तीन दशकांहून अधिक काळ अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक शिक्षणाच्या वाटा दाखवणार्‍या महेश ट्युटोरियल्स या खासगी शिकवणीच्या संस्थेने गाशा गुंडाळला आहे. तिच्या देशभरात जवळपास ६० शाखा अचानक बंद झाल्या आहेत. लाखो रुपयांचे शुल्क मोजलेले पालक आणि शिकवणीच्याच भरवशावर असलेले विद्यार्थी सध्या या क्लासेसच्या वर्गांची बंद दारे ठोठावत आहेत. दारावरच्या नोटिसा त्यांच्या भावनांना खिजवत आहेत. शाखांच्या संपर्क क्रमांकाची सेवा तात्पुरती स्थगित झाल्याचेच फक्त ऐकू येत आहे. हे सगळे घडले ते गेल्या पाच ते सहा दिवसांत. काही शाखांमध्ये पालकांना कंपनी दिवाळखोरीत निघाल्यामुळे वर्ग बंद करण्यात येणार असल्याची कल्पना देण्यात आली आणि दोन दिवसांत वर्गांना टाळे लावण्यात आले. या शिकवणीला जाणार्‍या विद्यार्थ्यांची दुसर्‍या एका खासगी शिकवणी संस्थेत सोय करण्याची तयारीही एमटी एज्युकेअर म्हणजेच पूर्वाश्रमीच्या महेश ट्युटोरियल्सने दाखवली आहे. तरीही शुल्काचे काय, नव्यांची तरी काय हमी, अंतराचे काय, असे अनेक प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांपुढे आहेत. 

महेश ट्युटोरियल्स बंद होणे ही एक शिकवणी बंद होणे किंवा एक कंपनी दिवाळखोरीत निघणे, इतकी सरधोपट बाब नाही. खासगी शिकवणी साम्राज्याच्या उदय-अस्ताची ती गोष्ट आहे. या शिक्षण बाजाराची सद्य:स्थिती काय, याबाबत ऊहापोह करण्यापूर्वी महेश ट्युटोरियल्सचे यातील स्थान काय आणि नेमके काय झाले, हे समजून घेणे रोचक आहे.

महत्त्वाकांक्षी शिक्षकाची व्यावसायिक वाटचाल

मुंबईतील मुलुंडच्या एका छोट्या वर्गखोलीतून १९८८ साली महेश शेट्टी या गणिताच्या शिक्षकांनी महेश ट्युटोरियल्स ही खासगी शिकवणी संस्था सुरू केली. त्यांची गणित आणि विज्ञान विषयातील शिकवण्याची पद्धत, शिस्त आणि विद्यार्थ्यांशी संवाद यामुळे महेश ट्युटोरियल्सची ओळख वाढू लागली. जवळपास राहणार्‍या काकू, ताई, दादा, निवृत्त शिक्षक, अधिकारी यांच्या घरातील एका खोलीत, पडवीत, ओसरीत भरणार्‍या ८-१० मुलांचा वर्ग, असे शिकवणीचे स्वरूप बदलून तिला संस्थात्मक पातळीवर महेश ट्युटोरियल्सने ओळख मिळवून दिली. सुरुवातीला आठवी ते दहावीच्या राज्यमंडळाच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी, मग अकरावी, बारावी विज्ञान, वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी, कालौघात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), आयसीएसई या शिक्षण मंडळांच्या शाळांच्या अभ्यासक्रमाच्या शिकवण्या, अशी मजल दरमजल महेश ट्युटोरियल्सची सुरू होती. देशभरात १९९० नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रस्थ वाढले आणि अनुषंगाने परीक्षा, निकाल, प्रवेश यांची गणिते बदलली. त्यानंतर संस्था राज्यात आणि राज्याबाहेर झपाट्याने विस्तारली. त्यानंतर महेश ट्युटोरियल्स एमटी एज्युकेअर या कॉर्पोरेट रूपात पुढे आली. तंत्रज्ञानाचा वापर, डिजिटल शिक्षण, दिवसभराचे प्रशिक्षण वर्ग अशा नानाविध प्रवाह संस्थेने स्वीकारले. एमटी एज्युकेअर ही संस्था २०१२ मध्ये भांडवली बाजारात सूचीबद्ध झाली. एका शिक्षकाने सुरू केलेल्या शिकवणी वर्गाच्या आता  देशभरात ६० शाखा कार्यरत होत्या. तर प्रत्येक अभ्यासक्रमानुसार दोन लाख रुपयांपासून पुढे असे शुल्क आकारण्यात येत होते.

शिकवणी वर्ग बंद का झाले?

