युद्धाच्या जखमांवर फुंकर म्हणून आणि फेरउभारणीच्या कामास ऊर्जा मिळावी म्हणून युद्धोत्तर १९४८ च्या ऑलिम्पिकचे यजमानपद लंडनकडे आले. अत्यंत काटकसरीच्या म्हणून ओळखल्या जाणार्‍या या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये नवस्वतंत्र देश म्हणून भारत पहिल्यांदाच सहभागी झाला होता. लोकांनी त्यांच्या घरच्या टीव्हीवर पाहिलेेल्या या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये एकही विक्रम नोंदवला गेला नाही…

ऑलिम्पिक स्पर्धेतील सर्वांत मोठ्या विरामाची नोंद बर्लिन १९३६नंतर झाली. जर्मनीचा नाझी शासक ॲडॉल्फ हिटलरला ऑलिम्पिकच्या निमित्ताने जर्मन सामथ्र्याचे प्रदर्शन मांडायचे होते. पण सामथ्र्याआडून वंशद्वेषी धोरणांना रेटण्याचा हिटलरचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने फारसा यशस्वी होऊ दिला नाही. याच हिटलरच्या राक्षसी आकांक्षेमुळे पुढे सप्टेंबर १९३९ मध्ये युद्धाला तोंड फुटले आणि तो भडका अत्यंत विध्वंसक अशा दुसर्‍या महायुद्धामध्ये परिवर्तित झाला. युरोपातील बहुतेक प्रमुख राष्ट्रे, जपान, अमेरिका सहभागी झालेल्या या युद्धाची व्याप्ती प्रचंड होती. त्यामुळे १९४० आणि १९४४ अशी सलग दोन ऑलिम्पिक भरवलीच गेली नाहीत. टोक्योला १९४० च्या स्पर्धेचे यजमानपद मिळाले होते. जर्मनीप्रमाणेच जपानची महत्त्वाकांक्षी युद्धखोरीही १९३० च्या दशकात दिसून आली होती. तरीदेखील १९३६ मधील बैठकीत जपानला १९४० मधील स्पर्धेचे यजमानपद बहाल झाले. गंमत म्हणजे ते मिळण्यासाठी जपानने आणखी एक युद्धखोर देश इटली आणि त्यांचा नेता बेनिटो मुसोलिनीला रोमची उमेदवारी मागे घेण्यासाठी गळ घातली. ही सौदेबाजी त्या काळी वादग्रस्त ठरली. पण १९३७ मधील चीन-जपान युद्धामुळे जपानने अंग काढून घेतले. तेव्हा हेलसिंकीला ऑलिम्पिक होईल असे जाहीर झाले. हेलसिंकीची बोली टोक्योपाठोपाठ दुसरी आली होती. हेलसिंकी ऑलिम्पिक जुलै-ऑगस्ट या काळात होणार होते. तसेच लंडनला १९४४ मधील स्पर्धेचे यजमानपद मिळाले होते. परंतु १९३९ वर्षाच्या आरंभीच युद्धखोरी की मुत्सद्देगिरी असे द्वंद्व सुरू झाल्यानंतर, पहिली शक्यता खरी ठरण्याच्या भीतीने ऑलिम्पिक बेमुदत काळासाठी स्थगित करण्यात आले. मग १९४४ मध्येही ते झालेच नाही. युद्धसमाप्तीनंतर तीन वर्षांनी म्हणजे १९४८ मध्ये लंडनलाच ऑलिम्पिक भरवण्यात आले.

