साहित्याची समीक्षा निव्वळ साहित्यिक मापदंडांनीच व्हावी, हा कलावादी विचार बाजूला सारून आयुष्यभर समाज आणि साहित्य यांचा संबंध वीरेन्द्र यादव यांनी शोधला. मुळात साहित्याचा समाजाशी संबंध असतो, असायला हवा, हे मूल्य ज्या मुन्शी प्रेमचंद यांनी हिंदीत प्रस्थापित केले, त्यांचे गाढे अभ्यासक म्हणून वीरेन्द्र यादव यांना ओळखले जाई. यादव यांचे निधन १६ जानेवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने झाले, त्याआधीच्या आजारपणाचे काही महिने वगळता वयाच्या पंचाहत्तरीनंतरही ते तितक्याच तडफेने लिहीत राहिले होते.
जौनपूरमध्ये जन्मलेले वीरेन्द्र यादव शिक्षणासाठी लखनऊमध्ये आले तेव्हा ‘मिशा आणि मते फुटण्याच्या वया’त ते होते. तो १९५०-६० च्या दशकांचा काळ पं. नेहरू यांच्या मिश्र अर्थव्यवस्थेचा, पण या देशातल्या सर्वांचे भले करायचे असेल – सर्वांचे जगणे सुखकर/ त्रासहीन करायचे असेल तर समाजवादाशिवाय पर्याय नाही, अशा विचाराने भारलेला. असा समाजवाद आणि भारतीय संस्कृती यांच्यात काहीही अंतर्विरोध नाही, असेही मानणारा. या वैचारिक कलाचे प्रतिबिंब रुपेरी पडद्यावरही दाखवणारी हिंदी चित्रपटसृष्टी लखनऊपासून दूर, पण प्रेमचंद जवळचे- शिवाय त्या काळचे अनेक तरक्कीपसंद शायरही लखनऊत राबता असणारे. वाढत्या वयात स्वत:वर झालेल्या या संस्कारांचे मनोज्ञ चित्रण त्यांच्या ‘विमर्श और व्यक्तित्व’ या अलीकडच्या (२०२४) पुस्तकात, तत्कालीन साहित्यिकांबद्दलच्या लिखाणातून आले आहे. पण एरवी व्यक्तीपेक्षा समष्टीकडे पाहणारे ते होते. कादंबरी या साहित्यप्रकाराला प्रतिष्ठा का मिळते, याच्या शोधात त्यांनी दोन महत्त्वाचे प्रश्न मांडले- कादंबरी स्थितीवादी/ प्रस्थापित समाजातल्या पारंपरिक वर्चस्वकल्पना कायम ठेवून ‘इतरां’बाबत वाचकाला विरेचनासारखा अनुभव देते का? चित्रणाभिमुखता हे कादंबरीचे वैशिष्ट्य लोकांचे खरेखुरे जगणे, त्यातले दाहक अनुभव मांडण्यास पुरेसे ठरते आहे का? – या दोन प्रश्नांतून अनुक्रमे ‘उपन्यास और वर्चस्व की सत्ता’ आणि ‘उपन्यास और देस’ ही पुस्तके साकारली.
राज्यशास्त्राचे शिक्षण वीरेन्द्र यादव यांनी घेतले होते. त्यांच्या लिखाणात आणि विचारांतही कार्यकर्त्याची तडफ होती. ‘उत्तर प्रदेश हिंदी संस्थान’ या त्या राज्यातील प्रतिष्ठित, जुन्या संस्थेच्या पुरस्कारांच्या यादीतील सुमारे सव्वाशे नावांपैकी अवघी दोनच नावे बहुजनांची- बाकी सर्व ‘द्विजां’ची कशी, असा आक्षेप ठामपणे त्यांनी घेतला होता. राही मासूम रझा, असगर वजाहत, अब्दुल बिस्मिल्लाह हे लेखक या संस्थेला पुरस्कारायोग्य वाटत नाहीत काय, असा त्यांचा सवाल होता. असे प्रश्न विचारणे हे सामाजिक अभिसरणासाठी महत्त्वाचे आहे, असा विश्वास त्यामागे असला तरी, प्रत्यक्षात मात्र हे प्रश्न नकोच असलेल्यांनी वीरेन्द्र यादव यांनाच वैचारिक शत्रू मानले. ‘मग स्वत: कसा स्वीकारलात याच संस्थेचा पुरस्कार?’ यासारख्या टोमण्यांच्या टोचा मारून, ‘ही संस्था सर्वांची आहे, सर्वांचीच असायला हवी’ हा त्यांचा मुद्दा पुसून टाकण्याचा प्रयत्नही झालाच. हिंदी साहित्यप्रांतावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न अमेरिकी ‘सीआयए’ने केला असल्याच्या त्यांच्या आरोपाचीही तार्किक चिकित्सा न करता तर्कदुष्ट आगपाखड झाली. प्रेमचंद, फणीश्वरनाथ रेणू, श्रीलाल शुक्ल यांसारख्या साहित्यिकांवरचा वीरेन्द्र यादव यांचा अभ्यास मात्र वादातीत होता; कारण साहित्यसमीक्षेला ‘सबाल्टर्न स्टडीज’ची जोड देण्याचा हिंदीतला प्रयोग त्यांनी केला होता. त्यांच्या निधनाने हिंदी साहित्य एका समाजभावी समीक्षकाला अंतरले आहे.
