‘विकासग्रस्तांची विदारक वाताहत’ हे संपादकीय (लोकसत्ता- १ मे ) वाचले. मुंबई मनपाची सत्तासुद्धा भाजपाकडे आल्यामुळे विकासकामांना बहर येऊन त्यामुळे होणारे वायुप्रदूषण, पूरसदृश स्थिती याचे निवारण कसे करणार, कचर्‍याचे व्यवस्थापन कसे करणार, याची उत्तरे मिळत नाहीत. सामान्य माणसाला मेट्रो परवडेल का, याचा विचार नाही. रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याची सरकारची तत्परता वाखाणण्याजोगी आहे. मनपाच्या रुग्णालयातील औषधांचा साठा संपलेला असतो. उपकरणे अडगळीत पडून असतात, तरीही लोढा केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यात धन्यता मानतात. मनपाच्या शाळांची डागडुजी करण्यासाठी निधी नाही. पण महापौर बंगल्याच्या दुरुस्तीसाठी साडेतीन कोटी रुपयांची तजवीज करण्याची शासनाला घाई आहे.

– प्रशांत कुळकर्णी, कांदिवली (मुंबई)

मूळ प्रश्न अनुत्तरितच

‘विकासग्रस्तांची विदारक वाताहत’ हे संपादकीय वाचले. विकासाच्या नावावर प्रत्यक्षात जनतेस नागवले जात असताना, त्यांना त्याची पुसटशीही कल्पना नाही. या नागवण्याचा उत्सव मांडण्याचा महापराक्रम आपले राजकारणी घडवतात व विवेकशून्य जनता त्यात हिरिरीने भाग घेते, यास काय म्हणावे? आर्थिक, सामाजिक व वैचारिक दारिद्र्य महाराष्ट्रात सर्वत्र ओसंडून वाहत आहे. विदारकतेकडे कानाडोळा करून गगनचुंबी इमारती, चकाचक मेट्रो, बुलेट ट्रेन, करदात्याच्या जिवावर उभे राहणारे अवाढव्य पुतळे, यासमवेत स्वत:ची चित्रफीत माध्यमांवर मिरवण्यात धन्यता मानली जात आहे. नारीशक्तीचा गजर केला जातो, पण त्यांच्यासाठी गेल्या दशकभरात किती नवीन स्वच्छतागृहे उभारली? ‘लाडक्यां’ना भोंदू बाबा खरातच्या आश्रयास जावे असे का वाटत असेल? दवाखान्याच्या खर्च त्यांच्या आवाक्याबाहेर तर जात नसेल ना? त्यांना पाण्यासाठी मैलोमैल पायपीट का करावी लागते? मायबाप सरकारने ८० कोटी जनतेस फुकट धान्य वाटल्याने आणखी कितीसा विकास होणार? कोणत्याही प्रश्नाची उत्तरे मिळत नाहीत.

– ललित अंबळकार, अकोला</strong>

हे राजकीय बधिरीकरण

प्रा. प्रबोधन पोळलिखित ‘स्मरणाचा आग्रह, चिकित्सेची भीती’ हा लेख (१ मे) वाचला. हा लेख महाराष्ट्राला लावल्या जाणार्‍या पुरोगामी या बिरुदाला प्रश्नांकित करतो. सांप्रत काळी समाजसुधारक जातीपातींत वाटून घेण्यात आले आहेत. सुप्रसिद्धी आणि कुप्रसिद्धी यातील ता्त्विवक भेद नष्ट करण्यात आला आहे. सर्वसामान्यांना अत्यंत वरवरच्या, जाती-धर्माच्या व अस्मितेच्या प्रश्नांमध्ये गुरफटवून यातून आलेल्या गुंगीमुळे त्यांना बेरोजगारी, महागाई, रुपयाचे अवमूल्यन, सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग, निवडणुकांपुरती मर्यादित नवनैतिकता इत्यादी प्रश्नांपासून दूर ठेवणे सोपे जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हा केवळ अस्मितेचा विषय म्हणून मर्यादित ठेवणे योग्य नाही. त्यांच्या या विचारांची प्रासंगिकता आजच्या राजकारणाची होत जाणारी पडझड पाहता रोज अधोरेखित होणे गरजेचे आहे. समाजमाध्यमी ज्ञानालाच अंतिम सत्य मानणारी पिढी राजकीय आक्रस्ताळेपणाला सत्य मानत आहे. यातून विवेकशून्य मतदार तयार करण्याचे ध्येय लोकशाहीला वाळवी लावत आहे.

– डॉ. आशिष मुठे, सहायक प्राध्यापक, राधादेवी गोयंका महिला महाविद्यालय

आरक्षण धसास लावावे लागेल

राज्यात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली. रखडलेली जनगणना १५ वर्षांनी होणार आहे. हे देशाच्या हिताच्या रूपरेषा आखण्याचे उत्तम साधन व संधी आहे, पण ती जनगणना झाल्यावर नंतरचे राजकारण हाच कळीचा विषय ठरणार आहे. मुख्य म्हणजे ही जनगणना हा देशाच्या आर्थिक विकासाचा व सामाजिक योजनांच्या आकडेवारीचा आरसा ठरेल. ३३ प्रश्नांना उत्तरे देणे ही परीक्षाच. स्वगणना हे नावीन्य आहे, परंतु त्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. जातनिहाय जनगणना होणार असल्यामुळे चिघळत असलेला आरक्षणाचा मुद्दाही सरकारला धसास लावावा लागेल.

– श्रीनिवास डोंगरे, दादर (मुंबई)