‘‘धन्यवाद खरगेसाहेब, तुमचे किती म्हणजे किती आभार मानावे व कोणत्या शब्दात, हेच कळेनासे झाले आहे. केरळच्या निवडणुकीत आम्ही आरंभापासून चाचपडत होतो. काय करावे व काय नाही हे कळत नव्हते. तरीही आमचे कसून प्रयत्न सुरूच होते. त्याला साथ दिल्याबद्दल तुमचे आभार! इडुक्की येथील प्रचारसभेत तुम्ही ‘गुजराती माणूस अशिक्षित आहे. त्यांना मोदी फसवू शकतात पण केरळमधील माणसांना नाही’ असे विधान करून आमच्या पक्षाच्या हातात आयतेच कोलीत दिले. राजकारणात वक्तव्ये करताना ‘अचूक टायमिंग’ला खूप महत्त्व असते. तुमच्यासारख्या जुन्याजाणत्या नेत्याकडून ते साधले गेले याचा विशेष आनंद आम्हाला झाला आहे.

चार राज्यांत निवडणुकीचा माहोल सुरू झाल्यापासून तुमच्या पक्षाकडून कोण ‘हिट विकेट’ होते याची आम्ही चातकासारखी वाट बघत होतो. त्यासाठी आम्ही मणिशंकर अय्यर, सॅम पित्रोदा यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी काही माणसेही नेमली होती. अय्यर ‘नीच’सारखाच एखादा शब्द वापरतात की काय? आताची निवडणूक दक्षिणेत असल्यामुळे पित्रोदा तोच जुना वंशभेदाचा म्हणजे दक्षिणेतील लोक काळे का असतात असा प्रश्न पुन्हा उपस्थित करतात काय यावर नजर ठेवून होते. मात्र, यावेळी तुम्ही स्वत:च समोर आलात.

प्रत्येक निवडणुकीत आमच्या पक्षाला ‘वॉकओव्हर’ कुणी द्यायचा यासाठी तुमच्या पक्षात संगीतखुर्चीची स्पर्धा घेतली जाते हे आम्हाला ठाऊक नव्हते. त्यामुळे तुमच्याकडे आमचे लक्षच गेले नाही. मात्र, इडुक्कीच्या प्रचारसभेत तुम्ही आम्हाला सुखद धक्का दिलात व तुमच्या पक्षाकडून २०१४ पासून सुरू असलेली ही परंपरा पुढे नेण्याचा निर्धार कायम ठेवलात.

खरगेजी, तुमच्या या वक्तव्यावर तुमच्याच पक्षातले काही लोक ‘यांना म्हातारचळ लागला’ असे कुजबुजत आहेत. आम्हीसुद्धा याच कुजबुजण्याच्या क्षेत्रातले प्रवीण असल्याने आमच्या कानावर ती कुजबुज आली. मात्र, आम्ही तसे मानत नाही. दुसर्‍यांना तुच्छ लेखण्याची मोठी परंपरा तुमचा पक्ष गेल्या अनेक दशकांपासून पाळत आला आहे. तुम्ही त्याचेच पाईक या नात्याने हे विधान केले, वृद्धत्वामुळे नाही यावर आमचा ठाम विश्वास आहे. कुणी शिक्षित तर कुणी अशिक्षित, शहाणा-मूर्ख, उच्च-नीच अशी प्रमाणपत्रे वाटण्याचा अधिकार सर्वात जुना या नात्याने तुमच्या पक्षाकडे आहे, तो तुम्ही वारंवार बजावत राहावात, असे आम्हाला मनापासून वाटते.

आमचे सर्वोच्च नेते मोदीजी, यांच्यासाठी तुमच्याकडून वापरली जाणारी दूषणे कल्पनेपलीकडची आहेत. इतका खालचा विचार करणारा पक्ष आमचा विरोधी आहे याचा कायमच आम्हाला अभिमान वाटत आला आहे. प्रतिपक्षाला विजयाचे द्वार उघडून देण्यासाठी तुम्ही जी काही वक्तव्ये करता त्यावरून तुमच्या बुद्धिमत्तेचा राग येण्याऐवजी कीव येते. असो, आता मोदीजी तुमच्या या वक्तव्याचा योग्य तो समाचार घेतीलच. उरला मुद्दा गुजरातींचा. व्यवसायात अग्रणी असलेल्या या प्रदेशातील लोक राजकारणात किती ‘धुरंधर’ आहेत हे तुम्ही गेल्या ११ वर्षांपासून बघतच आहात.

२०४७ पर्यंत बघाल. मागे अय्यर व पित्रोदांवर कारवाई करून तुम्ही सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. आता तुम्हीच अध्यक्ष असल्याने कोण कुणावर कारवाई करणार? त्यामुळे या फंदात न पडता तुम्ही तहहयात अध्यक्षपदावर कायम राहावे ही सदिच्छा – तुमचा, एक भाजप कार्यकर्ता.’’ तिरुअनंतपूरमच्या हॉटेलमध्ये थांबलेल्या मल्लिकार्जुन खरगेंना हे पत्र दरवाजाखालून आत ढकललेले दिसले. ते वाचून त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब गोळा झाले. उपरण्याने वारंवार पुसूनही घाम फुटणे काही थांबेना!