कधीतरी एखादं संकट येतं वा अपघात होतो आणि व्यक्तीचं आयुष्य बदलून जातं. देश बंधु दास यांचंही असंच काहीसं झालं. लहानपणी खेळता खेळता पाय मोडला. तो स्वातंत्र्यापूर्वीचा काळ होता. दळणवळणाची साधनं जवळपास नव्हतीच. रुग्णालयही दूर होतं. वडिलांनी खांद्यावर घेतलं आणि तीन तास चालून रुग्णालयात पोहोचले. पाय कालांतराने बरा झाला, पण त्यातून एका ध्येयाने त्यांना कायमचं झपाटलं… आरोग्याच्याच क्षेत्रात काहीतरी करायचं. हे ‘काहीतरी’ म्हणजे नेमकं काय हे कळण्यासाठी अर्थातच बराच काळ गेला, पण त्यातून ‘ल्युपिन लिमिटेड’ सारखी प्रतिष्ठित औषधनिर्मिती कंपनी स्थापन झाली. या प्रवासाचा लेखाजोखा घेणारं ‘मेड इन इंडिया : द स्टोरी ऑफ देश बंधु गुप्ता, ल्युपिन अँड इंडियन फार्मा’ हे पुस्तक गेल्या ५०-६० वर्षांत भारतातील ‘फार्मसी’चं क्षेत्र कसं विकसित होत गेलं यावरही प्रकाश टाकतं.

राजस्थानातल्या ग्रामीण भागात वाढताना निर्माण झालेला कणखरपणा, कोणत्याही संकटावर मात करता येतेच हा आत्मविश्वास, रसायनशास्त्रात पदवी प्राप्त केल्यानंतरही संधींच्या तुटवड्यामुळे सोसावी लागलेली बेरोजगारी, त्यातून आपल्या कुटुंबातील अनेकांचा पेशा असलेल्या शिक्षणाच्या क्षेत्रात काहीशा नाराजीनेच येणं, स्वत:च्या शाळेत, स्वत:च्याच महाविद्यालयात आणि त्यानंतर बिट्स पिलानीमध्ये रसायनशास्त्राचे साहाय्यक प्राध्यापक म्हणून मिळालेली संधी… अशी त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळातील अनेक वळणं या पुस्तकात मनीष सभरवाल आणि संदीप खन्ना यांनी वर्णिली आहेत.
देशातल्या अनेक स्वप्नाळूंप्रमाणे पुढे गुप्ता यांची स्वप्नं त्यांना मुंबईत घेऊन आली. पूर्णपणे नवं शहर, एका छोट्या फार्मास्युटिकल कंपनीत मिळालेली नोकरी, ओळखीचा एकच मित्र आणि रात्री पाठ टेकवण्यासाठी मिळालेला त्याच मित्राचा सोफा… एखाद्या बॉलिवूडपटात शोभाव्यात अशा घटना गुप्ता यांच्याही आयुष्यात घडल्या. त्यांचं कथनही लेखकांनी नाट्यमय पद्धतीने केलं आहे. पुस्तक औषधनिर्मितीसारख्या तुलनेने जटिल विषयाशी संबंधित असलं तरीही लेखकांच्या रसाळ कथनशैलीमुळे ते कुठेही कंटाळवाणं वा बोजड वाटत नाही.

मुळातच महत्त्वाकांक्षी असलेल्या आणि ध्येयाने झपाटलेल्या गुप्ता यांनी लवकरच नोकरीला रामराम ठोकला. तोवर विवाह होऊन एक अपत्य झालेलं होतं. वडील निवृत्त झाले होते. त्यांचा आपल्या मुलाच्या नोकरी सोडण्याच्या निर्णयाला पूर्ण विरोध होता. तरीही पत्नीकडून पैसे घेऊन त्यांनी १९६८ साली ‘ल्युपिन’ची स्थापना केली. व्यवसाय म्हटला की अवघड निर्णय घेणं, त्यातून होणारी द्विधा मनस्थिती, बरे-वाईट परिणाम, नफ्यापर्यंत पोहोचतानाची ओढाताण इत्यादी कोणत्याही व्यवसायाला लागू पडणार्‍या बाबींचा सामना गुप्ता यांनी कसा केला याचं कथन तर या पुस्तकात आहेच, पण त्याचबरोबर भारतीय औषधनिर्मिती क्षेत्राची सुरुवातीच्या काळातली वाटचाल, त्यातील स्पर्धा, नियमन प्रक्रिया, उत्तम दर्जा राखूनही किंमत वाजवी ठेवताना करावी लागणारी तारेवरची कसरत, बौद्धिक संपदेसंदर्भातील कायदे, विविध देशांगणिक बदलत जाणारे नियम इत्यादींविषयीही वाचकाचा अभ्यास होत जातो. पुस्तकातली एक त्रुटी म्हणजे भारतीय औषधनिर्मिती क्षेत्राची जागतिक पटलावरची भूमिका कशी बदलत गेली, हे पुस्तकातून पुरेसं स्पष्ट होत नाही. बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांसमोर उभं राहताना भारतीय कंपन्यांना कसा संघर्ष करावा लागला याचा अंदाज यातून येत नाही.

