केशव उपाध्येय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तृत्वावर मतदारांचा प्रचंड विश्वास आहेच, हे महानगरपालिकांच्या निवडणुकीने पुन्हा सिद्ध केले. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार यांचे नेतृत्व महाराष्ट्रातील मतदारांनी स्वीकारले नाही; भाजपने ‘महापौर हिंदू होणार’ असे जाहीर केल्यामुळे ‘व्होट जिहाद’चा प्रयोगही यंदा करता आलेला नाही, तसेच इसापनीतीतील ‘लांडगा आले रे आला…’ या गोष्टीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या ‘मुंबई तोडणार’च्या हाळीची अवस्था झाल्याचे यंदा दिसले…

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या २९ पैकी फक्त एका म्हणजे मुंबई महापालिकेच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. याचे कारण मुंबई महापालिका म्हणजे ठाकरे असे समीकरणच तयार झाले होते. मुंबई महापालिकेत फक्त आमचा आवाज घुमणार हा ‘उबाठांचा अहंकार’ मतदारांनी या निवडणुकीत जिरवला, हाच या निवडणुकीचा अर्थ आहे.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरेंच्या सर्व आशा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे केंद्रित झाल्या होत्या. मुंबईत विजय मिळवून आपण पुन्हा राज्याच्या राजकारणात प्रमुख स्थान मिळवू अशी आशा त्यांना वाटत होती. स्वत:च्या बळावर विजय मिळेल की नाही, याची खात्री नसल्याने उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंशी असलेली गेल्या १९ वर्षांची राजकीय भावकी संपवली. एवढे करूनही उबाठा गटाला मुंबईची सत्ता मिळवता आलेली नाही. अन्य २८ महानगरपालिकांपैकी काही ठिकाणी ‘शिवसेना (उद्भव बाळासाहेब ठाकरे)’ या पक्षाला भोपळाही फोडता आलेला नाही. अर्थात उद्धव ठाकरे मुंबईबाहेरच्या महानगरपालिका निकालांशी काहीच देणे-घेणे नसणार. त्यांचा डोळा फक्त आणि फक्त मुंबई महानगरपालिकेवरच होता. याचे कारण मुंबई महानगरपालिकेचे सुमारे ८० हजार कोटींचे अंदाजपत्रक.

उद्धव ठाकरे यांच्या अहंकारी, स्वार्थी राजकारणाचा हा पराभव आहे. भारतीय जनता पार्टीला शत्रू क्रमांक एक मानून उद्धव ठाकरे यांनी गेल्या सहा वर्षांत भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाबद्दल अत्यंत विखारी भाषा वापरली. मतदारांनी उद्धव ठाकरेंच्या याच राजकारणाला नाकारले आहे.

मुंबई महानगरपालिकेवर गेली किमान २५ वर्षे सत्ता असताना, एका अर्थाने मुंबई ताब्यात असताना मुंबईतील नागरी समस्याही पूर्णपणे सोडवता न आलेल्या उद्धव ठाकरे यांच्याकडे आपण नेमके काय केले हे सांगण्यासाठी एकही मुद्दा नव्हता. त्यामुळेच त्यांनी ‘मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार’ ही वर्षानुवर्षे चालू असलेली कॅसेट वाजवणे सुरू केले. मुंबई महापालिकेच्या निवडणुका आल्या की उद्धव ठाकरेंना या मुद्द्याची आठवण होते. वास्तविक केंद्रात कोणाचीही सत्ता आली तरी मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीच वेगळे करू शकत नाही. सामान्य माणसालाही मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा चांगलीच ठाऊक झाली आहे. इसापनीतीतील ‘लांडगा आले रे आला…’ या गोष्टीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या ‘मुंबई तोडणार’च्या हाळीची अवस्था झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी ‘मुंबई तोडणार’ची कितीही भीती दाखवली तरी सामान्य मुंबईकर त्यावर विश्वास ठेवायला तयार नाही, हा या निवडणुकीचा आणखी एक महत्त्वाचा निष्कर्ष आहे. मुंबईतल्या मराठी माणसाच्या दोन पिढ्यांनी या अवाजवी भीतीला घाबरून शिवसेनेला मतदान केले. गेल्या सहा वर्षांत शिवसेनेच्या उबाठा गटाने आपल्या राक्षसी महत्त्वाकांक्षेसाठी भारतीय जनता पार्टीशी केलेल्या विश्वासघाताच्या राजकारणाचा परतावा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतून त्या पक्षाला मिळाला आहे.

