सिद्धार्थ खांडेकर

काही योगायोग विचित्र असतात. विख्यात फुटबॉलपटू दिएगो मॅराडोनाचा नोव्हेंबर २०२० मध्ये अकाली मृत्यू झाला, त्यानंतर दोन वर्षांनी अर्जेटिनाने तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. आता यंदाच्या सरत्या युरोपियन क्लब फुटबॉल हंगामात मॅराडोनाला अर्जेटिनियनांप्रमाणेच देवासमान मानणाऱ्या नेपल्स शहरातील नापोली क्लबने इटालियन ‘सेरी आ’ लीगचे अजिंक्यपद पटकावले. दोन्हींसाठी एके काळी मॅराडोनाने अविस्मरणीय अजिंक्यपदे प्रतिकूल परिस्थितीत खेचून आणली होती. १९८६ मध्ये अर्जेटिनाच्या युवा संघाने २५ वर्षीय मॅराडोनाच्या नेतृत्वाखाली इटली, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, ब्राझील, डेन्मार्क अशा तत्कालीन बलाढय़ संघांच्या उपस्थितीत जगज्जेतेपद पटकावले. इटालियन हंगामात १९८६-८७ मध्येच त्याने नापोली क्लबला पहिले अजिंक्यपद मिळवून दिले. त्या वेळी एसी मिलान, इंटर मिलान, युव्हेंटस, रोमा या बलाढय़ संघांना नापोलीने मात दिली होती. आज अर्जेटिना ३६ वर्षांनी जगज्जेता बनला आणि नापोली ३३ वर्षांनी पुन्हा एकदा इटालियन जेता बनला तेव्हा हे पाहायला मॅराडोना हयात नाही! नापोलीच्या इटालियन अजिंक्यपदाची कहाणी यंदाच्या हंगामात मँचेस्टर सिटीचे संभाव्य तिहेरी अजिंक्यपद, आर्सेनलचे संभाव्य इंग्लिश प्रीमियर लीग अजिंक्यपद, बार्सिलोना-रेआल माद्रिदचे स्पेनमधील आणि बायर्न-डॉर्टमुंडचे जर्मनीमधील द्वंद्व या इतर कहाण्यांपेक्षाही बहुधा अधिक रंजक ठरते. इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये यंदा बऱ्याच वर्षांनी न्यूकॅसल या क्लबने भल्याभल्यांची झोप उडवली आहे. ते अजिंक्यपदाच्या जवळपास नाहीत. पहिल्या तिनात मात्र झळकू शकतात. मँचेस्टर युनायटेड, लिव्हरपूल, चेल्सी, टॉटनहॅम अशा बडय़ा क्लबांच्या मांदियाळीत ही कामगिरीदेखील कौतुकास्पदच म्हणायची; पण नापोलीची कामगिरी त्याहूनही उजवी, कारण हंगाम संपण्याच्या किती तरी आधी आपल्या देशातील लीगमध्ये अजिंक्यपद सुनिश्चित करणारा तो पहिलाच युरोपियन क्लब. मॅराडोनाची अनेक म्युरल्स नेपल्समध्ये आहेत. त्यातील एक वैशिष्टय़पूर्ण आहे. त्याविषयी समाजमाध्यमांवर प्रसृत झालेला एक किस्सा नुकताच वाचनात आला. काही कारणांस्तव त्या म्युरलमधील मॅराडोनाच्या चेहऱ्यावरच एक खिडकी बसवण्यात आली. नापोलीने अजिंक्यपद मिळवले, तरच ती उघडायची असा तेथील अलिखित नियम. कित्येक वर्षे खिडकी बंदच होती, कारण अजिंक्यपदाचा पत्ता नव्हता. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ‘मॅराडोना’च्या अर्जेटिनाने विश्वचषक जिंकला म्हणून प्रेमळ अपवादाने ती उघडण्यात आली होती. या वेळी नापोलीने इटालियन अजिंक्यपद पटकावल्यानंतर पुन्हा एकदा खिडकी उघडली!

Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad Updates in marathi
IPL 2024 : ट्रॅव्हिस हेडने झळकावले वादळी शतक, आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला चौथा खेळाडू
MS Dhoni First Player to Play 250 Matches for CSK
MI vs CSK IPL 2024 : एमएस धोनीने रचला इतिहास! चेन्नई सुपर किंग्जसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Champions League Football Barcelona beat Paris Saint Germain sport news
चॅम्पियन्स लीग फुटबॉल: बार्सिलोनाची पॅरिस सेंट-जर्मेनवर मात
Real Madrid and Manchester City draw match
चॅम्पियन्स लीग फुटबॉल : रेयाल-मँचेस्टर सिटीतील रंगतदार लढत बरोबरीत

नापोली हा अनेक अर्थानी इटलीमधील अपवादात्मक क्लब. तेथील जगद्विख्यात एसी मिलान, इंटर मिलान, युव्हेंटस हे क्लब सधन उत्तर भागातले. नापोली मात्र दक्षिण भागातला, तुलनेने विषम आर्थिक जातकुळी असलेला, अस्ताव्यस्त. एका अर्थाने सुस्थिर युरोपियन संघांच्या गर्दीतील विस्कटलेला अर्जेटिनाच. सधन, समृद्ध परिप्रेक्ष्यात असते ते फुटबॉलप्रेम. दरिद्री, अस्ताव्यस्त, विषमन्यायी वातावरणात निपजते ते फुटबॉलवेड. काहींना ही बांधणी सरधोपट वाटेलही; पण पुरावे आहेत. ब्राझीलमधील साओ पावलोच्या झोपडवस्त्या आणि मॅराडोना अर्जेटिनात वाढला, त्या निर्धन वसाहती यांचे नापोलीशी साम्य अधिक. नापोलीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, इटलीतील इतर अनेक मोठय़ा शहरांमध्ये दोन किंवा अधिक सुस्थापित फुटबॉल क्लब असतात. नेपल्सवासीयांसाठी मात्र एक आणि एकमेव नापोलीच. यंदा त्यांचे तिसरे इटालियन अजिंक्यपद. युरोपमधील इतर संभाव्य विजेत्यांवर नजर टाकल्यास, बहुधा गडगंज क्लबच दिसून येतील. इंग्लंडमध्ये मँचेस्टर सिटी हा युरोपातील सर्वात श्रीमंत क्लब. फ्रान्स आणि जर्मनीतील सर्वाधिक श्रीमंत संघ अनुक्रमे पॅरिस सेंट जर्मेन आणि बायर्न म्युनिच तेथील विजेते ठरू शकतात. स्पेनमधील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत क्लब बार्सिलोना तेथे विजेता ठरण्याची शक्यता दाट आहे. यांच्या तुलनेत नापोली निम्नमध्यमवर्गीय. आणखी एक मुद्दा प्रस्थापितांपेक्षा वेगळा कोणी क्लब अजिंक्य ठरण्याचा. २०० हून अधिक देशांमध्ये खेळला जातो, तरी फुटबॉलमध्ये जगज्जेते आहेत (गेल्या नऊ दशकांत) अवघे आठ! त्यातही गेल्या २५ वर्षांमध्ये फ्रान्स (१९९८) आणि स्पेन (२०१०) असे दोनच नवे जगज्जेते. बडय़ा युरोपियन क्लब लीगची कथाही फार वेगळी नाही. नवीन सहस्रकात लीस्टर सिटी (इंग्लंड), माँटपेलिये (फ्रान्स), वोल्फ्सबर्ग (जर्मनी), डेपोर्टिव्हो ला कोरुन्या (स्पेन) असे मोजकेच ठळक अपवाद.

