अलीकडच्या वातावरणात देशभरातील गांधीवादी संस्था एकट्या पडल्या आहेत. त्यांच्या मोक्याच्या जागांवर अनेकांचा डोळा आहे. अशा स्थितीत सर्वांनी एकोप्याने राहणे व गांधीविचारातून निर्माण झालेले संस्थात्मक संचित राखणे केव्हाही महत्त्वाचे…

पुण्यातील जुन्याजाणत्यांच्या वर्तुळात मामा देवगिरकर हे नाव आजही परिचित आहे. कट्टर पटेलभक्त ही त्यांची पहिली ओळख. एक साधा स्वातंत्र्यसैनिक म्हणून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग नोंदवला व स्वातंत्र्यानंतर अवघे आयुष्य गांधी विचाराच्या प्रसाराला वाहून घेतले. आज पुण्याचे हृदय असलेल्या कोथरूडमध्ये दिमाखात उभ्या असलेल्या गांधी स्मारक निधीचा इतिहास मामांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.

गांधीविचारांना मराठीत आणण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या कार्यकाळात एकूण दहा खंड प्रकाशित झाले. भारताचे संविधान मराठीत आणण्याचे श्रेय मामांनाच. नेहरूंच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’चा मराठी अनुवादही त्यांनीच केला. यातला शिवाजी महाराजांविषयीचा आक्षेपार्ह उल्लेख नेहरूंना काढायला लावणारे मामाच. ते गोडसेला ओळखायचे. त्याचे विचारही त्यांना कळले होते पण तो असे काही पाऊल उचलेल याचा अंदाज त्यांना आला नाही. त्यामुळे गांधीहत्येनंतर मामा खूप हळहळले. ही सल त्यांना आयुष्यभर बोचत राहिली.

गांधींची हत्या झाल्यावर त्यांचे काम संस्थात्मक पद्धतीने पुढे नेण्यासाठी नेहरू, पटेल व राजेंद्रप्रसादांच्या पुढाकारातून ‘गांधी स्मारक निधी’ ही संस्था दिल्लीत स्थापन झाली. राजेंद्रप्रसाद त्याचे पहिले अध्यक्ष. नंतर संस्थेचा देशभर विस्तार करण्याचे ठरले. मद्रास, कलकत्ता येथे स्वतंत्र केंद्रे स्थापन झाल्यावर पुण्यातही केंद्र सुरू झाले. मामा तेव्हा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. नंतर या केंद्राचे संस्थेत रूपांतर झाले. ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’ या नावाने स्वतंत्र नोंदणी झाली. हे इथे मुद्दाम नमूद करण्याचे कारण नंतर सुरू झालेल्या वादात दडले आहे.

हे केंद्र सुरू झाले तेव्हा गांधीवादी कार्यकर्त्यांमध्ये अमाप उत्साह होता. त्यामुळे राज्यभरातील कार्यकर्ते येथे गोळा झाले. चरखा, सूतकताई, चर्मोद्योग, लघुउद्योग असे अनेक उपक्रम राबवले जाऊ लागले. प्रकाशन विभाग स्थापण्यात आला. याची सूत्रे ‘कोकणचे गांधी’ अशी ओळख असलेल्या आप्पासाहेब पटवर्धनांकडे गेली. त्यांनी भंगीमुक्तीचेही काम सुरू केले. त्यामुळे भंगी चिडले. त्यांना शांत करून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी येथे राज्यातील पहिले ‘वाल्मीकी छात्रालय’ सुरू झाले. भारतीय बनावटीचे पहिले शौचालय तयार झाले ते याच गांधी भवनात. त्याचा प्रसार करण्यासाठी राज्यभर दीडशे सुपरवायजर नेमले गेले. त्यांच्या माध्यमातून एक लाख शौचालयांची निर्मिती व वितरण करण्यात आले.

या भवननिर्मितीची कथाही विलक्षण. १९६० ला केंद्रात सदानंद वांद्रेकर राज्यमंत्री होते. नेहरूंनी त्यांना विनंती केली, केंद्रासाठी जागा मिळवून द्या. वांद्रेकरांनी तेव्हा दहा हजार रुपये खर्चून थेट जागाच विकत घेतली. १९६१ ला नेहरू केंद्राच्या उद्घाटनासाठी आले तेव्हा जायला रस्ताच नव्हता. मग वांद्रेकरांनी त्यांचीच सात गुंठे जागा दान दिली. नेहरूंच्या भेटीनंतर संस्थेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणखी उत्साह संचारला. स्मारक निधीची अनेक केंद्रे राज्यात ठिकठिकाणी सुरू झाली.

