‘असं सांगतात, की लष्करात असताना आपली दैनंदिन कामं संपल्यावर ध्यान हॉकीचा सराव करायचे. मात्र, तोपर्यंत अंधार पडलेला असायचा. आणि त्या काळी मैदानांवर ‘फ्लड लाइट’ वगैरे नव्हते. मग ध्यान काय करायचे, तर आकाशात चंद्र पूर्ण उगवेपर्यंत वाट पाहायचे आणि चंद्र उगवल्यावर सराव सुरू करायचे. पौर्णिमेच्या रात्री फार मजेदार चित्र असायचं. एकीकडे झाडं चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालीयेत आणि दुसरीकडे हा शिडशिडित तरुण आपली हॉकीस्टिक त्या चंद्रप्रकाशात तळपवत मैदानात. त्या तरुणाची हॉकीस्टिक चेंडूला लपेटायची आणि मग काय, तो तरुण त्या चेंडूला हॉकीस्टिकच्या साह्यानं मैदानावर अक्षरश: पळवायचा. चेंडू गोलजाळ्यापर्यंत नेत गोलवर गोल मारत राहायचा. सराव सुरू करण्यासाठी ध्यान चंद्र उगवेपर्यंत वाट पाहायचे, म्हणून लष्करातील त्यांचे सहकारी त्यांना चाँद म्हणू लागले. हे नाव ठसलं आणि ध्यान सिंगचे ध्यानचंद झाले. चंद्राच्या प्रकाशात आपल्या कौशल्यांना धार लावणारे ध्यानचंद!…’
दिलीप डिसूझा यांनी प्रथम बुक्ससाठी लिहिलेल्या ‘Dhyan Singh k Chandl : Hockeyl s Magician’ या ध्यानचंद यांच्यावरील पुस्तकातील हा परिच्छेद. असे खरेच घडे, की ही आख्यायिका होती, यात न पडता यातील वादातीत गोष्ट अशी, की ध्यानचंद हे खरेच हॉकीचे जादूगार होते. केवळ हॉकीपटू नाही, चालती-फिरती जादू होते. सर्वोत्तमाचा ध्यास घेऊन महानतेपर्यंत पोचलेले मागे मोठी परंपरा सोडून जातात. ध्यानचंद यांनी भारतीय हॉकीला अशी महान परंपरा दिली. १९२८ (ॲमस्टरडॅम), १९३२ (लॉस एंजल्स) आणि १९३६ (बर्लिन) या तीन ऑलिम्पिक स्पर्धांत भारताला हॉकीत सलग तीन सुवर्णपदके मिळाली, त्यात ध्यानचंद यांचा वाटा निर्विवाद मोठा.
हॉकीतील भारताचे वर्चस्व जगात सिद्ध करण्याचा भक्कम पाया ध्यानचंद यांनी रचला. याच पायावर भारताने पुढे १९४८ (लंडन), १९५२ (हेलसिंकी), १९५६ (मेलबर्न) अशी सलग तीन सुवर्णपदके पटकावली, तर नंतर १९६४ (टोकियो) आणि १९८० (मॉस्को) या ऑलिम्पिक स्पर्धांतही आपण सुवर्णपदकाचे मानकरी ठरलो. १९५६ ते १९८० पर्यंत झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धांत जेव्हा सुवर्णपदक मिळाले नाही, तेव्हा १९६० मध्ये रौप्य, तर १९६८ आणि १९७२ मध्ये कांस्यपदक आपण मिळवलेच. १९७६ चा अपवाद, ज्या स्पर्धेतून आपण पदकाविना परतलो. अर्थात, १९८० नंतर हॉकीमध्ये पुन्हा ऑलिम्पिक पदक मिळविण्यासाठी आपल्याला तब्बल ४० वर्षे म्हणजे ८ ऑलिम्पिक स्पर्धा एवढी वाट पाहायला लागली आहे. सन २०२० आणि २०२४ मध्ये कांस्यपदक मिळवून आपण पुन्हा शर्यतीत आलो आहोत, ही अलीकडची त्यातल्या त्यात दिलासादायक बाब. ध्यानचंद यांचे स्मरण करताना गतकाळाबरोबर हे वर्तमान माहीत असणे आवश्यक. त्यांच्या २०३० मध्ये असलेल्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षाआधीच्या, म्हणजे २०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये हॉकीत सुवर्णपदकाचे ध्येय ठेवून ते मिळवणे ही त्यांना खरी आदरांजली ठरावी म्हणून.