याचे कारण अर्थातच ‘खर्च करी तो लीग राखी’ या मॉडेलमध्ये अंतर्भूत आहे. लिव्हरपूल, मँचेस्टर सिटीसारख्या खेळाडू खरेदीच्या पंचवार्षिक योजना राबवण्याची ऐपत सर्वच क्लबमध्ये नसते. बायर्न, बार्सिलोना, मँचेस्टर युनायटेड, रेआल माद्रिदसारख्या सुसज्ज युवा अ‍ॅकॅडमी सर्वच क्लब उभे करू शकत नाहीत. मेसी, रोनाल्डो, एम्बापे, हालँडसारख्या झळाळत्या वलयांकित फुटबॉलपटूंसाठी खजिने रिते करण्याची चैन सगळय़ांनाच थोडी परवडते? तसे आर्थिक धाडस जवळपास ४० वर्षांपूर्वी नापोलीने मॅराडोनासाठी करून दाखवले. १९८४ मध्ये त्यांनी मॅराडोनाला बार्सिलोनाकडून त्या वेळची विक्रमी बिदागी देऊन खरीदले होते. ती गुंतवणूक काही काळ फळली म्हणायची, कारण मॅराडोनाच्याच कारकीर्दीत नापोलीने दोन हंगाम (१९८६-८७, १९८९-९०) अजिंक्यपद पटकावले. विश्वचषक १९८६ मध्ये मॅराडोनाने जे अविस्मरणीय हुन्नर दाखवले, त्यापेक्षा किती तरी अधिक त्याने नापोलीकडून खेळताना दाखवल्याचे जाणकार सांगतात. पुढे मॅराडोना आयुष्यात भरकटत गेला, तसे नापोली क्लब व्यवस्थापनही आर्थिकदृष्टय़ा भरकटत गेले. कोकेन सेवन, विवाहबाह्य संतती, माफियांशी मैत्री ही मॅराडोनाची रूपे नेपल्समध्येच दिसून आली. मॅराडोना नापोली क्लबमधून निघाला, तसे क्लबला ग्रहण लागले. इतक्या वर्षांमध्ये दुसरा मॅराडोना निर्माण झाला नाही आणि झालाच असता, तरी त्याला महागडी किंमत अदा करून खरीदण्याचे दु:साहस नापोलीच्या नवीन व्यवस्थापनाने केले नसते. त्याऐवजी ‘स्मार्ट’ आणि किफायतशीर गुंतवणुकीचा मार्ग अनुसरला गेला. महागडय़ा आणि तिशी ओलांडलेल्या तिघा खेळाडूंना नारळ मिळाला. त्याऐवजी दक्षिण कोरिया, उरुग्वे, कॅमेरून येथून तीन नवीन भिडू आणले गेले. शिवाय आणखी एक जण म्हणजे नापोलीचा ‘एक्स-फॅक्टर’ ठरला. हा होता जॉर्जियाचा ख्विचा क्वारात्सखेलिया. हे अवजड नाव डोक्यात शिरायला नि जिरायला तेथेही असंख्यांना वेळ लागला असेलच. हा आधी रशियात व्यावसायिक फुटबॉल खेळायचा; पण युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर तो मायदेशी म्हणजे जॉर्जियात परतला आणि नापोलीच्या हुडक्यांना म्हणजे ‘स्काऊट्स’ना गवसला. तो आल्यामुळे नापोलीचा नायजेरियन स्ट्रायकर व्हिक्टर ओसिमेन यालाही सूर गवसला. २२ वर्षीय क्वारात्सखेलियाला तेथे मॅराडोनाचे स्मरण करून ‘क्वाराडोना’ असे संबोधले जाते. कोविड-१९च्या तडाख्यामुळे बडय़ा क्लबांची स्थिती वारेमाप वेतन देयकांमुळे आणखी खस्ता झाली, त्या वेळी नापोलीसारख्या तुलनेने छोटय़ा क्लबना सुधारणा घडवून आणण्यासाठी अवधी मिळाला. हा थोडासा नशिबाचा भागही त्यांच्या पथ्यावर पडलाच. या सगळय़ा साखळीत अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरतो चलाख प्रशिक्षक. लुसियानो स्पालेटी हे इटलीबाहेर फारसे ज्ञात नाव नाही; पण महागडय़ा नामांकितांपेक्षा युवा ऊर्जेला प्राधान्य देण्याचे त्यांचे धोरण नापोली व्यवस्थापनाला अधिक व्यवहार्य वाटले. नापोलीच्या संघात युवा खेळाडूंचा भरणा अधिक, त्यामुळे खेळ अधिक आक्रमक, प्रवाही आणि धाडसी. अर्थात येथून पुढे या संघाला अपेक्षांच्या चक्रव्यूहात शिरावे लागणार हेही नक्की. उपरोल्लेखित युरोपातील अल्पज्ञात क्लबांना अजून दुसरे अजिंक्यपद पटकावता आलेले नाही. अशी किमया नापोलीने केवळ मॅराडोनाच्या अमदानीत करून दाखवली  होती. आता तो नाही, पण त्याची सावली आहेच. म्युरल्सच्या रूपाने नेपल्सभर त्याचे अस्तित्वही आहे. येत्या काळात दुसऱ्यांदा नापोली जिंकले, तर मॅराडोना खरोखरच तेथील फुटबॉल संस्कृतीत रुजला असेही म्हणता येईल.