‘कबीर’ आणि ‘फर्नांडिस’ या प्रवाशांची भेट कलकत्त्याहून (तत्कालीन नाव) दिल्लीकडे जाणाऱ्या विमानात, १९७१ च्या एप्रिलमध्ये झाली. नुकत्याच (२६ मार्च १९७१) स्वतंत्र झालेल्या बांगलादेशात जॉर्ज फर्नांडिस जाऊन आले होते, तर पश्चिम बंगालमध्ये ‘भारतीय रेड क्रॉस संघटने’च्या उपसंचालक म्हणून केलेला दौरा आटोपून लैला कबीर दिल्लीस परत येत होत्या. ‘तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटते’ यासारख्या जॉर्ज यांच्या वाक्याला पुरुषी अगोचरपणा न समजता लैला म्हणाल्या- मी सक्रिय राजकारणात नाही, पण राममनोहर लोहियांच्या घरी ज्या बैठका व्हायच्या तिथे मीही असायचे. ‘माजी केंद्रीय मंत्री हुमायून कबीर यांची कन्या’ ही ओळख लैला कधीही सांगत नसत. तिथून सुरू झालेला संवाद विविध विषयांच्या चर्चेपर्यंत गेला आणि या दोघांच्या सहजीवनाला सुरुवात झाली. तीनच महिन्यांत, २२ जुलै १९७१ रोजी त्यांचा विवाह झाला.
जॉर्ज यांना तेव्हा तर बऱ्याच मैत्रिणी होत्या. पण जॉर्ज यांच्या तत्कालीन करिष्म्यावर जराही न भाळता, त्यांच्याशी प्रसंगी बौद्धिक वाद घालू शकणाऱ्या लैलाच. तेव्हाही आणि लग्नानंतरही, लैला यांनी आपले स्वतंत्र व्यक्तिमत्त्व. जपले होते. रेड क्रॉसचे काम सोडल्यावर ‘विद्या इंडिया’ या नावाने दिल्लीत वंचित, अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी संस्था सुरू केली. ही संस्था पंचशील पार्क भागात आता माध्यमिक शाळेपर्यंत मोठी झाली आहे. ‘आहे रे आणि नाही रे वर्गांमध्ये भागीदारी हवीच’ हे ध्येय ठेवून त्या काम करत. यातला ‘भागीदारी’ हा शब्द महत्त्वाचा. बहुधा, लैला ऑक्सफर्डमध्ये ऐन १९६८ सालात शिकत असताना युरोपभर युवकांची जी आंदोलने झाली, त्यांचे मर्म समजून घेतल्यामुळे आणि या आंदोलनांतली कटुता, नंतरची हताशा हेही पाहिल्यामुळे लैला यांना या ‘भागीदारी’चे महत्त्व उमगले असावे. बाळंतपणानंतर आईच्या गावी म्हणून ओडिशातल्या गोपालपूरला लैला पतीसह आल्या होत्या, तेव्हाच आणीबाणीची घोषणा झाली. जॉर्ज तात्काळ भूमिगत झाले आणि लैला भावाकडे जायचे या सबबीखाली अमेरिकेत पोहोचल्या… तिथे त्यांनी भारतीय लोकशाहीच्या हितचिंतकांची संघटना बांधण्याचे काम केले!
आणीबाणीनंतर दोघांच्याही आपापल्या व्यापांमुळे दुरावा, १९८४ नंतर या दुराव्याला सखोल आणि लांबरुंद करणारी आणखीही कारणे असे टप्पे येऊनसुद्धा २००७ नंतर ‘त्यांना बहुतेक डिमेन्शिया असावा…’ असे अमेरिकेत राहाणाऱ्या एकुलत्या एका मुलाने- सुशान्तो ऊर्फ सीन यांनी- सांगितल्यावर मात्र लैला कबीर, जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडे लक्ष ठेवू लागल्या. लोकसभेची २००९ ची निवडणूक लढवू नका, असे लैला यांनी जॉर्जना विनवून पाहिले. जॉर्जच ते- लोकाग्रह आहे म्हणून अपक्ष उभे राहिले आणि १९६७ मध्ये स. का. पाटलांना हरवणारे हेच का ते अशी शंका येईल इतक्या केविलवाण्या मतांमुळे पडले. तेव्हापासून मात्र जॉर्ज यांची जबाबदारी आता आपलीच, हे लैला यांनी ओळखले. मधल्या काळात लैला यांचा घटस्फोट झाला की काय अशी चर्चा होई. पण २०१० ते जॉर्ज यांच्या मृत्यूपर्यंत (२९ जानेवारी २०१९) त्यांची काळजी लैलांनीच वाहिली. इतके की, जया जेटलींना जॉर्ज यांची भेट घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन परवानगी मिळवावी लागली. जॉर्ज गेल्यानंतर लैला यांना आतड्याचा कर्करोग असल्याचे आढळले. पण गेली दोन वर्षे उपचार थांबवून त्या मृत्यूची वाट पाहात होत्या… अखेर १५ मे रोजी त्यांनी डोळे मिटले.