या माध्यमातून गांधीघराची कल्पना राबवण्यात आली. पूर्णपणे मातीपासून तयार झालेली ही घरे तेव्हा लोकप्रिय होती. नंतर हळूहळू हा प्रकल्प मागे पडत गेला. आता सेवाग्राम व वध्र्यातील काही संस्था वगळता अशी दोनच घरे राज्यात शिल्लक आहेत. त्यातील एक अमरावती जिल्ह्यात करजगावला तर दुसरे बुलढाण्यातील पाटोळ्याला. कचर्‍यापासून बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प संस्थेने त्या काळात राबवला. यातून २० हजार यंत्रांचा पुरवठा राज्यभरात करण्यात आला. पुढे याही प्रकल्पाला ओहोटी लागली. खरे तर सेवाग्राम व वध्र्यातील गांधीवादी संस्था वगळल्या तर स्मारक निधी ही राज्यातील मोठी संस्था. त्याला तेव्हाच्या सरकारकडून आर्थिक बळ मिळणे अपेक्षित होते, पण राज्यकर्त्यांनी याकडे फार लक्षच दिले नाही.

सुरुवातीला या संस्थेत अनेक प्रशिक्षण शिबिरे घेतली जात. ग्रामविकासशी संबंधित योजनांच्या अंमलबजावणीसाठी कार्यकर्ते तयार केले जात. हळूहळू सारे बंद पडले. १९७५ ला बाळासाहेब भारदे स्मारक निधीचे अध्यक्ष झाले. गांधी भवनाचा परिसर केवळ विचारांचे आदानप्रदान एवढ्यापुरताच सीमित राहू नये, या विचाराला कृतीची जोड मिळावी म्हणून रोजगार निर्मितीसाठी भवनाच्या मागील बाजूला गाळे बांधून काही नवउद्योजकांना भाड्याने दिले. सुरुवातीला हा प्रकल्प वाखाणला गेला. भारदेंनी स्मारक निधीची एकूण ३५ उपकेंद्रे राज्यात ठिकठिकाणी स्थापन केली. त्यांनी तिथे गांधीविचाराचा वारसा पुढे न्यावा हा हेतू. नंतर ही केंद्रे चालवणार्‍यांनी जागा हडपण्याचा उद्योग सुरू केला.

भारदे तसे सहृदयी. त्यांना वेगवेगळी कारणे सांगून संस्थेच्या जागा हडपण्यात अनेकांनी धन्यता मानली. याच भवन परिसरात गांधी अभिमत विद्यापीठ स्थापन व्हावे हे भारदेंचे स्वप्न. ते पूर्ण करायचे तर संस्थेजवळ पैसा हवा. मग त्यांनी संस्थेची एक एकर जमीन एका विकासकाला दिली. हा व्यवहार संस्थेत रीतसर ठराव करून झाला. त्यानुसार विकासकाने दीड कोटी रुपये संस्थेला दिले. नेमकी इथून एका नव्या वादाला सुरुवात झाली. दिल्लीतील स्मारक निधीने या व्यवहारावर आक्षेप घेतला. धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली. निर्णय घेणारी कार्यकारिणीच अवैध असा पवित्रा घेतला. यातून न्यायालयीन लढाई सुरू झाली.

ही संस्था स्वतंत्रपणे नोंदणीकृत आहे असे पुण्याचे म्हणणे तर संस्था आमच्याशी संलग्न आहे असे दिल्लीचे म्हणणे. धर्मादायकडून प्रकरण उच्च न्यायालयात गेले. तिथे निकाल पुण्याच्या बाजूने लागला. तो देणारे न्यायमूर्ती होते अभय ओक. नंतर सर्वोच्च न्यायालयातही पुणेच जिंकले. न्यायालयाने कार्यकारिणी वैध ठरवली. यालाही अनेक वर्षे लोटली पण धर्मादाय आयुक्त काहीच निर्णय घेण्यास तयार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही पुन्हा सुनावणी घेणे व वेळ मारून नेण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. २०१४मध्ये देशातील राजकीय वातावरण बदलले व संस्थेच्या कामकाजावर आक्षेप घेणार्‍या दिल्लीच्या संस्थेला आणखी हुरूप आला. पुन्हा तक्रारी सुरू झाल्या. त्यावरून चौकशी. त्याला सामोरे जाऊन संस्थेचे पदाधिकारी आता बेजार झाले आहेत.