एमटी एज्युकेअरच्या पडझडीची सुरुवात साधारण करोनाच्या साथीच्या दरम्यान झाली. २००० नंतर आणखी अनेक मोठे ब्रँड्स खासगी शिकवण्यांच्या बाजारात उतरले. अनेक मोठ्या नामांकित कंपन्यांनी या व्यवसायात गुंतवणूक सुरू केली. कोटासारखी शिकवणी बाजाराची केंद्रे देशभरात उभी राहिली. ऑनलाइन शिक्षण करोना काळात झपाट्याने वाढले आणि बाजारपेठेची गणिते आणखी बदलत गेली. ऑनलाइन शिकवण्यांचे अनेक ब्रँड्स उभे राहिले. त्यांनी शिकवण्यांच्या पारंपरिक प्रारूपाला आव्हान दिले. या सगळ्याचा तडाखा एमटी एज्युकेअरला काही प्रमाणात बसला. तसेच काही चुकलेले आर्थिक व्यवहार संस्थेला अस्ताकडे घेऊन गेले. साधारण २०२२ पासून कंपनी आर्थिक अडचणीत अडकली आणि दिवाळखोरी प्रक्रियेअंतर्गत (कल्ल२ः’५ील्लू८ ंल्लि इंल्ल‘१४स्र्३ू८ उःिी) प्रकरण पुढे गेले. २०२४ पासून कंपनी दिवाळखोरीकडे वाटचाल करत असल्याची चर्चा सुरू झाली. गेल्या वर्षी, ३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या दुसर्‍या तिमाही व सहामाहीचे अलेखापरीक्षित (अनऑडिटेड) आर्थिक निकाल सादर करताना स्वतंत्र लेखापरीक्षकांनी अनेक गंभीर आर्थिक आणि लेखा अनियमिततांकडे लक्ष वेधले होते. कंपनीने १४ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, संचालक मंडळाचे अधिकार सध्या रिझोल्यूशन प्रोफेशनलकडे असून त्यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक निकालांची नोंद घेण्यात आली. कंपनी १६ डिसेंबर २०२२ पासून राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार दिवाळखोरी निवारण प्रक्रियेत आहे. लेखापरीक्षकांच्या अहवालानुसार, कंपनीविरुद्ध बँका, वित्तीय संस्था, कर्मचारी, वैधानिक प्राधिकरणे आणि इतर कर्जदारांचे दावे दाखल झाले आहेत. त्यांची अंतिम पडताळणी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे कंपनीच्या प्रत्यक्ष देणी किती आहेत, याचे अचूक चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. कंपनीची एकूण आर्थिक स्थिती, वाढलेले संचयी तोटे, नकारात्मक निव्वळ संपत्ती आणि चालू मालमत्तेपेक्षा अधिक चालू देणी या पार्श्वभूमीवर कंपनीचे ‘गोइंग कन्सर्न’ म्हणून भविष्यातील अस्तित्वही दिवाळखोरी प्रक्रियेच्या अंतिम निकालावर अवलंबून असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

महेश ट्युटोरियल्सचे संस्थापक महेश शेट्टी हे या कंपनीतून २०२० सालीच बाहेर पडले. सध्या त्यांची शिक्षण क्षेत्रात व्यावसायिक मार्गदर्शन करणारी कंपनी कार्यरत असल्याचे नोंदींवरून दिसते. ते बाहेर पडल्यानंतर कंपनी दिवाळखोरीत गेली, याचा अर्थ नेतृत्वबदलाचा फटका असा लावावा की शेट्टी यांना परिस्थितीची कल्पना होती, हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे.

पुढे काय होणार?

वर्ग बंद करण्यापूर्वी काही शाखांमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांना कल्पना देण्यात आली होती. काही ठिकाणी महिनाभर ऑनलाइन वर्ग घेण्यात आले. अरिहंत ॲकॅडमीने या संस्थेतील विद्यार्थ्यांना सामावून घेण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे शैक्षणिक नुकसान कमी करण्याच्या दृष्टीने हा काहीसा दिलासा आहे. मात्र, त्याच वेळी एमटी एज्युकेअर ही संस्था विलीन करण्यात आलेली नाही, असेही स्पष्ट केले आहे. शिकवणीचे २ ते ३ लाख रुपये शुल्क बहुतेक सर्वच पालकांनी आगाऊ भरले आहे. अरिहंतमध्ये प्रवेश मिळवून देण्याऐवजी शुल्क परत करावे, अशी पालकांची मागणी आहे. घरापासून, महाविद्यालयापासून जवळ अरिहंतची शाखा नाही, शिक्षक मान्य नाहीत, अधिक शुल्क भरावे लागणार का, एमटी एज्युकेअर त्यांच्याकडे भरलेले शुल्क अरिहंतला देणार असेल तर ते पालकांनाच का परत देत नाहीत, असे अनेक प्रश्न पालकांनी उपस्थित केले आहेत.