पद्माश्री (१९६८), पद्माभूषण (२००१) आणि पद्माविभूषण (२०१६) या तीन्ही किताबांपेक्षा यामिनी कृष्णमूर्तींना अप्रूप होते ते प्रेक्षकांशी नृत्यातून साधल्या जाणाऱ्या संवादाचे. हा संवाद आपण शैलीदारपणे साधायचा आहे, याची पुरेपूर जाण त्यांना होती. यामिनी कृष्णमूर्तींच्या निधनानंतर ‘भरतनाट्यमला सर्वदूर लोकप्रियता मिळवून देणाऱ्या’ त्या जणू पहिल्याच, अशा प्रकारे त्यांचे कौतुक होताना पाहून मात्र नृत्यरसिकांना बालासरस्वती यांची आठवण होईल! पण फरक असा की, बालासरस्वतींच्या घराण्यात, आई- आजी- पणजी अशा सात पिढ्यांपासून नृत्याची परंपरा होती. घराण्यात अशी परंपरा नसताना भरतनाट्यम शिकून या नृत्यप्रकाराची कीर्ती सर्वदूर पोहोचवणाऱ्या पहिल्या काही नर्तकांपैकी यामिनी या महत्त्वाच्या. भरतनाट्यमच्या रीतसर शिक्षणाची सुरुवात करून देणाऱ्या आणि भरतनाट्यम नर्तिकांचा पोशाख कसा असावा हेही ठरवणाऱ्या रुक्मिणीदेवी अरुंडेल यांच्या ‘कलाक्षेत्रा’त यामिनी पाचव्या वर्षापासून शिकल्या. अरंगेत्रम कधी झाले याची नोंद नसली तरी सतराव्या वर्षी त्यांचा पहिला कार्यक्रम गाजल्याच्या नोंदी आहेत. ते साल होते १९५७. तीनच वर्षांनी यामिनी कृष्णमूर्ती आणि त्यांचे वडील एम. कृष्णमूर्ती हे दिल्लीत राहू लागले. हे स्थलांतरच पुढल्या यशाची पायरी ठरले. यामिनी यांचे वडील संस्कृतचे जाणकार, आंध्रातल्या मदनपल्लीचे. चरितार्थासाठी मद्रास प्रांतातल्या चिदम्बरमला आले आणि निव्वळ मुलीच्या नृत्यशिक्षणासाठी अड्यारला राहू लागले. संस्कृतच्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी अर्थार्जनापेक्षाही, मुलीला ‘कृतीं’चे (नृत्य ज्या शब्दांआधारे होते ते गाणे) अर्थ समजावून सांगण्यास, नृत्यासाठी अपरिचित पद्यारचनांचा शोध घेण्यास केला. याचा एक परिणाम असा की, ‘यामिनी कृष्णमूर्तींच्या नृत्याचे वैशिष्ट्य कृती आणि तालापासून सुरू होते’ अशी कबुली समीक्षकांनी दिली. राष्ट्रपती भवनात सादरीकरणाची संधी २८व्या वर्षी त्यांना मिळाली, त्याआधी त्यांनी स्वत:चे नृत्यशिक्षण वर्गही सुरू केले होते. पण भरतनाट्यममध्ये पारंगतता मिळवल्यानंतर त्या कुचिपुडी आणि ओडिसीसुद्धा शिकल्या. यापैकी कुचिपुडीचे कार्यक्रमही त्या करत. पण भरतनाट्यम नर्तिका म्हणूनच त्या अधिक लक्षात राहातील; कारण तालाची अंगभूत जाण, पद्यारचनेच्या आशयाला न्याय देणाऱ्या हालचाली आणि नृत्यशैलीचे व्याकरण पाळतानाही अभिव्यक्तीत वैविध्य आणणारा मुद्राभिनय. आणि या सर्व वैशिष्ट्यांपेक्षाही लक्षात राहाणारे असे त्यांचे डोळे! दोन्ही हातांनी झाकलेला चेहरा एकाच हाताची बोटे थोडी विलग करून यामिनी कृष्णमूर्तींचा एक डोळा दिसल्यावर ‘सूर्योदय झाला’ हा संदेश प्रेक्षकांना पोहोचावा, असे ते संवाद साधणारे डोळे. आता कायमचे मिटले आहेत.