‘लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी’चे वर्ग पुढले दहा दिवस बंद, त्या काळात होणारी परीक्षाही रद्द आणि या खासगी विद्यापीठाच्या वसतिगृहांत राहाणार्‍या विद्यार्थ्यांना ‘आतच राहा’ असा आदेशवजा सल्ला… अशी सामसूम आता पसरलेली आहे. त्याआधीचे २२ तास या आवारात आणि त्यालगतच्या महामार्गावर घोषणाबाजी, रास्तारोको आणि ठिय्या, जाळपोळ, मोडतोड, काहीजणांकडून लूटसुद्धा आणि पोलिसी लाठीमार असे हिंसक वातावरण होते. कारण घडले ते पंजाबच्या फगवाडा शहरातील या विद्यापीठात एका मुलीवर विद्यापीठाबाहेरील कुणा इसमाने अतिप्रसंग केला आणि विद्यापीठ प्रशासनाने हा प्रकार दडवून ठेवून त्या मुलीलाच बाहेर काढले, अशा कथित अफवेचे. ही अफवा अर्थात समाजमाध्यमांवरून पसरली. अशीच अफवा चंडीगड-पतियाळा महामार्गावरल्या ‘चित्कारा युनिव्हर्सिटी’ या खासगी विद्यापीठात अवघ्या दोन दिवसांपूर्वी पसरल्याने तिथल्या विद्यार्थ्यांनीही असंतोष व्यक्त केला होता, त्यापेक्षा ‘लव्हली’तला असंतोष हिंसक. कदाचित तो हिंसक असल्यामुळेच, प्रशासन ‘अफवा’ ठरवत असलेल्या कथित बलात्काराबद्दल पोलिसांनी गुन्ह्याची खबर (एफआयआर) नोंदवली आणि ‘विशेष तपास पथक’सुद्धा स्थापन केले. त्याआधी सलग काही तास घडत राहिलेल्या हिंसाचाराचे समर्थन कुणीही केलेले नाही, करूही नये- पण झाल्या प्रकाराचा निषेध करणार्‍यांनी राजकीय हिशेब चुकते करण्याची संधी सोडली नाही. सध्या माध्यमांत सुरू आहे ते ‘दोन खासगी विद्यापीठांत हे प्रकार घडवण्यामागे कुणाचा हात?’ या वळणाचे चर्चाचर्वण. या गदारोळात, विद्यार्थी इतके अस्वस्थ कशामुळे आहेत – त्यांना काय म्हणायचे आहे, काय सांगायचे आहे- हे मुद्दे गौणच ठरणार की काय?

मुलीवर अत्याचार झाला, असे काही विद्यार्थी सांगतात. ‘अत्याचार झाला नाही’ असे विद्यापीठ-पुरस्कृत व्हीडिओत सांगणार्‍या मुलींनीही ‘असे बोलण्यास आम्हाला प्रशासनाने सांगितले’ असे म्हटल्याचे वृत्त आहे. पण हा मुद्दा केवळ एका मुलीवरल्या अत्याचारापुरता नव्हता. या विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी यापूर्वी आत्महत्या केल्या, तेव्हा तीही प्रकरणे दडपण्यात आली असा आरोप अनेक विद्यार्थी आता कॅमेर्‍यांसमोर करताहेत. ‘इथे प्राध्यापकापेक्षा सुरक्षा रक्षकांचा रुबाब अधिक’- असेही म्हणताहेत. दाबलेली वाफ बाहेर पडावी तसे परवाच्या आंदोलनावेळी घडले.

अखेर हे खासगी विद्यापीठ. म्हणजे स्वत:च्या प्रतिमेवर, ‘रेटिंग’वर त्यांचा व्यवसाय अवलंबून असणारे संस्थानच! ‘आम्हीच हा रोबोटिक कुत्रा निर्माण केला’ असे धडधडीत असत्यकथन करणारी अन्य कुणा खासगी विद्यापीठाची प्रसिद्धीप्रमुख हे या प्रतिमा-संवर्धन खटाटोपाचे एक टोक असेल, तर दुसरे टोक हे ‘नकारात्मक काहीच नको’ असे असणारच. ते किती वेळा गाठले जाते आणि त्यामुळे किती गळचेपी होते यांतला फरक फक्त तपशिलाचा.
विद्यार्थ्यांची ही खदखद रास्त असली तरी इतक्या हिंसक थराला जावे का, हा प्रश्न योग्यच. पण त्याची उत्तरेही आजकाल जटिल झालेली आहेत

२०२०च्या दिल्ली दंगलीदरम्यान जामिया मिलिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात घुसून मोडतोड करणार्‍या पोलिसांपासून ते दिल्लीतल्याच २०२६ च्या ‘जंतर मंतर आंदोलना’च्या वेळी पेलेट गोळीबाराचा आदेश कोणी दिला हे दडवणार्‍या यंत्रणांपर्यंत; आणि कुणाच्याही तोंडी काहीही बोल घालू शकणार्‍या ‘डीपफेक’ पासून ते विद्यार्थिनींना इन्कार करणे भाग पाडणार्‍या प्रशासनापर्यंत असा हा सगळा जटिल प्रदेश गेल्या काही वर्षांत तयार झाला आणि याच प्रदेशातून ‘जेन-झी’ला वाटचाल करावी लागणार आहे. फक्त ‘लव्हली’ विद्यापीठाबद्दलच बोलायचे तर ‘हिंसाचार बाहेरच्यांनीच केला- त्यापैकी काहीजणांनी वसतिगृहांत घुसून फोन, आयपॅडही लुटले’ असे सांगणारे विद्यार्थी खरे की ‘पोलिसांच्या पाच गाड्या जाळल्या गेल्या’ असे सांगणारे पोलीस खरे, हे ठरायचे तेव्हा ठरेल. तोवर ‘आता कॉक्रोच जनता पार्टी गप्प कशी?’ किंवा ‘सत्ताधारी ‘आप’नेच विद्यार्थ्यांना भडकवण्याचे उद्योग केले’- असे समाजमाध्यमी राजकारण होत राहील. या ‘लव्हली’ विद्यापीठाचे संस्थापक-कुलपती राज्यसभा खासदार अशोक मित्तल हे मूळचे ‘आप’चे, पण एप्रिल २०२६ पासून राघव चढ्ढांसह भाजपवासी. ‘आम्हालाच लक्ष्य केले जाते’ हे लोकांच्या मनावर ठसवण्यात भाजप वाकबगार. पण मित्तल यांच्या सत्तासंबंधामुळे दहा दिवसांनंतर या ‘लव्हली’ विद्यापीठात सारे काही आलबेल दिसल्यास नवल नाही. एरवीही ‘सगळे सकारात्मक दिशेनेच’ असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवला जातोच की!