लंडन ऑलिम्पिक १९४८

ब्रिटन हे दुसर्‍या महायुद्धातील जेत्या राष्ट्रांच्या फळीत होते. पण जर्मन हवाई हल्ल्यांची मोठी झळ लंडन आणि इतर काही शहरांना बसली होती. त्या पडझडीतून पुनर्बांधणीचे काम, त्याचा खर्च मोठा होता. लंडनला १९४४ मधील ऑलिम्पिक यजमानपदाची संधी मिळाली होती. ती हुकली तेव्हा १९४८ मध्ये युद्धोत्तर पहिल्या ऑलिम्पिकचे यजमानपद त्यांच्याकडे आपसूकच चालून आले. ते अमेरिकेकडे सोपवले जावे अशी ब्रिटनमधील काहींची भावना होती. पण ब्रिटिश सम्राट सहावे जॉर्ज (राणी दुसर्‍या एलिझाबेथ यांचे वडील) यांनी ऑलिम्पिक भरवण्याविषयी आग्रही भूमिका घेतली. युद्धाच्या जखमांवर फुंकर म्हणून आणि फेरउभारणीच्या कामास ऊर्जा मिळावी अशी त्यांची इच्छा होती. खुद्द लंडनमध्येही तेथील शहर प्रशासनाची यापेक्षा वेगळी भावना नव्हती. जर्मन अग्निवर्षावानंतरही लंडनमधील बहुतेक क्रीडा संकुले अबाधित होती. परंतु नव्याने संकुले उभारण्याची लंडन प्रशासन किंवा ब्रिटिश सरकारची तेव्हा क्षमता नव्हती. युद्धोत्तर टंचाईच्या काळात आहे त्या सुविधा वापरून ऑलिम्पिक भरवण्याचे ठरले. सलग दोन ऑलिम्पिक भरवता न आल्यामुळे तिसरे ऑलिम्पिक कोणत्याही परिस्थितीत भरवले गेले पाहिजे याविषयी प्रमुख देश आग्रही होते आणि त्या काळात ती इच्छाशक्ती कौतुकास्पद होती. तशाच प्रकारची इच्छाशक्ती युरोपिय देशांनी पहिल्या महायुद्धानंतरही दाखवली होती. लंडनमध्ये १९०८ नंतर दुसर्‍यांदा ऑलिम्पिक भरवले जात होते. दोहोंमधील प्रमुख फरक म्हणजे, ब्रिटिश साम्राज्य म्हणून जे सुरुवातीस ओळखले जायचे, त्यांतील भारतासह अनेक वसाहती तोपर्यंत स्वतंत्र झाल्या किंवा स्वातंत्र्याच्या मार्गावर होत्या. ऑलिम्पिक व्हिलेजची स्वतंत्र उभारणी झाली नाही कारण निधी मर्यादित होता. त्याबद्दल अर्थातच तक्रारीस जागा नव्हती. जपान आणि जर्मनीला निमंत्रण नव्हते. जर्मनीवर अशी वेळ तिसर्‍यांदा आली. पहिल्या महायुद्धानंतरही दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये जर्मनीवर बहिष्कार टाकण्यात आला होता. जपानला १९४० मधील ऑलिम्पिक भरवण्याची संधी होती. पण त्याऐवजी त्यांना १९४८ मधील स्पर्धेतूनच बाहेर पाठवले गेले. तत्कालीन सोव्हिएत रशियाने नकार कळवला. विजेत्या राष्ट्रांमध्ये सर्वाधिक बेचिराख हाच देश झाला होता. त्यामुळे ते स्वाभाविक होते. पण लंडनमध्ये प्रथमच युगोस्लाव्हिया, हंगेरी, पोलंड अशा कम्युनिस्ट देशांचा सहभाग होता. स्वतंत्र भारत पहिल्यांदाच सहभागी होत होता. इस्रायलला अधिकृत निमंत्रण नव्हते, कारण त्या देशाला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची मान्यता मिळालेली नव्हती. या निर्णयामुळे काही अरब देश बहिष्कार मागे घेत सहभागी झाले. सुमारे ५९ देशांतील जवळपास ४००० देशांचा सहभाग होता. हेलसिंकी शहराला १९५२ मधील ऑलिम्पिक भरवण्याची संधी देण्यात आली. तीन गोष्टींचा समावेश पहिल्यांदाच झाला. खेळांची चिन्हे (पिक्टोग्राम्स) या स्पर्धेत प्रथम वापरली गेली. घरच्या टीव्हीवर दिसलेले हे पहिलेच ऑलिम्पिक. याशिवाय ॲथलेटिक्स ्प्रिरंट प्रकारात स्टार्टिंग ब्लॉक्सचा वापर पहिल्यांदा केला गेला.

