नुकत्याच झालेल्या ‘लंडन बुक फेअर’मध्ये एक पुस्तक चर्चेचा विषय ठरलं. पुस्तकाचं नाव आहे, ‘डोन्ट स्टील धिस बुक’- ‘हे पुस्तक चोरू नका!’. ही ना कादंबरी आहे, ना चरित्र, ना सेल्फ हेल्प बुक… यात आहे केवळ हजारो लेखकांची यादी. एआय कंपन्या पुस्तकातला आशय कोणतंही श्रेय न देता सरळ चोरत आहेत, असं या लेखकांचं म्हणणं आहे. ब्रिटनमध्ये कॉपी राइट्ससंदर्भातल्या कायद्यात सुधारणा प्रस्तावित असून त्यात आपल्या या मागणीची दखल घेण्यात यावी, म्हणून सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी या पुस्तकाच्या छापील प्रती बुक फेअरमध्ये वाटण्यात आल्या. ही सुधारणा झाल्यास एआय कंपन्या कोणतेही शुल्क न भरता वा परवानगी न घेता एखाद्या व्यक्ती वा संस्थेच्या नावे कॉपी राइट्स असलेल्या पुस्तकांचा वापर आपल्या एआय मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यासाठी करू शकतात. या प्रस्तावानुसार, ज्या लेखकांना आपल्या साहित्याच्या आधारे एआय मॉडेल्सना प्रशिक्षण दिले जाऊ नये असे वाटते, त्यांना त्यातून बाहेर पडण्याचा पर्याय स्वत:हून निवडावा लागेल. काही लेखकांच्या मते, हे एक प्रतिगामी आणि अव्यवहार्य पाऊल आहे.

या पुस्तकामागची संकल्पना संगीतकार आणि कॉपीराइट्ससाठी लढा देणारे एड न्यूटन-रेक्स यांची आहे. त्यांनी या प्रकल्पाचे वर्णन, लेखकांनी आपल्या उपजीविकेचे रक्षण करण्यासाठी दिलेली एक आर्त हाक, असे केले आहे. या पुस्तकावर स्वाक्षर्‍या करणार्‍यांमध्ये साहित्यविश्वातील अत्यंत नामवंत व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये नोबेल पारितोषिक विजेते काझुओ इशिगुरो, ऐतिहासिक कादंबरीकार फिलिपा ग्रेगरी, ‘ऑरेंजेस आर नॉट द ओन्ली फ्रूटच्या’च्या लेखिका जेनेट विंटर्सन आणि ‘वॉचमेन’ व ‘व्ही फॉर वेन्डेटा’चे लेखक ॲलन मूर इत्यादींनी या प्रकल्पात सहभाग घेतला आहे. पुस्तकात स्वाक्षरी करणार्‍यांची संपूर्ण यादी या मोहिमेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

स्वाक्षरीकर्त्यांचे असे म्हणणे आहे की, एआय कंपन्या कोणत्याही परवानगीशिवाय किंवा मोबदल्याशिवाय लाखो पुस्तकांची नक्कल करून आपली उत्पादने विकसित करत आहेत. dontstealthisbook.com या त्यांच्या अधिकृत मोहिमेच्या संकेतस्थळावरील एका निवेदनात म्हटले आहे, ‘एआय कंपन्यांच्या फायद्यासाठी ब्रिटनच्या सरकारने पुस्तकांची चोरी कायदेशीर ठरवू नये. एआय कंपन्या कोणत्याही परवानगीशिवाय किंवा मोबदल्याशिवाय लाखो पुस्तकांची नक्कल करून आपली उत्पादने विकसित करत आहेत. या चोरीला कायदेशीर मान्यता मिळाली तर मागे उरतील, केवळ कोरी पाने, मानधन न मिळणारे लेखक आणि आपल्या अत्यंत आवडीच्या पुढील पुस्तकाला मुकणारे वाचक.’

ब्रिटनमधील लेखक, प्रभावक (इन्फ्लुएन्सर्स) आणि अनुवादकांसाठीच्या मोठ्या संघटनांपैकी एक असलेल्या ‘द सोसायटी ऑफ ऑथर्स’ने एक ‘ह्युमन ऑथर्ड’ (मानवाने लिहिलेले) लेबलिंग योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, संघटनेचे सदस्य २०२० नंतर मानवनिर्मित साहित्यकृतींची नोंदणी करू शकतील. या साहित्यकृतींचा एका डेटाबेसमध्ये समावेश केला जाईल आणि नोंदणीकृत सदस्यांना आपल्या पुस्तकावर ‘ह्युमन ऑथर्ड’ असा लोगो वापरता येईल. यामुळे एआय-निर्मित पुस्तकांच्या प्रचंड गर्दीत मानवनिर्मित साहित्यकृती उठून दिसण्यास मदत होईल.