अत्यंत आशयघन आणि प्रयोगशील चित्रपटांनी मल्याळम चित्रपटांनी गेली काही वर्षे दर्दी चित्रपट रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तर अशा या मल्याळम चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि कथाकार चित्रपट निर्माते आर. सरथ यांचे नुकतेच वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले. त्यांचा जन्म १९६१ चा. कोल्लम जिल्ह्यातील विलाकुडी इथला. केरळमध्ये पदव्युत्तर शिक्षण, पुढे पुण्यातील ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इ्स्टिटट्यूट ऑफ इंडिया’मधून चित्रपट आस्वादनाचा कोर्स, ‘केरळ कौमुदी’मध्ये पत्रकार म्हणून काम आणि केरळ सरकारच्या जनसंपर्क विभागात आयुष्यभर नोकरी करून तिथूनच उपसंचालक म्हणून निवृत्ती हे त्यांचे सगळे तपशील विकिपीडियावर उपलब्ध आहेतच.
‘द पेंटेड एपिक्स’ या माहितीपटासाठी काम करताना त्यांना राजा रविवर्मा यांची काही दुर्मीळ भित्तीचित्रं सापडली. त्या अभ्यासासाठी त्यांना केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाची एक शिष्यवृत्तीही मिळाली. तिथून त्यांची कारकीर्द सुरू झाली. त्यांनी ‘सयाहनम’, ‘स्थिती’, ‘शीलाबती’, ‘बुद्धनुम चॅपलिनुम चिरिक्कुन्नु’, ‘स्वयम’ आणि ‘पॅराडाइज’ यांसारख्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांच्या ‘सयाहनम’ या चित्रपटाला २००० साली ‘इंदिरा गांधी पुरस्कारा’सह सात ‘केरळ राज्य चित्रपट पुरस्कार’ मिळाले होते. तर ‘द डिझायर – अ जर्नी ऑफ अ वुमन’ या चित्रपटाला २०११ मध्ये जिनिव्हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्काराने गौरवले गेले. ‘अचिन्ते कथा’, ‘चुमर चित्रंगल’, ‘भूमिक्कोरू चरम गीथम’ आणि ‘महात्मा गांधी रोड’ असे लघुपटही त्यांनी केले. भोपाळ वायू दुर्घटनेवर आधारित त्यांच्या ‘बुरिअल ऑफ ड्रीम्स’ या चित्रपटाचीही विशेष दखल घेतली गेली.
‘सयाहनम’ या त्यांच्या चित्रपटात आपल्या शास्त्रज्ञ मुलाचा अभिमान बाळगणारा एक वृद्ध लेखक देशाच्या अणुचाचणीविषयक सहभागामुळे मात्र अस्वस्थ असतो. देशाच्या अणुक्षेत्रातील प्रगतीचा मुलगा आनंद साजरा करतो, तेव्हा या वृद्धाला अधिकच एकाकीपणा जाणवू लागतो, असे चित्रपटाचे कथानक आहे. ‘स्थिती’ या त्यांच्या चित्रपटात सचिवालयात काम करणार्या एका जोडप्याची कथा सांगितली आहे. तर ‘सीलाबती’ हा चित्रपट ‘‘राज्याच्या विविध भागांतून बेपत्ता झालेल्या तरुणींना समर्पित’’ होता.
या चित्रपटात आपल्या आईबरोबर बंगालमधून केरळला आलेल्या सीलाबतीला एका शाळेत संगणक शिक्षिकेची तात्पुरती नोकरी मिळते. गावातील पाणीटंचाई, शाळेतील लहान मुले गूढरीत्या बेपत्ता होणे आणि त्यांचे लैंगिक शोषण हे सगळे सीलाबतीच्या संगणक वर्गांमुळेच होत असल्याचा आरोप मुलांचे पालक करतात. सीलाबती या सर्व समस्यांवर कशी मात करते, याची कथा यात मांडली आहे.
‘द डिझायर’ हा नृत्य, संगीत, कला, संस्कृती आणि मानवी भावनांवर आधारित चित्रपट आहे. यात गौतमी या भारतीय शास्त्रीय नर्तकीचा प्रवास आणि जय लियांग या चिनी कलाकारासोबतची तिची प्रेमकथा मांडण्यात आली आहे.
‘परुदेसा’ या चित्रपटात कट्टर विचारसरणीचे बिशप आंजलीथानम आणि जोस हे आक्रमक वृत्तीचे धर्मगुरू (फादर) यांच्यातील संघर्ष दाखवला आहे. तर ‘बुद्धनुम चॅप्लिनुम चिरिक्कुन्नु’ या चित्रपटात चार्ली चॅप्लिनला आपला आदर्श मानणार्या ‘इंद्रगुप्तन’ नावाच्या एका विनोदी भारतीय कलाकाराची कथा मांडली होती. हा चित्रपट गंभीर आणि विनोदी अशा भिन्न पैलूंचा एक अनोखा संगम आहे. सिनेमा, दृश्यकला, सांस्कृतिक संशोधन आणि सार्वजनिक सांस्कृतिक जीवन यातील योगदानासाठी मल्याळम चित्रपटसृष्टी आर. सरथ यांची आठवण ठेवेल.