गांधी म्हणायचे, संस्थात्मक उभारणी करणार्‍यांनी कायम विश्वस्तांच्या भूमिकेत असावे. त्यामुळे वाद होणार नाहीत. इथे दोन गांधीवादी संस्थाच एकमेकांशी भांडत आहेत. यात मध्यस्थीचे प्रयत्न अनेकांनी केले. न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारींपासून अनेक जुनेजाणते गांधीवादी मध्ये पडले पण दिल्लीचे लोक ऐकण्यास तयार नाहीत. आता तर त्यांना सत्तेच्या वर्तुळातून अप्रत्यक्षपणे बळ मिळू लागल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे तक्रारींची संख्याही कमालीची वाढली.

सध्या स्मारक निधीजवळ दोनशे कोटी रुपयांची मालमत्ता आहे. सर्वांचा डोळा आहे तो यावर. २००५ मध्ये भारदेंनी डॉ. कुमार सप्तर्षींना अध्यक्षपद दिले. ते लढाऊ वृत्तीचे. त्यांनी गांधी भवनाच्या जागेवर झालेले अतिक्रमण हटवले. मागच्या गाळेधारकांना नवा भाडेकरार करण्यास भाग पाडले. ‘सत्याग्रही विचारधारा’ या स्वत:च्या मासिकाची मालकी संस्थेकडे सुपूर्द केली. भवनाच्या मुख्य इमारतीवर वरचा मजला बांधून घेतला. त्यांच्या सक्रियतेमुळे भवनात अनेक कार्यक्रम सुरू झाले.

सर्वोदय संमेलन, गांधी कथावाचन, गांधी सप्ताहात राबवले जाणारे अनेक उपक्रम. त्यांनी राज्यभरातील उपकेंद्राचा आढावा घेतला तेव्हा केवळ पाच केंद्रे व त्यांच्या जागा शिल्लक असल्याचे लक्षात आले. त्या ताब्यात घेतल्या. डॉ. सप्तर्षी म्हणत, ‘कोथरूड हे हिंदूराष्ट्र असेल तर गांधी भवन हे त्यातले इवलेसे बेट आहे, ते जपायला हवे.’ त्यांच्या कार्यकाळात भवनातली सक्रियता वाढली. त्यांच्या दिमतीला होते अन्वर राजन, लक्ष्मीकांत देशमुख यांसारखे कार्यकर्ते. अलीकडेच सप्तर्षी गेले. आता या स्मारक निधीचे प्रमुखपद डॉ. शिवाजीराव कदम यांच्याकडे आहे. त्यांच्या गाठीशी भारती विद्यापीठ संचलनाचा मोठा अनुभव आहे. गांधींचे पणतू तुषार गांधीही आता संस्थेचे विश्वस्त आहेत. यापैकी कुणालाही दिल्ली विरुद्ध पुणे हा वाद अजून सोडवता आलेला नाही.

अलीकडच्या वातावरणात देशभरातील गांधीवादी संस्था एकट्या पडल्या आहेत. त्यांच्या मोक्याच्या जागांवर अनेकांचा डोळा आहे. अशा स्थितीत सर्वांनी एकोप्याने राहणे व गांधीविचारातून निर्माण झालेले संस्थात्मक संचित राखणे केव्हाही महत्त्वाचे. अनेक ठिकाणी असा एकोपा दिसून येतो, पण ‘स्मारक निधी’ याला अपवाद ठरलेली संस्था आहे, असे खेदाने का होईना पण नमूद करावे लागते. लवकरच हे वादाचे ग्रहण सुटेल व गांधी भवन सहमतीच्या दिव्यांनी उजळून निघेल अशी आशा…

devendra.gawande@expressindia.com