मैतेई आणि कुकी यांमधील वांशिक संघर्षाने धगधगणार्‍या मणिपूरमध्ये फेब्रुवारीपासून- म्हणजे राज्यात पुन्हा लोकनियुक्त सरकार आल्यापासून- नागा विरुद्ध कुकी संघर्षही पुन्हा सुरू झाला आणि यातून गेल्या दोन दिवसांत नऊ जणांचा बळी गेला. अनधिकृतपणे हा आकडा ११ असल्याचे सांगण्यात येते. कुकी – नागांमधील वांशिक हिंसाचारात आतापर्यंत ५० जण मारले गेले आहेत.

परिस्थिती आटोक्यात येत असल्याचा कितीही दावा केंद्र व राज्य सरकार करत असताना या सीमावर्ती भागातील कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरेच आजही दिसतात. केंद्रात व मणिपूरमध्येही भाजपची सत्ता. पण ‘डबल इंजिन’ असूनही वांशिक संघर्ष संपलेला नाही. वर्षभराच्या राष्ट्रपती राजवटीनंतर मणिपुरात लोकनियुक्त सरकार पुर्नस्थापित करण्यात आले. भाजपने नवे मुख्यमंत्री नेमले. सरकार स्थापनेत वांशिक समीकरण साधण्याचा प्रयत्न केला. पण सारे प्रयत्न व्यर्थ ठरल्याचेच एकूण चित्र आहे.

मणिपूरमधील वांशिक संघर्षाला तिहेरी कडा आहे. मे २०२३ मध्ये मणिपूरमध्ये मैतेई विरुद्ध कुकी-झो यांच्यात वांशिक संघर्ष सुरू झाला. त्यात ३०० पेक्षा अधिक ठार तर हजारो विस्थापित झाले. हा संघर्ष इतका टोकाला गेला की, हिंदू बहुसंख्य असलेल्या मैतेईंचे वास्तव्य असलेल्या राजधानी इम्फाळमध्ये कुकी आजदेखील पाऊल टाकू शकत नाहीत. मैतेई कुकींचे प्राबल्य असलेल्या डोंगराळ भागात प्रवेश करू शकत नाहीत.

मैतेई – कुकी-झोंमधील संघर्ष आटोक्यात आला नसतानाच फेब्रुवारी महिन्यापासून कुकी विरुद्ध नागा असा वांशिक संघर्ष सुरू झाला. कुकी आणि नागा यांच्यात १९९३ ते १९९७ दरम्यान झालेल्या वांंशिक संघर्षात एक हजारापेक्षा अधिक लोक जिवास मुकले होते तर लाखो लोक विस्थापित झाले. आता पुन्हा, कुकी व नागांमधील संघर्षाला जाणीवपूर्वक खतपाणी घालण्यात आल्याचा आरोप होतो आहे.

परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. या राज्यात जनगणनेची पहिल्या टप्प्यातील प्रक्रियाही लांबणीवर टाकावी लागली. जनगणनेपूर्वी राष्ट्रीय नागरिकत्व पडताळणी (एन.आर.सी.) करावी, अशी मागणी होत आहे. भाजपला नेमके हेच हवे आहे. मणिपूर विधानसभेची निवडणूक मार्चमध्ये अपेक्षित आहे. सध्याची एकूण परिस्थिती लक्षात घेता ही निवडणूक वेळेत होण्याची शक्यता कमीच वाटते. भाजपला पुन्हा सत्ता मिळण्याची खात्री झाली तरच विधानसभा निवडणूक होईल.

अन्यथा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. मणिपूरमधील संघर्षाकडे धार्मिक अंगाने बघण्याच्या केंद्र सरकार व गृह मंत्रालयाच्या भूमिकेमुळेच हा प्रश्न चिघळल्याचा आरोप होतो. मैतेई हे बहुसंख्य हिंदू असून,  त्यांचा भाजपला पाठिंबा असतो. दुसरीकडे, कुकी-झो व नागादेखील बहुसंख्य ख्रिश्चन समाजाचे. वांशिक संघर्षात सरकारने मैतेईना झुकते माप दिल्याचा आरोप अन्य समाजांकडून केला जातो. जम्मू आणि काश्मीरचा प्रश्न तसेच नक्षलवाद हे देशासमोरील मुख्य प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कठोर भूमिकेमुळे कायमस्वरूपी निकाली निघाल्याचा दावा भाजपकडून केला जातो. पण मणिपूर साडेतीन वर्षे वांशिक संघर्षात होरपळत असताना केंद्राला तोडगा काढता आलेला नाही.

केंद्रीय अल्पसंख्याक व संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी मणिपूरमधील वांशिक संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा हा सैन्य दलाच्या बळापेक्षा तिन्ही समाजांनी संवादातून सोडवावा, अशी भूमिका मांडल्याने नागरी संघटनांनी या वक्तव्याचा निषेध केला आहे.  दहशतवादी किंवा बंडखोर संघटनांच्या कारवायांकडे केंद्र सरकारकडून कानाडोळा केला जात असल्याचा आरोप १४ विविध नागरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केला असून नुसत्या चर्चेतून हा प्रश्न कसा सुटणार, असा सवाल केला आहे.

खरे तर मैतेईंना ‘आदिवासी’ दर्जा देण्याच्या निर्णयापासून वांशिक संघर्ष सुरू झाला तेव्हाच केंद्र व राज्याने दोन्ही समाजांना चर्चेसाठी एकत्र आणणे आवश्यक होते. पण चर्चा घडवून आणण्यासही केंद्राने विलंब लावला. केंद्र व राज्याने धार्मिक राजकारणात न अडकता स्वच्छ व नेमकी भूमिका घेतल्याशिवाय हा वांशिक संघर्ष आटोक्यात येणे शक्य नाही. सीमेपलीकडून होणारा अंमली पदार्थांचा व्यापार, बंडखोरांना सहज उपलब्ध होणारी शस्त्रे, शेजरील टपून बसलेली राष्ट्रे अशा कोंडीतून सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी प्रयत्न झाले तरच मणिपूरमधील धग कमी होऊ शकेल.