या ऑलिम्पिक आख्यानात आज ध्यानचंद यांच्याबद्दल लिहिण्याची दोन कारणे. एक तर आज त्यांची जयंती, जी राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरी होते. आणि, दुसरे म्हणजे ज्या महान खेळाडूने भारताला ऑलिम्पिक सुवर्णपदकाचा पहिला वेध घेण्यासाठी प्रेरित केले आणि नंतर तेथपर्यंत नेऊन पोहोचविले त्या कर्तृत्वाला मानवंदना. त्यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ चा, उत्तर प्रदेशातील अलाहाबादमधील (आत्ताचे प्रयागराज). ध्यानचंद ज्या काळात खेळले, तो काळ सांघिक खेळही एखाद्या खेळाडूच्या नावाने ओळखले जाण्याचा होता. क्रिकेट म्हणजे डॉन ब्रॅडमन, थोडे नंतर फुटबॉल म्हणजे पेले असा. अर्थात, हे सर्वसामान्य क्रीडारसिकांसाठी. जाणकारांना त्या त्या क्रीडा प्रकारातील आणखी नावे, त्यांचे कर्तृत्व अधिक माहीत असणे स्वाभाविक. पण, सांगायचा मुद्दा असा, की हॉकी म्हणजे ध्यानचंद असे समीकरणही ध्यानचंद खेळत होते, त्या वेळी केवळ भारतात नाही, जगभरात रूढ होते. भारतातील नव्या पिढीला त्यांची ही ओळख असणे, ती ठसणे हे केवळ त्यांचे नायकत्व सिद्ध करण्यासाठी नव्हे, तर क्रीडासंस्कृती वृद्धिंगत होण्यासाठीही आवश्यक. कारण, असे नायक आपल्या कला-कौशल्याने त्या खेळालाही वेगळी उंची मिळवून देत असतात.
असे म्हणतात, की ध्यानचंद हॉकीचा सराव रेल्वे रुळावर करायचे. म्हणजे रुळाच्या एका पट्टीवर चेंडू ठेवून तो पडू न देता हॉकीस्टिकबरोबर पळवत न्यायचा. हे करणे अतिशय खडतर, पण ते ही गोष्ट कष्टपूर्वक करत राहिले. चेंडूवर नियंत्रण मिळविण्याचे कसब त्यांनी अशा प्रकारे साध्य केल्याचे सांगतात. दूरदर्शनने त्यांच्यावर केलेल्या एका छोट्या चित्रफितीत त्यांच्या या कौशल्याला प्रतिस्पर्धी किती घाबरायचे याचा उल्लेख येतो. मैदानावर एकदा का चेंडू मिळाला, की तो त्यांच्या हॉकीस्टिकपासून वेगळा करणे अशक्य होत असे. इतका, की ते हॉलंडमध्ये खेळताना असा दावा केला गेला, की त्यांच्या हॉकीस्टिकमध्ये बहुधा चुंबक असणार, ज्यामुळे हे घडते. एवढ्या शंकेवरच हे प्रकरण थांबले नाही, तर याचा पडताळा करण्यासाठी त्यांची हॉकीस्टिक तोडून खरेच चुंबक लावले आहे का, हे पाहिले गेले. असाच जपानमधील किस्सा. त्या वेळी त्यांच्या हॉकीस्टिकला डिंक लावले असावे, अशी शंका व्यक्त केली गेली. मुद्दा असा, की त्यांचे चेंडूवरील नियंत्रण आणि तो ताब्यात ठेवून ड्रिबलिंग करण्याचे कौशल्य केवळ लाजबाब होते.
सुरुवातीला उल्लेख केलेल्या दिलीप डिसूझा यांच्या पुस्तकात उल्लेख आहे, की ध्यानचंद यांच्या गोल मारण्याच्या झपाट्याबाबत आणि अफलातून कौशल्याच्या रहस्याबद्दल एकदा श्रेष्ठ धावपटू मिल्खा सिंग यांनीच त्यांना विचारले होते. त्यावर ध्यानचंद यांनी त्यांना सांगितले होते, की ते सरावाच्या वेळी गोलजाळ्याच्या पुढे एक टायर लटकवून ठेवायचे आणि चेंडू बरोब्बर त्या टायरमधून आरपार जाऊन थेट गोलजाळ्यात शिरेल, असे फटके मारत राह्यचे. दिवसभर अशा शेकडो फटक्यांचा सराव ध्यानचंद करत. या सरावाच्या जोरावर ध्यानचंद यांनी विविध स्पर्धांत शेकडो गोल केले, भारताला अनेक सामने, अनेक पदके जिंकून दिली.