औषधनिर्मिती हा उद्योग असला, तरीही त्याचा मानवी चेहरा जपणं आवश्यक असतं. विविध आव्हानांना सामोरं जातानाच हे सारं काही वेदनेत असलेल्या रुग्णांना दिलासा मिळावा, त्यांचे प्राण वाचवणं शक्य व्हावं, यासाठी सुरू आहे, याची जाणीव सतत जागती ठेवावी लागते. व्यवसाय आणि सामाजिक भान यांचा समतोल साधण्याची ही धडपड पुस्तक वाचताना प्र्रकर्षाने जाणवत राहते. पुस्तकात देश बंधु गुप्ता यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील काही महत्त्वाच्या क्षणांची छायाचित्रही आहेत. औषधनिर्मिती व्यवसायासारख्या रुक्ष आणि किचकट भासणार्‍या विषयावरील या पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणाची सुरुवात देश-विदेशांत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणार्‍या व्यक्तींच्या अवतरणांनी होते. व्यवसायात निर्भेळ यश वा अपयश असं काही नसतं. असते ती या सार्‍याची अखंड सुरू असणारी सरमिसळ, हे पुस्तक वाचताना लक्षात येतं. यशस्वी व्यावसायिक होण्यासाठी ही सरमिसळ स्वीकारणं महत्त्वाचं आहे, हेच या द्रष्ट्या व्यावसायिकाच्या प्रवासातून अधोरेखित होतं.

औषध निर्माण क्षेत्रातील भारताच्या आजच्या स्थानाचा विचार करता इथल्या कंपन्यांनी किती नफा कमवला, यापेक्षा त्यांनी भारताच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात काय योगदान दिलं, हा मापदंड महत्त्वाचा ठरतो. ‘ल्युपिन लि.’ प्रमाणाचे ‘सिप्ला’, ‘रॅनबॅक्सी’, ‘डॉ. रेड्डीज’, ‘झायडस-कॅडिला’ या कंपन्या त्यांची उलाढाल, निर्यातीचे प्रमाण किंवा आर्थिक नफा यापलीकडेही महत्त्वाच्या ठरतात, कारण त्यांनी भारताला आरोग्य क्षेत्रातली एक महत्त्वाची शक्ती म्हणून पुढे येण्यास हातभार लावला. स्वातंत्र्योत्तर काळात विविध क्षेत्रांत स्वत:चे पाय रोवून उभं राहण्यासाठी धडपडणार्‍या देशाला त्यांनी मजबूत पाठबळ दिलं. बहुराष्ट्रीय कंपन्यांचीच औषधं उत्तम असतात आणि भारतीय कंपन्या बेभरवशाच्या असतात, हा समज मोडीत काढण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या क्षेत्रात कंपनीच्या उत्पादन दर्जाविषयीचा विश्वास अतिशय महत्त्वाचा असतो. तो वाढवण्यात हातभार लावणार्‍यांपैकी ‘ल्युपिन’ हे एक उल्लेखीनय नाव. आज भारतीय कफ सिरप्सविषयी जागतिक स्तरावर संशयाचं धुकं निर्माण झालेलं असताना आणि कोविडकाळात विविध औषधांबद्दल जबाबदार पदांवरच्या व्यक्तींनी केलेले दावे वादात सापडल्याची पार्श्वभूमी असताना भारतीय औषध निर्माण क्षेत्रासमोर प्रतिमा जपण्याचं आव्हान उभं ठाकलं आहे. त्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक महत्त्वाचं.

मेड इन इंडिया : द स्टोरी ऑफ
देश बंधु गुप्ता, ल्युपिन
अँड इंडियन फार्मा
लेखक – मनीष सभरवाल आणि संदीप खन्ना
प्रकाशक- जगरनॉट
पृष्ठे- ३४१, किंमत- ७९९ रु.