लोकसभेच्या २०२४ निवडणुकीत ‘व्होट-जिहाद’ पथ्यावर पडल्यामुळे आणि संविधान बदलच्या खोट्या प्रचारामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला महाराष्ट्रात लॉटरी लागली होती. विधानसभा निवडणुकीतही आपणच जिंकणार या भ्रमात असलेल्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून, ‘एक तर तू राहशील, नाहीतर मी राहीन,’ यासारखी भाषा वापरली होती. राजकारणात कितीही विरोध असला तरी प्रतिस्पर्ध्याबाबत अशी भाषा वापरायची नसते, याचेही भान उद्धव ठाकरे यांना राहिले नव्हते. राज ठाकरे यांच्याशी समझोता केल्यावर उबाठांना आता आपल्याला कोणीच हरवू शकणार नाही, असा गर्व झालेला असू शकतो. पण ‘गर्वाचे घर खाली’ या म्हणीप्रमाणे मतदारांनी उद्धव ठाकरे गटाचे गर्वहरण केले. आपण कसेही वागलो तरी भावनाशील मराठी माणूस आपल्या पाठीशी उभा राहील, ही उद्धव ठाकरे यांनी अपेक्षाही सुज्ञ मतदारांनी खोटी ठरवली.

अलीकडच्या लोकसभा निवडणुकीत ‘व्होट-जिहाद’चा जो घातक प्रयोग झाला होता त्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे व त्यांच्या पक्षाने मुंबईत करून पाहिला. स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मतांसाठी मुस्लिमांच्या अनुनयाच्या राजकारणाला कायम कडवा विरोध केला. उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी अगतिक होऊन मुस्लिमांच्या अनुनयाचा खेळ सुरू केला. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने उद्धव ठाकरे यांच्या या घातकी खेळाचा पर्दाफाश करत हिंदू मराठी महापौर देण्याचे जाहीर केले! केवळ वडिलांच्या पुण्याईवर राजकारणात २५ वर्षे काढलेल्या उद्धव ठाकरेंच्या राजकीय शहाणपणाचा भोपळा या निवडणुकीत फुटला.

याउलट भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक फक्त आणि फक्त विकास कामांच्या आधारे लढवण्याचा निर्धार केला आणि अखेरपर्यंत भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व या निर्धाराशी एकनिष्ठ राहिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व २९ महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी राज्यभर प्रवास करून ३७ सभा घेतल्या. याखेरीज देवेंद्रजींनी विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांना ३३, तर मराठी अभिनेते-अभिनेत्रींना सहा मुलाखती दिल्या. या प्रचारसभांमधून आणि मुलाखतींमधून देवेंद्रजींनी महानगरांच्या भविष्यकाळातील गरजानुसार करावयाच्या विकासकामांबाबतची माहिती जनतेपुढे ठेवली. कोल्हापूरसारख्या शहरात जिथे भारतीय जनता पार्टीचे अस्तित्व नाममात्र म्हणण्याएवढेही नव्हते, त्या शहराची महानगरपालिका आता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या हातात आली आहे. ही सारी देवेंद्रजींच्या विश्वसनीय कर्तृत्वाची आणि कार्यक्षम नेतृत्वाची किमया आहे.

मुंबईबरोबरच भारतीय जनता पार्टीने छत्रपती संभाजीनगरसारख्या शहरातही मोठे यश मिळवून आपल्या वाढत्या ताकदीचा प्रत्यय दिला आहे. भारतीय जनता पार्टीला राज्यातील सत्ता मिळू नये यासाठी उद्धव ठाकरेंना आपल्या बाजूने वळवणाऱ्या शरद पवार यांच्या पक्षाला तर अनेक महापालिकांमध्ये एकही जागा मिळवता आलेली नाही. महाराष्ट्राचे चाणक्य म्हणून गेली अनेक वर्षे ज्यांचा गवगवा केला गेला त्या पवारसाहेबांच्या पक्षाची अत्यंत दारुण अवस्था झाली आहे.

या निकालातून महाराष्ट्राच्या मतदारांनी अनेक धडे दिले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासारखे स्वार्थी, अहंकारी राजकारण स्वीकारले जाणार नाही. त्याचबरोबर राज ठाकरे यांच्यासारख्या दिवसाला भूमिका बदलणाऱ्या नेत्यालाही मतदारांनी घरी बसवले आहे. मतदारांना गृहीत धराल तर तुम्हाला पराभवाखेरीज काही मिळणार नाही, हेही मतदारांनी या निवडणुकीतून दाखवून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तृत्वावर मतदारांचा प्रचंड विश्वास आहे, हाही या महानगरपालिका निवडणुकीचा निष्कर्ष आहे.