‘बरेच काही ‘मिसिंग’!’ हा अग्रलेख वाचला. आमच्या मराठवाड्यात एक म्हण आहे, ‘नाचता येईना अंगण वाकडं’, इथं मात्र अंगणही वाकडं आणि नाचही बोंबललेला. नियोजनाचा अभाव, कंत्राटदारांची मनमानी आणि शेवटी दोष मात्र पाऊस, वारा किंवा निसर्गावर ढकलला जातो. निसर्गाला दोष देणं सोपं आहे; पण निकृष्ट कामाची जबाबदारी कोण घेणार?

रस्त्यांचं काँक्रीटीकरण हा विकासाचा भाग असू शकतो; मोठमोठी, वर्षानुवर्षं उभी असलेली झाडं कोसळत असतील, तर तो विकास नव्हे, तर भविष्याशी केलेला अन्याय आहे. शहरात उष्णता वाढते, पावसाचं पाणी मुरत नाही, पूरस्थिती निर्माण होते आणि मग त्यावर पुन्हा नव्या प्रकल्पांची घोषणा होते. हे दुष्टचक्र थांबायलाच तयार नाही. पण सामान्य नागरिकांनी प्रश्न विचारणं थांबवलं, निकृष्ट काम स्वीकारलं, तर ही परिस्थिती कधीच बदलणार नाही. या तथाकथित विकासासाठी वापरला जाणारा प्रत्येक रुपया जनतेचा आहे. त्याचा हिशेब मागण्याचा पूर्ण अधिकार जनतेला आहे. विकास म्हणजे फक्त सिमेंट, लोखंड आणि प्रचंड खर्च करून उभारले जाणारे अवाढव्य प्रकल्प नव्हेत; विकास म्हणजे सुरक्षित रस्ते, जपलेली झाडं, नियोजनबद्ध शहरं, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांचा विश्वास.

अक्षय गायसमुद्रे, छत्रपती संभाजीनगर

निसर्ग वास्तव उघडे पाडतोच

‘बरेच काही ‘मिसिंग’!’ हा अग्रलेख वाचला. पर्यावरणप्रेमी सरकारला सांगून थकतात, मात्र नेते हा मुद्दा मतपेढीला आकर्षित करणारा नाही, म्हणून दुर्लक्ष करतात. सरकार काहीच गांभीर्याने घेत नाही, मग दुर्घटना कितीही गंभीर असो. मुद्दा जातीय, धार्मिक असल्यास तिथे मात्र गांभीर्य दिसते. नेत्यांना ठाऊक आहे की मतदारांची मानसिकता गुलामगिरीची आहे. ते मुद्दे विसरून जाऊन पुन्हा जाती धर्माच्या नावाने आपल्याच सभांना गर्दी करणार. अर्थव्यवस्थेविषयी कितीही बाता मारल्या, तरीही निसर्ग वास्तव उघडे पाडतोच.

सुरज तलमले, कोलारी, ता. ब्रम्हपुरी (जि. चंद्रपूर)

नैतिकतेची नीचांकी पातळी

‘बरेच काही ‘मिसिंग’!’ हा अग्रलेख वाचला. राजकारणातील नैतिकतेने गाठलेली नीचांकी पातळी यातून अधोरेखित होते. राजकारणात टिकून राहण्यासाठी सत्ताधारी निसर्गाची आणि पर्यायाने मानवी समाजाची अपरिमित हानी करत आहेत. जीवनमानाचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला आहे. राजकर्ते आणि सरकारी यंत्रणा अनेक बाबतीत कुचकामी ठरत आहेत. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी सतत वाढत असून भ्रष्टाचाराने अत्यंत भीतीदायक स्वरूप धारण केले आहे. तो आता सर्व सीमा ओलांडून धार्मिक क्षेत्रे आणि मोठ्या सामाजिक उपक्रमांपर्यंतही पोहोचला असून त्यांनाही आपल्या विळख्यात घेत आहे. समाजाने आणि सत्ताधार्‍यांनी या इशार्‍याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.

भालचंद्र देबडवार, छत्रपती संभाजीनगर

काल्पनिक यशाचा उन्माद

‘बरेच काही ‘मिसिंग’!’ हा अग्रलेख वाचला. विचार करण्याची क्षमता किंबहुना इच्छाशक्ती आणि संवेदनाच जर बोथट झाल्या असतील तर आपण स्वत:सुद्धा कधी तरी ‘मिसिंग’ होऊन जाऊ याची जाणीवच संपते. मग उरतो फक्त उन्माद आणि तोसुद्धा काल्पनिक यशाचा. कल्पना आणि वास्तव यांच्यातला फरक अनंतकाळ लपून राहात नाही, पण वास्तव समोर येईपर्यंत परतीची वाट हरवलेली असते.

वसंत बंग

उत्तरदायित्वच ‘मिसिंग’

‘बरेच काही ‘मिसिंग’!’ हा अग्रलेख वाचला. गेल्या काही वर्षांपासून आपण अनेकदा निसर्गाचे रौद्र रूप पाहत आलो आहोत. या नैसर्गिक चक्रातील असमतोलामुळे आज अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे, पण यामागील मूळ कारण मानवाचा निसर्गात वाढलेला हस्तक्षेप हे आहे. अवाढव्य विकास प्रकल्पांचे वाढते ओझेच पर्यावरणाच्या दयनीय अवस्थेस कारणीभूत आहे. काँक्रीटीकरणाच्या ध्यासामुळे पर्यावरणाचा र्‍हास होत असूनदेखील डोळ्यांवर कातडे ओढल्यासारखे वातावरण आहे. विकास प्रकल्प राबवताना पर्यावरणाप्रति संवेदना आणि उत्तरदायित्वच ‘मिसिंग’ आहे. हा निसर्गाचा प्रकोप आहे, म्हणून आपलेच घोडे पुढे दामटवणे व्यर्थ असून योग्य उपाययोजना होणे गरजेचे आहे.