लंडन ऑलिम्पिक १९४८ हे काटकसरीचे ऑलिम्पिक (ऑस्टिरिटी ऑलिम्पिक) म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळे त्या काळी कष्टकर्‍यांना जे रेशन मिळायचे तसेच ते खेळाडूंनाही दिले गेले. पुरुष खेळाडूंच्या निवासाची सोय काही ब्रिटिश लष्करी छावण्यांमध्ये करण्यात आली. तर महिला खेळाडूंची सोय लंडन आणि आसपासच्या महाविद्यालये आणि विद्यापीठांतील हॉस्टेलांमध्ये करण्यात आली. खेळाडूंनी त्यांचे कपडेही – रोजच्या वापरातले नि मैदानावरचे – स्वत:च घेऊन यावेत असे बजावण्यात आले. किती कॅलरी पुरेशा आहेत यावर मतैक्य होईना. लंडनमधील बाबूंनी जो आकडा ठरवला तो खेळाडूंना किंवा त्यांच्या पथकप्रमुखांना मंजूर नव्हता. काटकसर करायची नि काटकसर दिसली पाहिजे असा दंडक होता. तो ब्रिटिशांप्रमाणेच परदेशी पाहुण्यांनाही लागू आहे का यावरून गोंधळ होता. परंतु युद्धाचे निखारे पुरेसे विझलेले नसल्यामुळे परदेशी खेळाडूंना फार खळखळ करता आली नाही. तशात स्पर्धेचा बहुतेक काळ तुफान पाऊस पडला. या सगळ्याचा परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवर झाला. या स्पर्धेत विक्रम जवळपास नोंदवलेच गेले नाहीत.

कुबर्तांनंतरचे पहिलेच…

ऑलिम्पिक चळवळीचे प्रणेते पिअर दा कुबर्ता यांच्या मृत्यूपश्चात झालेले हे पहिलेच ऑलिम्पिक. कुबर्ता १९३७ मध्ये मरण पावले. पण त्यांची रुजवलेला आणि वाढवलेला ऑलिम्पिकचा वटवृक्ष युद्धे आली, मंदी आली तरी दिमाखात वाढत होता. वास्तविक १९४८ मध्येही ऑलिम्पिकला स्थगिती देऊन ते १९५२ पासून पुन्हा भरवता आले असते. पण या चळवळीच्या बाल्यावस्थेत १९०८ मध्ये लंडन स्पर्धेने आसरा दिला, तसाच तो वेगळ्या परिस्थितीत १९४८ मधील स्पर्धेनेही दिला. ही शिस्त लंडनची, हा शिरस्ता कुबर्तांचा. हिटलरच्या जर्मनीने १९३६ मधील ऑलिम्पिक बटबटीत पातळीवर आणले. त्या तुलनेत साधेपणाचा ठायीठायी अनुभव देणार्‍या लंडन ऑलिम्पिकने जणू या चळवळीची शुचिता पुन्हा आणली. पुढे प्रदीर्घ काळ म्हणजे २०२० पर्यंत या स्पर्धा विनाअडथळा सुरू राहिल्या. दरम्यानच्या काळात तीव्र शीतयुद्ध, अरब-इस्रायल युद्धे, अमेरिका आणि सोव्हिएत रशियाचे लागोपाठचे बहिष्कार आणि म्युनिच १९७२ मधील दुर्दैवी हत्याकांड अशा आव्हानांनंतरही ऑलिम्पिक भावना चलनात राहिली.

siddharth.khandekar@expressindia.com