‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ हे प्रत्येक कर्तृत्ववान व्यक्तीच्या बाबतीत सत्यच असले पाहिजे, असे नाही. अंगभूत कला आहे किंवा कलेचा वारसा मिळाला आहे म्हणून तोच पुढे नेण्यात धन्यता मानणार्‍यांची संख्या अधिक असताना, दूर कुठे तरी बीडमधल्या माळेगावसारख्या छोट्याशा खेड्यातून आलेल्या मधु कांबीकर यांनी सत्तरच्या दशकात स्वत:हून आपली वाट निर्माण केली.

कला क्षेत्रात त्यांनी पदार्पण केले ते लोककलावंत म्हणून. पुढे रंगभूमीवर स्वत:ला कलाकार म्हणून अजमावले आणि नंतर चित्रपट आणि मालिकांतून स्वत:ची विशेष ओळख निर्माण केली, तीदेखील त्या क्षेत्रात कोणीही पाठीराखा नसताना. तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी केलेल्या भूमिका आणि लावणीला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी उभारलेले कार्य विलक्षण होते, मात्र त्यांच्या कामाचे हवे तसे कौतुकही झाले नाही आणि त्यांनीही कधी प्रसिद्धी-वलयाचा हव्यास धरला नाही.

मधु कांबीकर यांचे वडीलही लोककलावंत होते, त्यामुळे वग, गवळण आदी पारंपरिक कलाक्षेत्राशी त्यांची लहानपणापासूनच तोंडओळख होती. पण लोककलावंत म्हणून पुढे जाण्याचा निर्णय घेताना फक्त लावणी नृत्य शिकायचे आणि मग पायात घुंगरू बांधून उभे राहायचे, हा माफक दृष्टिकोन त्यांनी ठेवला नाही. लहानपणापासून शिस्तबद्ध पद्धतीने स्वत:ला घडवले. शिक्षणात आपल्याला फारसा रस नाही, हे उमजून त्यांनी सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.

अकराव्या वर्षी त्यांनी पुण्यात बाळासाहेब गोखले यांच्याकडे कथ्थक नृत्याचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर तीन वर्षांनी त्यांनी गुरू पांडुरंग घोटकर आणि लावणीसम्राज्ञी लक्ष्माबाई कोल्हापूरकर यांच्याकडून लावणी नृत्याचे धडे घेतले. लावणी म्हणजे फक्त नृत्य नव्हे, त्यामागे परंपरा आहे, इतिहास आहे, गीतांमध्ये भाषिक सौंदर्य आहे, नृत्यात लय आहे या सर्‍याची जाण आणि भान मधु कांबीकर यांनी शेवटपर्यंत जपले. त्यामुळेच कदाचित लावणी-तमाशा हे कलाप्रकार दूरचित्रवाणी आणि अन्य माध्यमांच्या प्रभावात लोप पावत आहेत, याची जाणीव झाली तेव्हा त्यांनी स्वत: लावणीच्या लिखित इतिहासाच्या नोंदी जमवून त्या अभ्यासण्यास सुरुवात केली. त्यावर आधारित ‘सखी माझी लावणी’ हा कार्यक्रम त्यांनी ‘मधुप्रीतम’ या स्वत:च्या संस्थेच्या माध्यमातून सुरू केला.

पेशवेकालीन पारंपरिक लावणी आणि त्याचा इतिहास लोकांसमोर आणण्याचे काम त्यांनी केले. लोककलावंत म्हणून कलेचा वारसा जपण्यासाठी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठीही त्यांनी केलेले अभ्यासप्रयत्न हे उल्लेखनीय आहेत. ‘शापित’सारख्या चित्रपटात ग्रामीण ढंगात बोलणार्‍या नायिकेसाठी झालेली त्यांची निवड त्यांनी सार्थ ठरवली. बोलण्यात ग्रामीण हेल असणे पुरेसे नाही, हे लक्षात घेऊन त्यांनी गरीब वाडी-वस्तीवर राहणार्‍या ्त्रिरयांचे निरीक्षण या भूमिकेसाठी केले.

चित्रपटाआधीही त्यांनी नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या पाठिंब्याने ‘पुत्रकामेष्टी’ नाटकातून रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे केवळ ग्रामीण भाषा नव्हे, तर प्रमाण शहरी मराठी भाषेवरही त्यांनी प्रभुत्व मिळवले. राजदत्त, दादा कोंडके ते नंतरच्या काळात महेश कोठारे यांच्यासारख्या नव्या तंत्राने सिनेमा करू पाहणार्‍या दिग्दर्शकांबरोबरही जुळवून घेत त्यांनी काम केले. काळाबरोबर कलाकाराला स्वत:त बदल घडवावे लागतात, त्यासाठी मुळात सतत शिकण्याची आणि नवे काही अजमावून पाहण्याची आस कलाकारामध्ये असावी लागते. मधु कांबीकर यांची कलेशी जुळलेली ही नाळ घट्ट होती आणि म्हणूनच त्यांच्या प्रत्येक कामातून आणि भूमिकेतून त्यांनी लोकांच्या मनात आपली जागा निर्माण केली. यापुढेही त्यांची तीच प्रतिमा चाहत्यांच्या मनात चिरंतन राहील.