संजय सावकारे वस्त्रोद्योगमंत्री, महाराष्ट्र
जागतिक रेशीम उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक आहे. रेशीम शेती हा केवळ शेतीपूरक व्यवसाय न राहता, शेतकरी, व्यापारी आणि उद्योजक या तिन्ही घटकांच्या आर्थिक प्रगतीला चालना देणारा आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करण्याची क्षमता असलेला उद्योग म्हणून महाराष्ट्रात वेगाने विकसित होत आहे. रेशीम कीटकांच्या खाद्यानुसार रेशमाचे चार प्रमुख प्रकार आहेत- तुती, टसर, मुगा आणि एरी. तुती रेशीम कीटक तुतीचा पाला खातात. टसर रेशीम कीटक ऐन व अर्जुन वृक्षांचा पाला खातात. मुगा रेशीम कीटक सोम व सोलू वृक्षांचा पाला खातात, तर एरी रेशीम कीटक एरंडाचा पाला खातात. यापैकी महाराष्ट्रात प्रामुख्याने तुती आणि टसर रेशीम उत्पादन घेतले जाते.

टसर रेशीम : जंगलाशी जोडलेली समृद्धी

पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये टसर रेशीम उत्पादनाची पारंपरिक पद्धत आजही जपली जात आहे. या चार जिल्ह्यांमध्ये सुमारे ४४ हजार ५०० एकर ऐन-अर्जुन क्षेत्र उपलब्ध असून, जवळपास तीन हजार स्थानिक वननिवासी कुटुंबे पारंपरिक टसर रेशीम व्यवसायातून शाश्वत उपजीविका करत आहेत. जंगलात नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेल्या ऐन व अर्जुन वृक्षांवर टसर रेशीम कीटकांचे संगोपन केले जाते. प्रत्येक लाभार्थी कुटुंब साधारणपणे ५००-६०० अंडीपुंजांचे संगोपन करते. त्यातून मिळणार्‍या कोषांपासून एका कुटुंबाला वर्षाला सरासरी ८० हजार ते एक लाख रुपये उत्पन्न मिळते. म्हणूनच टसर रेशीम हा केवळ व्यवसाय नाही; तो पूर्व विदर्भातील आदिवासी भागाच्या परंपरेला, जंगलाला आणि उपजीविकेला जोडणारा शाश्वत विकासाचा मार्ग आहे.

तुती रेशीम : आर्थिक परिवर्तनाचा मार्ग

महाराष्ट्रातील ३३ जिल्ह्यांतील दोन हजार २४१ गावांमध्ये सुमारे २३,१८८ एकर क्षेत्रावर तुती लागवड आहे. २०२६-२७ साठी सहा हजार ९१२ शेतकर्‍यांनी सात हजार ५९४ एकर तुती लागवडीसाठी नोंदणी केली असून, त्यापैकी एक हजार ५६ शेतकर्‍यांनी एक हजार २७६ एकर क्षेत्रावर तुती लागवड पूर्ण केली आहे. महाराष्ट्राचे अनुकूल हवामान, सुपीक जमीन आणि उपलब्ध मनुष्यबळ यामुळे तुती रेशीम उद्योगाच्या विस्ताराला मोठी संधी आहे. राज्यात अनेक शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून तुती रेशीम शेती करत आहेत. काही प्रगत शेतकरी एकरी दोन लाख किंवा त्यापेक्षा अधिक नफा मिळवतात. त्यामुळे रेशीम शेती ही आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आणि स्थिर उत्पन्न देणारी शेती ठरत आहे.

शेतातून उद्योगाकडे…

रेशीम शेती उद्योगाची खरी ताकद तिच्या संपूर्ण मूल्यसाखळीत आहे. तुती लागवड, रेशीम कीटक संगोपन, कोष उत्पादन, धागा निर्मिती, पीळ देणे, रंग प्रक्रिया, वस्त्रनिर्मिती, बाजारपेठ अशी ही साखळी आहे. म्हणजेच रेशीम शेती ही केवळ कोष उत्पादनापुरती मर्यादित नाही. शेतापासून मुलायम रेशमी वस्त्रापर्यंत प्रत्येक टप्प्यावर रोजगार आणि उत्पन्नाच्या नव्या संधी निर्माण होतात. रेशीम कोषांपासून धागा तयार होतो, धाग्यापासून मुलायम रेशमी वस्त्र तयार होते आणि त्या वस्त्रातून देशांतर्गत तसेच निर्यात बाजारपेठेत मोठी आर्थिक
उलाढाल होते.

