महोदय, मंत्रालयात काम करणार्‍या प्रत्येकाने शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहावे यासाठी पोषक मूल्य असलेला आहार सुरू करून आता सहा महिने होत आले. मंत्रालयात होणार्‍या प्रत्येक बैठकीत दुपारचे जेवण तसेच नाश्त्यासाठी उपाहारगृहाचा वापर करणार्‍या प्रत्येक कर्मचार्‍याने उकडलेली अंडी, दूध, फळे, इडली, कडधान्ये यांचे सेवन अगदी कटाक्षाने केले. त्यामुळे प्रत्येकाच्या कार्यशैलीत नेमका कोणता बदल झाला? मंत्रालयातील कामकाजात सुधारणा झाली का? आधी तेलकट पदार्थ खाऊन आजारी पडणार्‍यांची संख्या कमी झाली का? पोषक आहारामुळे कर्मचार्‍यांच्या सकारात्मक वृत्तीत वाढ झाली का यावर आमच्या कर्मचारी संघटनेतर्फे एक सर्वेक्षण केले गेले. त्यातील निरीक्षणे खालीलप्रमाणे –

१) या आहारामुळे सरकारी बाबूंच्या कार्यक्षमतेत प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले. परिणामी, प्रलंबित फायली हातावेगळ्या करण्याचे प्रमाण ५४ टक्क्यांनी वाढले. फायली लवकर मंजूर होत आहेत हे कळाल्यामुळे मंत्रालयात अभ्यागत तसेच दलालांची गर्दीही वाढली. पैसे घेऊन का होईना पण कामे तातडीने होत आहेत म्हणून दलालांच्या वर्तुळात समाधानाची भावना दिसून आली.

२) या आहारामुळे मंत्रालयात होणार्‍या बैठकांचे प्रमाण ६२ टक्क्यांनी वाढले. आधी अनौपचारिक बैठका व्हायच्या. आता त्या औपचारिक होत असून त्यात हे खाद्यपदार्थ मागवले जातात. यामुळे प्रत्येक खात्याच्या खानपान खर्चात ८० टक्क्यांनी वाढ झाली. परिणामी, काटकसरीच्या धोरणाला तिलांजली मिळाली.

३) मंत्रालयातील कौशल्यविकास खात्याने या आहार धोरणाला छेद देत उकडलेली अंडी अजिबात आणायची नाहीत, असा स्वतंत्र कार्यालयीन आदेश काढल्याने या खात्यातील कामाचा वेग वाढला नाही. खात्यातले अनेक बाबू दुसर्‍या खात्यांच्या बैठकांमध्ये गुपचूप हजेरी लावून अंड्यावर ताव मारत असल्याचे दिसून आले.

४) दरवर्षी होणार्‍या राजीव गांधी गतिमान प्रशासन स्पर्धेत बक्षीस मिळवण्यासाठी या वेळी तीव्र चुरस अनुभवायला मिळाली.

५) सरकारी बाबूंच्या उपस्थितीचे प्रमाण आधी ६७ टक्के होते ते ८७ टक्क्यांवर गेले.

६) वडापाव, समोसा व इतर तेलकट पदार्थ खाण्याची सवय वर्षानुवर्षांपासून असलेले काही बाबू प्रारंभीचे तीन महिने सतत बाहेर जाऊन नाश्ता करायचे. हळूहळू त्यांचे प्रमाण कमी झाले.

७) या पोषक आहारात कडक चहाचा समावेश नसल्याने काहींनी उपाहारगृहचालकांवर दबाव टाकून चहा मिळेल अशी व्यवस्था केली. परिणामी, या पेयाचा काळाबाजार वाढला.

८) कामे लवकर होऊ लागल्याने लाचेचे दरसुद्धा वाढले. ती देणार्‍यांनी तक्रार करण्यास नकार दिला. कमी चकरांमध्ये काम होत असेल तर पैसे मोजले तरी फरक पडत नाही अशी त्यांची भावना होती.

९) सर्वांत महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे सरकारी बाबू तंदुरुस्त झाले, त्यांच्यात सकारात्मक ऊर्जाही वाढलेली दिसली, पण त्यांच्या ‘खाण्याच्या’ प्रवृत्तीत कुठलाही बदल दिसून आला नाही.’

हा सर्वेक्षण अहवाल एकाच वेळी मंत्रालयातील सर्व खातेप्रमुखांच्या मोबाइलवर झळकताच त्यांच्यात फोनाफोनी सुरू झाली. यातल्या सकारात्मक निरीक्षणाच्या आधारावर आपण केंद्राच्या गतिमान प्रशासन योजनेत सहभागी व्हायचे यावर सर्वांचे एकमत झाले.