‘स्ट्रीट आर्ट’ची. या ‘स्ट्रीट आर्ट’चे ‘रस्त्यावरली कला’ असे भाषांतर तोकडेच ठरेल ते का, हेही हनीफ यांच्या कामातून स्पष्ट होते. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रकारांना बोलावून, त्यांना भारतीय सहायक देऊन त्यांच्याकडून अख्ख्या इमारतींचे बाह्यभाग व्यापणारी मोठमोठी चित्रे करून घेणाऱ्या ‘स्टार्ट’ या संस्थेच्या पाच संस्थापकांपैकी ते एक. या संस्थेने दिल्ली, मुंबई आणि गोव्यातही ‘स्ट्रीट आर्ट फेस्टिव्हल’ सुरू केला. अनेक स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय चित्रकारांना ‘पब्लिक आर्ट’ (लोकांना सहज दिसू शकणारी, सार्वजनिक ठिकाणची कलाकृती) प्रकारात काम करण्याची उमेद दिली. खुद्द हनीफ यांचा ओढा होता तो भारतीय लहानमोठ्या गावा-शहरांत अगदी आता-आतापर्यंत दिसणाऱ्या, हाती रंगवलेल्या दुकान-पाट्या वा जाहिरातींमधल्या ठाम-ठसठशीत अक्षराकारांकडे. ‘ज्यूस सेंटर’, ‘लेडीज टेलर’, ‘चष्मे ही चष्मे’ अशा या पाट्या म्हणा, ट्रकवरली विविधाकारी ‘ओके’ किंवा ‘नॅशनल परमिट’, ‘हॉर्न प्लीज’ ही अक्षरे म्हणा… यांच्या आकारांमध्ये असलेली शिस्त ही त्या-त्या पेण्टरने घडवलेली आहे. म्हणजे जणू एकेका पेण्टराने हाती रंगवलेला एकेक टंक किंवा ‘फॉण्ट’च घडवलेला आहे, असा मुद्दा नुसता मांडून न थांबता हनीफ यांनी ‘हॅण्डपेन्टेडफॉण्ट्स.कॉम’ हा नवोद्याम सुरू केला. हे संकेतस्थळ सध्या बंद आहे, पण इथे ‘पेण्टर किशोर’ किेंवा पेण्टर अमुकतमुक अशा नावांचे ‘फॉण्ट’ (!) उपलब्ध होते. काही मोफत, तर काही ५० डॉलरला विकत- आणि त्यापैकी २५ डॉलर संबंधित पेण्टरचे. संगणकीय टंक-अभिकल्पन (फॉण्ट डिझाइन) हेच आजचे वास्तव असतानाही हा प्रवाहाविरुद्ध पोहण्याचा प्रकार हनीफ करू धजले, याचे अक्षरश: जगभर कौतुक झाले.

तोवर हनीफ हे दिल्लीतल्या एका अमेरिकी जाहिरात कंपनीत कार्यरत होते. बडोदे येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या कला विभागातील पदव्युत्तर पदवी त्यांना उपयुक्त ठरत होती. पण ‘ग्राफिटी’ची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. अचानक ‘डाकू’ या टोपणनावाने भित्तिरंजनकला (ग्राफिटी आर्ट) दिसू लागली, आणि त्या क्षेत्रातही चित्रकारांसाठीच्या अनेक फेलोशिपा त्यांनी मिळवून त्यांनी आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केली- पण ‘डाकू’ म्हणजे नक्की कोण हे गुपितच राहिले आहे. गुजरातमधील तलाजा या आडगावात जन्मलेल्या हनीफ यांच्या उत्कर्षानंतरचा, त्यांच्या कलाविषयक भूमिकांचा कस लागण्याचा काळ सुरू होण्याच्या आतच ते निघून गेले.

Story img Loader