‘बाईबळीवर बोळवण?’ हा अग्रलेख (२३ मार्च) वाचला. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत राज्यात विविध ठिकाणी शेकडो प्रकरणे दाखल झालेली आहेत आणि अनेक प्रकरणांत भोंदू बुवांना शिक्षादेखील ठोठावण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे अशा बर्याच प्रकरणांमध्ये महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते बुवा-बाबांच्या शोषणाचे बळी ठरलेल्या लोकांना गुन्हा दाखल करण्यासाठी मदत, मार्गदर्शन करतात आणि प्रकरणांचा पाठपुरावा करतात.
अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सरकार (कोणत्याही पक्षाचे असो) किती उदासीन आहे याची प्रचीती पुढील बाबींवरून लक्षात येते:
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर हा कायदा पारित झाल्यावर कायद्याअंतर्गत नियम करणे आवश्यक आहे. परंतु सरकार याबाबत काहीही पावले उचलत नसल्याने या नियमांचा मसुदा अंनिसने ‘बार्टी’ आणि ‘यशवंतराव चव्हाण सेंटर’ येथील विशेषज्ञांच्या मदतीने तयार करून सरकारकडे काही वर्षांपूर्वी सादर केला आहे. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूनही हे नियम अद्याप जारी करण्यात आलेले नाहीत.
या कायद्यानुसार पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलनविषयक विशेष कक्ष स्थापन करून एक दक्षता अधिकारी नेमणे आवश्यक आहे, ज्या योगे अंधश्रद्धा प्रकरणांवर विशेष लक्ष देता येईल, परंतु किती पोलीस ठाण्यांनी असे कक्ष स्थापून दक्षता अधिकारी नेमले हा संशोधनाचा विषय आहे. या कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अंनिसतर्फे पोलिसांसाठी प्रशिक्षणे आयोजित केली जातात. या कायद्याअंतर्गत स्थापित विशेष समितीची बैठकच कित्येक वर्षांत झालेली नाही, असे या समितीचे सदस्य सांगतात.
प्रबोधन करणार्या अंनिस कार्यकर्त्यांना सनातनी प्रवृत्ती व्यक्तींकडून प्रखर विरोधाचा सामना करावा लागतो. बदनाम केले जाते. काही काळापूर्वी सत्ताधारी पक्षाच्या एका आमदारांनी अंनिस कार्यकर्त्यांना नवीन जनसुरक्षा कायदा लावण्याची मागणी केली होती. सरकार या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत गंभीर नसल्याचे दिसते. एसआयटी वगैरे नेमली असली तरी या प्रकरणात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे अनेक नेते गुंतलेले असल्याने, पुढे राम रहीम किंवा आसाराम प्रकरणांत जे झाले ते या प्रकरणातदेखील होईल अशी भीती वाटते. अंधश्रद्धा निर्मूलन किती अवघड झाले आहे हे यावरून लक्षात येईल. – उत्तम जोगदंड (कल्याण)
गर्जेल तो बरसेल काय?
‘बाईबळीवर बोळवण?’ हा अग्रलेख वाचला. भोंदूबाबा अशोक खरात याच्या पट्टशिष्य राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या केवळ राजीनाम्याने भागणार नाही. भोंदूबाबांशी ज्यांची तथाकथित वलयांकितांची नावे जोडली गेली आहेत त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाणे गरजेचे आहे. रुपाली चाकणकरांसारख्या अनेकांची ऊठबस या भोंदूबाबांकडे असल्यामुळेच सामान्यही त्याच्याकडे ओढले गेले. आता मुख्यमंत्र्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेतला आहे, पण तपास यंत्रणांनी कसा तपास करायचा, याचे अप्रत्यक्ष निर्देशच राज्याचे कारभारी देत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. कोणालाही पाठीशी घालणार नाही, गय करणार नाही, सोडणार नाही अशा गर्जना केल्या जातात, मात्र काही काळाने त्या हवेत विरलेल्या दिसतात. त्यामुळे गर्जेल तो बरसेल काय, असा प्रश्न पडतो. – श्रीकांत जाधव, अतीत (सातारा)
अंधश्रद्धांच्या गर्तेत नेणारे राजकारण
‘बाईबळीवर बोळवण?’ हा अग्रलेख (लोकसत्ता- २३ मार्च) वाचला. भक्तांची व जनतेची दिशाभूल करणार्या, ‘चमत्कार हेच आपले ओळखपत्र’ असा दावा करणार्या एका तथाकथित गुरूची पाद्यपूजा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारी बंगल्यावर यापूर्वी झाली आहे. नंतरच्या काळात हा गुरुमहिमा उत्तरोत्तर वाढत गेला. अगदी धार्मिक विद्वेष, अंधश्रद्धा पसरवणार्यांबाबत ‘आमचे वंदनीय गुरू’, असे भर विधानसभेत म्हणण्यापर्यंत सत्ताधार्यांची मजल गेली. वादग्रस्त धार्मिक गुरूंचा जथा मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या मंचावरही जमवला गेला. त्यातून धर्म आणि राजकारणाची अभद्र युती भद्र करून घेण्यात आल्याचा स्पष्ट संदेश महाराष्ट्राला मिळाला. धार्मिक प्रवचनांना होणार्या लाखोंच्या गर्दीचा राजकारणासाठी वापर होऊ लागला. अनैतिक, संशयास्पद व्यवहार करणार्या राजकारण्यांचे भक्कम पाठबळ बाबा-बुवांना मिळत गेले. त्यामुळे सामान्य जनतेची अगतिकता, अज्ञान अशा पोषक वातावरणात बुवाबाजीचे पीक फोफावले नसते तरच नवल. ‘श्रद्धा दुखवल्या जातील’ या सबबीखाली प्रश्न विचारणे खुंटले. महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात असूनही भोंदूगिरीचे असे प्रकार घडतात, कारण समाजाला अंधश्रद्धांच्या गर्तेत नेणारे राजकारण, हे आहे. – राजेंद्र फेगडे, नाशिक
सर्व संबंधितांचे राजीनामे घ्या!