अनेक उद्योगांचे द्वार…

रेशीम उद्योगाची आणखी एक मोठी ताकद म्हणजे त्यातील मूल्यवर्धनाच्या असंख्य संधी. तुतीपासून जॅम, जेली आणि इतर खाद्यपदार्थ तयार करता येतात. तुतीच्या पानांपासून ग्रीन टी तयार करता येतो. रेशीम शेतीतील व कीटकसंगोपनानंतर उरलेल्या अवशेषांपासून सेंद्रिय खत व बायोगॅस निर्मिती करता येते. प्युपापासून तेल तसेच पोल्ट्री आणि फिश फीडसारखी उत्पादने तयार करण्याची संधी आहे. रेशीम कोषातील सेरिसीन या घटकाचा वापर औषधनिर्मिती, अन्न संरक्षण आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो. रेशीम धाग्याचा वैद्यकीय क्षेत्रात शस्त्रक्रियांसाठी वापर होतो. याशिवाय कोषांपासून हार, राख्या, सजावटीच्या वस्तू, खेळणी आणि विविध हस्तकला उत्पादने तयार करून महिला व युवकांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन निर्माण करता येते. त्यामुळे रेशीम उद्योग म्हणजे केवळ शेती किंवा वस्त्रोद्योग नव्हे; ती कृषी, उद्योग, रोजगार, महिला सक्षमीकरण, उद्योजकता आणि निर्यात यांना जोडणारी संपूर्ण आर्थिक साखळी आहे.

कर्जमाफीपेक्षा कर्जमुक्तीकडे…

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर ग्रामीण आणि कृषी आधारित आहे. हवामानातील अनिश्चितता, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे पारंपरिक शेतीसमोर अनेक आव्हाने आहेत. या पार्श्वभूमीवर रेशीम शेती एक वेगळा मार्ग दाखवते. कमी कालावधीत उत्पन्न, वर्षभर रोजगार, मूल्यवर्धनाची संधी आणि बाजारपेठेशी थेट जोडणी यामुळे रेशीम शेतीत शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची क्षमता आहे. म्हणूनच रेशीम शेती हा शेतकर्‍यांना कर्जमाफीकडून कर्जमुक्तीकडे नेणारा पर्याय ठरू पाहात आहे.

शासनाच्या योजनांची साथ…

महाराष्ट्र शासन शेतकरी, वननिवासी बांधव आणि नवउद्योजकांच्या विकासासाठी ‘महारेशीम अभियान कार्यक्रम’ तसेच ‘सिल्क समग्र’, ‘मनरेगा’, ‘पोकरा’ व जिल्हास्तरीय योजना प्रभावीपणे राबवत आहे. ‘सिल्क समग्र’ योजनेतून एकरी सुमारे तीन लाख ७५ हजार रुपयांपर्यंत, तर ‘व्हीबी जी राम जी’ अर्थात ‘मनरेगा योजने’तून एकरी सुमारे चार लाख छत्तीस हजार रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध आहे. या योजनांची सांगड घालून लागवडीपासून कोष उत्पादन, कोष बाजारपेठ, धागा, वस्त्रनिर्मिती आणि मूल्यवर्धित उत्पादनांपर्यंत संपूर्ण रेशीम मूल्यसाखळी विकसित करण्याचा मार्ग खुला झाला आहे. याच प्रयत्नांमुळे महाराष्ट्राने देशातील अपारंपरिक रेशीम उत्पादन करणार्‍या राज्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच जागतिक दर्जाच्या दुबार जातीच्या रेशीम उत्पादनातही महाराष्ट्राने अग्रस्थान निर्माण केले आहे.

महाराष्ट्राचा गौरव…

महाराष्ट्रातील रेशीम उद्योगाचा सातत्याने होत असलेला विकास आणि वाढता आलेख लक्षात घेऊन भारत सरकारने २०१९ मध्ये ‘देशातील रेशीम शेती-उद्योगातील उदयोन्मुख राज्य’ म्हणून महाराष्ट्राचा गौरव केला. २०२५ मध्ये ‘मेरा रेशम मेरा अभिमान’ पुरस्काराने महाराष्ट्राचा सन्मान करण्यात आला. हे पुरस्कार म्हणजे केवळ शासनाचे कौतुक नाही; तर राज्यातील हजारो रेशीम शेतकरी, वननिवासी, महिला, युवक, व्यापारी आणि उद्योजकांच्या मेहनतीची पावती आहे.

रेशीम म्हणजे परिवर्तन!

एकेकाळी रेशीम शेतीकडे शेतीपूरक जोडधंदा म्हणून पाहिले जात होते. मात्र तंत्रज्ञान, आधुनिक व्यवस्थापन, बाजारपेठ आणि मूल्यवर्धनामुळे आज रेशीम शेती हा अनेक शेतकर्‍यांचा मुख्य व्यवसाय झाला आहे. आज रेशीम हा शेतकर्‍यांच्या उत्पन्नाचा, ग्रामीण रोजगाराचा, महिला सक्षमीकरणाचा, उद्योजकतेचा, निर्यातीचा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आर्थिक परिवर्तनाचा धागा ठरला आहे.

मातीपासून रेशमापर्यंत आणि शेतकर्‍यापासून उद्योजकांपर्यंत महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाची नवी वाटचाल सुरू झाली आहे. हा धागा केवळ रेशीम वस्त्र विणणार नाही तर तो महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचे नवे भविष्य विणणार आहे.