श्रुतिका झगडे, मंडणगड (रत्नागिरी)

एवढी बांधकामे अपरिहार्यच आहेत का?

‘बरेच काही ‘मिसिंग’!’ हा अग्रलेख वाचला. मिसिंग लिंकचे घाईने उद्घाटन करण्याची गरज काय होती? मान्सून अगदी जवळ आहे, हे सर्वांनाच माहीत होते. सरकारचा स्वत:बद्दलचा अनाठायी आत्मविश्वासच याला कारणीभूत नव्हे का? मुंबई आणि ठाण्याच्या आत आणि आजूबाजूला प्रचंड बांधकामे होत आहेत, हे सर्व एकाच वेळी आवश्यक आहे का? काही लोकांचे खिसे भरण्यासाठी हे सुरू आहे, हे स्पष्टच दिसते.

आम्ही राहतो तिथे १० उंच इमारती आणि ठाणे-बोरिवली बोगदा ही सर्व कामे एकाच वेळी आणि वेगाने सुरू आहेत. हे बांधकाम थांबवता आले नसते? आता हे पुरेसे नव्हते म्हणून, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानही महानगरपालिकेच्या ताब्यात जाणार, असे दिसू लागले आहे. हे शहरी जंगल मुंबई आणि ठाण्याला प्राणवायू पुरवते. ते जैवविविधतेने समृद्ध आहे. राजकीय लॉबीला हे समजत नाही का? नैसर्गिक जंगल कापून मानवनिर्मित बाग बनवण्याचा अट्टहास कशासाठी? हे सर्व थांबवले पाहिजे, अन्यथा पुढच्या पिढ्यांना प्रत्यक्षात जंगल आणि झाडे पाहताच येणार नाहीत.

माधवी माउस्कर खार्शिकर, ठाणे</strong>

खरे प्रश्न विचारले जाऊ नयेत म्हणून…

‘खरोखरच, हिंदू खतरे में है!’ हा लेख (७ जुलै) वाचला. लेखात म्हटल्याप्रमाणे भारतीय नागरिकांसमोरील खरी आव्हाने बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई, परीक्षा गैरव्यवहार, प्रदूषण आणि ढासळती शिक्षण व्यवस्था ही असून याकडे जनतेचे दुर्लक्ष व्हावे व सत्य परिस्थितीवर कोणी बोलू नये म्हणून हे सत्ताधारी राजकारणी धर्माचा आधार घेतात.

मुळात हिंदू बहुसंख्य असणार्‍या राष्ट्रात ‘हिंदू खतरे में है’ म्हणणे किती विनोदी आहे. अखंड भारतात अनेक मुस्लीमबहुल देश होते, भारतावर अनेक वर्षे मुघलांनी राज्य केले, तरीदेखील जर हिंदू धर्म व हिंदू लोक नष्ट झाले नाहीत तर आता हिंदुबहुल देशात हिंदूच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल का? अशा विधानांचा तार्किक दृष्टीने विचार केला पाहिजे. नक्की धोका कोणापासून आहे, याचा विचार केला गेला पाहिजे. जनता सरकारला जाब विचारणार नाही, तोपर्यंत धर्माच्या नावाखाली राजकारणी जनतेचे लक्ष विचलित करतच राहतील व मूळ प्रश्न बाजूला राहतील.

सई खैरे, नाशिक

पोटापाण्याची एवढी घाई कशासाठी?

‘खरोखरच, हिंदू खतरे में है!’ हा लेख वाचला. शीर्षकाच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह बघून छान वाटले; तेथे प्रश्नचिन्ह असते तर कदाचित भावना दुखावल्या असत्या! पण संपूर्ण लेखात बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि अर्थव्यवस्था असे शब्द दिसले. अहो, हिंदूंचा आणि या क्षुल्लक गोष्टींचा काय संबंध?

आपल्याला आता ‘विश्वगुरू’ व्हायचे आहे, त्यामुळे ख्रिश्चन, इस्लाम आणि इतर सर्व धर्मांच्या लोकांना बरोबर घ्यावेच लागेल. देशाला केवळ ‘हिंदूंचा देश’ म्हणवून एका समाजापुरते संकुचित करायचे आणि आपले पाय ओढायचे, हे विरोधकांचेच कारस्थान वाटते. त्यामुळे कोणी ‘हिंदू खतरे में है’ अशी आरोळी देतही असेल, तर त्याकडे आता आपण दुर्लक्षच करायला हवे. कारण ‘विश्वगुरू’ होण्याच्या मार्गावर असलेल्यांना अशा घोषणांमध्ये अडकवणे, हा त्यांच्या जागतिक प्रतिमेवरचा अन्याय म्हणावा लागेल!

बाकी, एकदा का आपण ‘विश्वगुरू’ झालो, की मग आपल्याकडे वेळच वेळ आहे! त्यानंतर निवांतपणे बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचारासारखे लेखात मांडलेले हे प्रश्न आपण सोडवत बसू. तोपर्यंत या प्रश्नांना जरा बाजूलाच राहू द्या!

विशाल कुंभार, कोल्हापूर</p>