तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाच्या आदेशाने भाजपला आयतेच बळ मिळाले आहे. टेकडीवरील एका मंदिराबाहेर दीपप्रज्वलन करण्यापुरताच हा विषय मर्यादित, पण त्याचे राजकीय, धार्मिक परिणाम राज्याच्या राजकारणावर खोल परिणाम करणारे आहेत. तमिळनाडूच्या राजकारणावर पारंपरिक द्रविडी संस्कृतीचा पगडा. राज्यात द्रविडी संस्कृती विरुद्ध सनातन धर्म हा जुना वाद आहे. सनातन धर्म म्हणजे वर्णव्यवस्था, अशी टीका द्रविडी संस्कृतीचा पुरस्कर्त्यांकडून केला जातो. तमिळनाडूत समाजसुधारक पेरियार, अण्णा दुराई यांनी बुद्धिप्रामाण्यवाद, सामाजिक न्यायाचा पुरस्कार करताना वर्णव्यवस्थेच्या विरोधात चळवळ उभारली. द्रविडी संस्कृतीचा पुरस्कार करणारे आणि वर्णव्यवस्थेला विरोध करणारे द्रमुक किंवा अण्णा द्रमुक गेली ५० वर्षे राज्यात सत्तेत आहेत. रामजन्मभूमी चळवळीनंतर देशाच्या राजकारणाला वेगळे वळण लागले. पण तमिळनाडूचा त्याला अपवाद होता. द्रविडी संस्कृतीची एवढी घट्ट पाळेमुळे या राज्यात रोवली गेली आहेत. तमिळनाडूत शिरकाव करण्याकरिता भाजपने सनातन धर्माला अधिक महत्त्व दिले. तमिळनाडूत पक्षाची ताकद वाढविण्यासाठी मतांच्या ध्रुवीकरणावर भाजपने पद्धतशीरपणे भर दिला. गेली चार वर्षे वाराणसीमध्ये केंद्र सरकारच्या पुढाकारने ‘काशी तमिळ संगम’चे आयोजन केले जाते. तमिळनाडूतून विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी अशा विविध घटकांना सरकारी खर्चाने वाराणसीमध्ये नेले जाते. मंदिरे, घाटांना भेटी असा कर्यक्रम असतो. तमिळनाडूतील तरुण वर्गात हिंदू संस्कृतीबद्दल आत्मीयता वाढावी व भविष्यात राज्यात भाजपची ताकद वाढावी हा या संगमामागील मूळ उद्देश. त्यासाठी सांस्कृतिक देवाणघेवाणीचे कारण दाखविले जाते. अशा या काशी तमिळ संगमचा चौथा महोत्सव अलीकडेच पार पाडला.

तमिळनाडू विधानसभेची निवडणूक लवकरच होऊ घातली आहे. या राज्यात स्वबळावर यश मिळत नाही हा भाजपचा अनुभव. लोकसभेत स्वबळावर लढताना पक्षाला एकूण मतांच्या ११ टक्के मते मिळाली, पण एकही उमेदवार विजयाच्या समीप जाऊ शकला नाही. अर्थात, भाजपच्या मतांच्या टक्केवारीत झालेली वाढ ही तेथील प्रादेशिक पक्षांसाठी भविष्यातील धोक्याचा इशारा मानला जातो. एकटे लढून फायदा होत नाही म्हणून भाजपने यंदा अण्णा द्रमुकबरोबर युती केली आहे. तरीही आपली ताकद वाढवण्यासाठी मदुराईमधील वादाचा फायदा उठविण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू झाला आहे. मदुराईमध्ये थिरुपरनकुंद्रम टेकडीवरील सुब्रमण्यम स्वामी मंदिराबाहेर दीपप्रज्वलन करण्याच्या उच्च न्यायालयाच्या एकल न्यायमूर्तींनी दिलेला आदेश मदुराई खंडपीठाने कायम ठेवला. प्रश्न एका मंदिराबाहेरील दीपप्रज्वलनाचा असला तरी त्याला अनेक राजकीय कंगोरे आहेत. या टेकडीवर सुब्रमण्यम स्वामी मंदिर, सिकंदर बादशहा दर्गा आणि जैन मंदिर आहे. या धार्मिक स्थळाबाहेर १६ ते १८ व्या शतकातील दोन दगडी खांब आहेत. टेकडीच्या मध्यभागी असलेल्या खांबावर दीपप्रज्वलन केले जाते. पण काही हिंदू संघटनांनी सिकंदर बादशहा दर्ग्याबाहेरील खांबावर दीपप्रज्वलन करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यासाठी त्या न्यायालयात गेल्या. ‘दीपप्रज्वलन करू न दिल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो’ या मुद्द्यावर उच्च न्यायालयाने सरकारला खडसावले. तसेच आधीच्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही म्हणून सरकारची कानउघाडणी केली. निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या या निकालाने सत्ताधारी द्रमुकची अडचण झाली आहे, तर भाजपला एक प्रकारे बळच मिळाले आहे. दीपप्रज्वलनाची परवानगी देण्यात आली ती जागा सिकंदर बादशहा दर्ग्याच्या बाहेर आहे. यातूनच राज्य सरकारने तेथे दीपप्रज्वलन करण्यास बंदी घातली होती. या जागेत दीपप्रज्वलन करून दिल्यास शांतता धोक्यात येऊ शकते हा द्रमुक सरकारचा दावा आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी तमिळनाडू सरकारने सुरू केली आहे. मदुराई हा पट्टा पारंपरिकदृष्ट्या अण्णा द्रमुकचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपला याच पट्ट्यात अधिक यशाची अपेक्षा आहे.

भाजपकडून द्रमुकचा सनातन धर्मविरोधी शक्ती असाच उल्लेख केला जातो. ‘सनातन धर्माचे निर्मूलन झाले पाहिजे’ असे विधान मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे उपमुख्यमंत्री पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी केले होते. त्यावरून वाद उफाळून आला होता. द्रमुक हा हिंदूविरोधी पक्ष असल्याची टीका भाजपकडून केली जाते. तमिळनाडूची निवडणूक मुख्यमंत्री स्टॅलिन तसेच द्रमुकसाठी महत्त्वाची आहे. पेरियार किंवा अण्णा दुराई यांच्यामुळे तमिळनाडूत हिंदीविरोधाबरोबरच सामाजिक सुधारणांची चळवळ उभी राहिली. अशा द्रविडी संस्कृतीला छेद देत सनातन धर्माचा प्रभाव वाढविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. अशा वेळी मदुराईमधील दीपप्रज्वलनाचा मुद्दा भाजपला तारक ठरू शकतो.