‘बाईबळीवर बोळवण?’ हा अग्रलेख (२३ मार्च) वाचला. सध्या बुवा-बापू यांची चलती आहे, कारण देशातील व राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांचे नेते भोंदूबाबांच्या मागे लागले आहेत. त्यांच्यावर राजकारण्यांचा वरदहस्त असल्याने त्यांनी आपले हातपाय पसरले आहेत. ज्या राजकीय नेत्यांच्या पाठिंब्यावर भोंदूबाबांची असे कारनामे करण्याची हिंमत होते, त्या सर्व राजकीय नेत्यांची ही काळी बाजू लोकांपर्यंत आली पाहिजे. त्यांचे वास्तव अंधभक्तांनाही कळले पाहिजे. नेत्यांनाही अद्दल घडवली पाहिजे. चाकणकर यांचा राजीनामा ही केवळ मलमपट्टी आहे. भोंदू खरातने अनेक सरकारी अधिकारी व राजकीय नेत्यांना हाताशी धरून जी काळी माया जमवली आहे, त्याच्या पापाच्या वाटेकर्यांनाही शिक्षा झाली पाहिजे. पुरोगामी महाराष्ट्राच्या विधिमंडळात शाहू, फुले, आंबेडकर यांची नावे घेऊन राजकारण करायचे आणि अशा भोंदूबाबांच्या पायावर डोके ठेवायचे, हा दुटप्पीपणा आहे. मुख्यमंत्री महोदयांनी प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सर्व संबंधितांचे राजीनामे घ्यावेत, तरच पीडित महिलांना खरा न्याय मिळेल. त्यासाठी या प्रकरणाची सखोल व निष्पक्षपाती चौकशी करावी. – प्रा. जयवंत पाटील, भांडुप (मुंबई)
श्रद्धा हे प्रतिमानिर्मितीचे साधन?
नेतेच बाबांकडे जात असतील तर जनता तेथे जाणारच, हे लक्षात घेतले पाहिजे. आजकाल धार्मिक कार्यक्रम आयोजित करून, जनतेत मी किती श्रद्धाळू आहे, असे दाखविण्याचा प्रयत्न सर्वपक्षीय व सर्वधर्मीय नेते करताना दिसतात. यातून ते जनतेत लोकप्रिय होण्याचा मार्ग शोधत असतात, पण आपले आचार, विचार शुद्ध असतील व त्यात प्रामाणिकपणा असेल तर आपणास आपोआप लोकप्रिय होता येईल, त्यासाठी बाबा-बापूंचा आधार घेण्याची गरजच राहणार नाही, हे शाहू, फुले, आंबेडकरांनी सांगितलेले त्रिकालाबाधित सत्य, नेत्यांना जेव्हा समजेल, तो सुदिन ठरावा. – प्रदीप करमरकर, ठाणे</strong>
खेळात राजकारण न आणणेच योग्य
‘गावस्करांचा अनाठायी तळतळाट’ हा ‘अन्वयार्थ’ (२३ मार्च) वाचला. सुनील गावस्कर यांनी आणि आपल्या सरकारनेही खेळात राजकारण आणणे पटत नाही. क्रिकेटच्या खेळात पाकिस्तानी खेळाडूंशी आपले खेळाडू हस्तांदोलन करत नाहीत. बांगलादेशी खेळाडूंना आपल्या देशात होणार्या आयपीएलमध्ये सहभागी होता येत नाही. हे सर्व काय चालले आहे? या दोन देशांशी आपले राजकीय संबंध बरे नाहीत म्हणून? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा हे आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. निदान त्यांनी तरी हे टाळले पाहिजे. यामुळे दोन देशांतील तेढ वाढतच जाणार आहे. राजकारण आणि खेळ हे एकमेकांपासून दूर ठेवणेच योग्य आहे. खेळात भावनिक मुद्दे आणि राजकारण नकोच! – प्रभाकर कदम, मुलुंड
गावस्कर यांची भूमिका दुटप्पी!
‘गावस्करांचा अनाठायी तळतळाट’ हा ‘अन्वयार्थ’ वाचला. गावस्कर हे रमीज राजा, वसीम आक्रम यांच्याबरोबर समालोचन करतात त्यावेळी रमीज आणि आक्रम यांना जे काही मानधन मिळते त्यावरील टॅक्सही पाक सरकारलाच मिळतो हे गावस्करांना माहीत नाही काय? गावस्करांना ते खुपत नाही? हा निव्वळ दुटप्पीपणा नव्हे का? सूर्यकुमार यादवसारख्याने काहीतरी बरळणे आणि गावस्करसुद्धा आता तसेच काही बोलू लागणे हा ‘नवीन भारत’ आहे. – शेखर कारेकर, कोल्हापूर</strong>
