वि.का.राजवाडे ऐतिहासिक साधनांच्या शोधात ठिकठिकाणी भटकंती करीत, तेव्हा त्यांची नजर किती बारकाईने आसमंत न्याहाळीत असे, याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मंगळवेढे येथील एक मराठी शिलालेख. कोल्हापूरहून प्रकाशित होणार्‍या ‘ग्रंथमाले’तून १९०६ साली एका लेखाद्वारे त्यांनी त्या शिलालेखाबद्दल लिहिले, ‘सांगली संस्थानातल्या मंगळवेढे गांवांत काशीविश्वेश्वराचे देऊळ आहे. त्या देवळाच्या सभामंडपाच्या दरवाज्याजवळील डाव्या बाजूच्या पहिल्या खांबाच्या बैठकीच्या वरल्या शिळेवर चारही बाजूंनी व तिसर्‍या खांबाच्या एका बाजूने मिळून पाच बाजूंनी एक मराठी लेख लिहिलेला आहे. लेखाचा शक १४९४ आंगिरस आहे. (इसवी सन १५७२). अक्षरे सरासरी एक इंच व्यासाची असून एकंदर ओळी ६० आहेत. पहिल्या बाजूवर १७, दुसर्‍या बाजूवर ११, तिसर्‍या बाजूवर १२, चौथ्या बाजूवर १२ व पांचव्या बाजूवर आठ. शिलालेख एकनाथस्वामीच्या वेळेस लिहिलेला असल्यामुळे त्याची भाषा एकनाथकालीन भाषेची बव्हंशाने मापक आहे… हिपरग्याचा कुलकर्णी मंगळवेढ्याची पाहणी करीत असता त्याने देवालयाचा जीर्णोद्धार केल्याचा हा लेख आहे. लेखाचा कौल मुल्ला याकुबाने काढला, असे म्हटले आहे…’

एवढी प्राथमिक माहिती देऊन झाल्यावर राजवाड्यांनी तो शिलालेख यथामूल स्वरूपात, ६० ओळींमध्ये दिला. मंदिराला रोज हजारो भाविक भेट देत असतात, पण तशा भेटीत सभामंडपात चौफेर नजर फिरवून खांबांवरील शिलालेख हुडकणारे व तो मजकूर अशा प्रकाशझोतात आणणारे राजवाडे एखादेच! मजकूर देऊन ते थांबले नाहीत, त्यांनी त्यावर संदर्भासह स्पष्टीकरण देणारे भाष्यही केले. त्यांनी लिहिले, ‘लेख शक १४९४ मधील आहे. त्यावेळी विजापुरास आदिलशाही होती. देवगिरीच्या जाधवांचे राज्य शक १२३९त (इसवी सन १३१७ मध्ये) गेल्यापासून शक १४९४ पर्यंत देवळाची हेळसांड होऊन ते पडून गेले. त्याचा जीर्णोद्धार मंगळवेढच्या मुजुमदाराने केला. हा मुजुमदार दामाजीपंताची चहाडी ज्या मुजुमदाराने पातशहापाशी केली, त्याचाच वंशज होता, असे म्हणतात. देसाई (देशपति-देसवई = देसाई), कुलकरणी, चौधरी, पाटील ह्या चार गावकामगारांबरोबर मुल्लाचीही गणना होऊ लागून शक १४९४ मध्ये बरीच वर्षे लोटली होती. हिंदूंच्या देवळाचा जीर्णोद्धार करण्याच्या कामी कौल काढणारा मनुष्य मुल्ला होता, हे लक्षात घेतले पाहिजे. विजापूरशाहीत हिंदुमुसलमानांचे गावगन्ना ऐक्य होते, असे ह्यवरून म्हणता येईल; परंतु, देवळाचाहि कौल करण्यास मुल्लाची जरूर लागावी, हिंदू मिळू नये, ह्यचा अर्थ असा होतो की, कोण्यातरी मुसुलमानाचे अनुमोदन जीर्णोद्धाराला आहे, असे दाखवणे मुजुमदाराला इष्ट वाटले… मुजुमदारांनी छळलेल्या दामाजीपंतांचे वंशज सध्या गुलबग्र्यास आहेत, असे म्हणतात.’

शिलालेखाचे ऐतिहासिक व धार्मिक-सांस्कृतिक संदर्भ असे स्पष्ट करून झाल्यावर राजवाड्यांनी मजकुराच्या भाषेची वैशिष्ट्ये नमूद केली. त्यांनी लिहिले, ‘ह्य शिलालेखांत करुनु, चालवुनु, म्हणुनु, वाजवुनु वगैरे ऊन प्रत्ययान्त धातुसाधितांची उकारान्त रूपे आली आहेत. ‘आणि’ ह्यअर्थी ‘वा’ शब्द योजला आहे. ह्य ‘वा’मध्ये व फारशी ‘व’मध्ये एका कान्ह्यचाच (= कान्याचाच) काय तो भेद आहे. ह्या लेखानंतर शंभर वर्षांनी ‘वा’चा लोप होऊन ‘व’ हे उभयान्वयीच त्याची जागा पटकावून राहिले. ‘मंगळवेढेयाचे’ असे रूप प्रस्तुतच्या ‘मंगळवेढ्याचे’ ह्य रूपाऐवजी त्यावेळी प्रचलित होते. परंतु ‘त्याणें’, ‘त्यासि’, ‘त्याचे’ ही रूपें ‘तेणें’, ‘तेयासि’, ‘तेयाचे’, ह्य ज्ञानेश्वरकालीन रूपांच्या ठिकाणी रूढ झालेली दिसतात. प्रस्तुत लेखात ‘ल’च्या ऐवजी सवर्त्र ‘ळ’चा उपयोग केलेला आहे. मजजवळील ज्ञानेश्वरीतहि ‘ल’कार नाही. ह्यवरून ‘ल’ उच्चारच त्यावेळी नव्हता. असेच केवळ म्हणता कामा नये. ल व ळ हे दोन्ही एका ‘ळ’नेंच दर्शविण्याचा प्रघात पडला होता. बाकी देवनागरीत ही दोनही चिन्हें होती, हे प्रसिद्धच आहे… लेख जशाचा तसाच अस्सल बरहुकूम नकल केला आहे. त्यावरून तत्कालीन र्‍हस्वदीर्घाचा प्रकार पाहता येईल…’

एखाद्या शिलालेखातील मजकुराचा किती वेगवेगळ्या प्रकारे विचार करता येऊ शकतो, याचा राजवाड्यांनी सहज दाखवलेला हा नमुना अभ्यासकांनी आवर्जून लक्षात घ्यावा.
आनंद हर्डीकर
anand47.hardikar@gmail.com