‘पावसाळ्याचे चार महिने वगळता बाकीचे आठ महिने मराठे पुण्याहून दाही दिशांभर पसरत असत’, असे सांगून राजवाड्यांनी पुण्याहून फुटणार्‍या विविध मार्गांची व मुक्कामाच्या स्थळांची रंजक माहिती संकलित रूपात वाचकांसमोर ठेवली; परंतु ते तेवढ्यावरच थांबले नाहीत. ‘पानिपतची मोहीम १५ मार्च १७६०ला सुरू झाली व १४ जानेवारी १७६१ ला संपली. या दहा महिन्यांचा सविस्तर वृत्तांत मी छापलेल्या या पत्रांखेरीज इतरत्र कोठे सापडण्यासारखा नाही… काव्येतिहाससंग्रह, ऐतिहासिक लेखसंग्रह व प्रस्तुतचा हा ग्रंथ या तीन पुस्तकांत जो पत्रव्यवहार सापडला आहे, तो अत्यंत त्रोटक आहे. १७५० पासून १७६१ पर्यंतच्या दहा वर्षांत मराठ्यांचा खटाटोप केवढा अवाढव्य होता, हे दाखवण्यास त्याचा उपयोग झाला आहे, हे खरे आहे; परंतु या खटाटोपाचा व त्याच्या निरनिराळ्या अंगांचा सविस्तर, सकारण आणि विश्वसनीय वृत्तांत देता येण्यास अद्यापि पुष्कळच आणखी पत्रव्यवहार सापडला पाहिजे…’ ही गरजसुद्धा त्यांनी मांडली.

तो पत्रव्यवहार मिळवण्यासाठी कुणी काय केले पाहिजे, याचा सल्लाही देताना राजवाड्यांनी लिहिले, ‘इनाम कमिशनच्या वेळी महाराष्ट्रातील बहुतेक गावांची दफ्तरे इंग्रज सरकाराने तपासली आहेत. त्यातील सनदा वगैरे कामाचे कागद वगळून बाकीचे सर्व किंवा बहुतेक कागद अद्याप जसेच्या तसे आहेत. ते तपासण्याचे काम त्या त्या प्रांतातील, गावांतील शोधक लोकांनी केले पाहिजे… किंवा एखादी इतिहासाच्या साधनांची शोध करणारी मंडळी स्थापण्यात येऊन तिच्या सभासदांनी हे काम करण्याचे पत्करिले पाहिजे… शोध करणारे गृहस्थ इतिहासज्ञ असल्यावाचून दफ्तरे नीट तपासली जाणार नाहीत. आपल्या दफ्तरात काय आहे, हे खुद्द दफ्तरांच्या मालकांना माहीत नसण्याचा बहुत संभव असतो. शिवाय कोणी त्यांच्याकडे शोध करावयास गेल्यास त्याला नकारात्मक उत्तर देण्याची इतिहासाच्या औदासीन्यामुळे त्यांना सवय लागलेली असते. कोठे कोठे इतिहासाचे महत्त्व जाणणारे दफ्तरांचे मालक आढळतात. स्वत: दफ्तर पाहून इतिहासाच्या उपयोगी कागद काढून देऊ म्हणून त्यांचा आग्रह असतो. परंतु शोधकांनी स्वत:च दफ्तर पाहावे, रुमाल, कागद व गळाठा तपासावा, हे विशेष फायद्याचे आहे.’

राजवाड्यांच्या या अनुभवाच्या बोलांमध्ये भावी अभ्यासकांसाठीचे जे आवाहन सामावलेले होते, ते आजही तेवढेच लागू आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाची विखुरलेली असंख्य साधने शोधून संकलित करणे आणि यापूर्वी गोळा झालेल्या साधनांवर पुढची संशोधकीय प्रक्रिया पार पाडून नवनवीन माहिती उजेडात आणणे हे महाप्रचंड कार्य पार पाडण्यासाठी मिळतील तेवढे शोधक आजसुद्धा हवेच आहेत…

त्यांनी कसा अभ्यास करावा, याचे मार्गदर्शन करताना राजवाड्यांनी लिहिले, ‘मराठ्यांच्या राष्ट्राच्या जीवनचरित्राचा अभ्यास अनेक अंगांनी/अनेक दिशांनी केला पाहिजे. (१) मराठ्यांचा सामाजिक इतिहास, (२) मराठ्यांचा राजकीय इतिहास, (३) मराठ्यांच्या धर्माचा इतिहास, (४) मराठ्यांच्या संस्कृतीचा इतिहास, (५) मराठ्यांच्या भाषेचा इतिहास, (६) मराठ्यांच्या मोहिमांचा इतिहास, (७) मराठ्यांच्या लष्कराचा इतिहास, (८) मराठ्यांच्या आरमाराचा इतिहास, (९) मराठ्यांच्या कायदेकानूंचा इतिहास, (१०) मराठ्यांच्या किल्ल्यांचा इतिहास, (११) मराठ्यांच्या जमीनमहसुलाचा इतिहास वगैरे शाखांचा सशास्त्र व सोपपत्तिक (पुराव्यांसह, सप्रमाण) अभ्यास झाला पाहिजे.’ आणि त्यानंतर त्यांनी मराठ्यांच्या राजकीय इतिहासाचे सशास्त्र विभाग कसे करता येतील, ते स्थूलमानाने सांगितले.

त्यांनी लिहिले, ‘(१) इ. स. १६४६ पर्यंत शिवाजीच्या पूर्वीचा इतिहास; (२) १६४६ पासून १६८० पर्यंतचा स्वातंत्र्यार्थ लढाईचा इतिहास; (३) १६८० पासून १७०७ पर्यंतच्या स्वातंत्र्यार्थ लढाईच्या शेपटाचा इतिहास; (४) १७०७ पासून १७३१ पर्यंतचा स्वराज्यस्थापनेचा व हिंदुपदबादशाहीचा इतिहास; (५) १७३१ पासून १७६१ पर्यंतचा ब्राह्मणपदबादशाहीचा इतिहास; (६) १७६१ पासून १७९६ पर्यंतचा ब्राह्मणपदबादशाहीच्या जगवणुकेचा इतिहास; (७) १७९६ पासून १८१८ पर्यंतचा महाराष्ट्रसाम्राज्याच्या र्‍हासाचा इतिहास; (८) १८१८ पासून १८९८ पर्यंतचा महाराष्ट्राच्या अवनतीचा इतिहास…मराठ्यांच्या इतिहासाच्या या विषयांबरोबर महाराष्ट्राच्या भूज्ञानाचाही अभ्यास झाला पाहिजे…’