अर्थात, हॉकी हा काही फक्त वैयक्तिक कौशल्यावर जिंकता येईल, असा खेळ नाही. तो सांघिक खेळ आहे, आणि तो त्याचप्रमाणे खेळावा लागतो. ध्यानचंद यातही माहीर होते. हॉकीतील जाणकार सांगतात, की मैदानावर सामना खेळताना त्यांना ते मैदान बुद्धिबळाच्या पटासारखे दिसायचे. आपल्या संघातील खेळाडू कुठे आहेत, हे मान वर करून न पाहताही त्यांना पक्के माहीत असायचे. साहजिकच त्यांचे सगळे पास त्यांच्या संघातल्या खेळाडूकडेच अचूकपणे जायचे. (उदाहरण म्हणून समजून घ्यायचे, तर यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीने इंग्लंडविरुद्धच्या उपान्त्य सामन्यात एन्झो फर्नांडेस आणि लौटारो मार्टिनेझने केलेल्या गोलसाठी दिलेले पास पाहा).
ॲमस्टरडॅममधील १९२८ च्या ऑलिम्पिक स्पर्धांत ध्यानचंद यांनी तब्बल १४ गोल मारले. एका स्थानिक वृत्तपत्राने त्यांचे वर्णन केले, ‘हा हॉकीचा खेळ नसून, जादूचा प्रयोग आहे. आणि ध्यानचंद हे या हॉकीचे जादूगार आहेत.’ नंतर १९३२ च्या लॉस एंजल्स ऑलिम्पिकमध्ये हॉकीत तीनच संघ सहभागी झाले. जपान आणि अमेरिकेला नमवून भारताने पुन्हा सुवर्णपदक पटकावले. विशेष असे, की या स्पर्धेत ध्यानचंद यांचे बंधू रूपही खेळले आणि भारताच्या एकूण ३५ पैकी २५ गोल या दोघांनीच केले! १९३६ मध्ये बर्लिन ऑलिम्पिकमध्ये ध्यानचंद खेळले, तेव्हा जर्मनीवर हिटलरची सत्ता होती. जर्मनी अंतिम सामन्यात पोहोचले होते आणि पूर्वेकडचा खुज्या लोकांचा संघ आपल्याला आव्हान देऊ शकणार नाही, असेच हिटलरला वाटत होते. भारताने मात्र जर्मनीला ८-१ धूळ चारली. याच ऑलिम्पिकमध्ये जेसी ओवेन्स या कृष्णवर्णीय धावपटूने चार सुवर्णपदके मिळवली. हिटलरच्या वर्णवर्चस्वाच्या कल्पनांना छेद दिला तो या दोन क्रीडापटूंनी, मैदानावरील अजोड कामगिरीने. क्रीडा क्षेत्र हे असे सामाजिक-राजकीय बदलांचे मूळही असते. बर्लिन ऑलिम्पिकचा हा धडा.
आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ४०० हून अधिक गोल करणार्या ध्यानचंद यांना सरकारने १९५६ मध्ये ‘पद्मभूषण’ने गौरविले. क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कारही आता त्यांच्या नावाने (मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार) दिला जातो, तर त्यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरी होते. पण, या झाल्या नोंदी. ध्यानचंद यांच्या स्मरणाचे औचित्य त्या पलीकडचे आहे. गेल्या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे ऑलिम्पिक किंवा कोणत्याही जागतिक, आशियाई वा राष्ट्रीय स्पर्धांच्या आपल्या आठवणी रुजतात, त्या प्रतिमांच्या स्वरूपात. अलीकडे दूरचित्रवाणी, इंटरनेटने तर त्या पुन:पुन्हा बघण्याचीही सोय केली. ध्यानचंद यांच्या अशा प्रतिमा फार उपलब्ध नाहीत, त्यामुळे त्यांचे शब्दचित्रच उमटवावे लागते. त्याचे दस्तावेजीकरण मात्र होत राहायला हवे. कृत्रिम प्रज्ञेच्या (एआय) काळात या दस्तावेजांच्या साह्याने प्रतिमानिर्मितीच काय, जतनाचेही जागतिकीकरण शक्य आहे. त्याचा तसा सजग, सर्जन वापर मात्र व्हायला हवा. आधुनिकतेची कास परंपरेचे संवर्धन करण्यासाठीही उपयोगी पडत असते. म्हणूनच २०३६ मध्ये ऑलिम्पिकच्या आयोजनाची स्वप्ने पाहणारा देश या भानाचा वापर क्रीडासंस्कृती घडवायला करील का, या प्रश्नाचे उत्तर महत्त्वाचे ठरते. त्याच उत्तरात ध्यानचंद यांच्या स्मरणाचे फलित सामावले आहे.
