‘दत्ताजी १७५९ च्या नोव्हेंबर महिन्यात अंतर्वेदीत रोहिल्याशी लढत होता, तेव्हाच अबदाली आल्याची बातमी समजली. लगेच दत्ताजीने मल्हाररावाला मदतीस येण्याकरता पत्रे पाठवली होती; परंतु बलवडा, झिलाडा वगैरे भिकार ठिकाणे घेत बसून मल्हाररावाने दोन महिने व्यर्थ दवडले. पेशव्यांनीही (दत्ताजीच्या) मदतीस जाण्याबद्दल मल्हाररावाला वारंवार पत्रे पाठवली होती. मल्हारराव शिंद्यांना जर १७५९ च्या नोव्हेंबरातच जाऊन मिळाला असता, तर रोहिले व सुजाउद्दौला यांचे पारपत्य होऊन अबदाली एकटा राहता व त्याचे पारपत्य त्या दोघा सरदारांना सहजासहजी करता आले असते’… दत्ताजीच्या मृत्यूनंतरच्या परिस्थितीचे विश्लेषण करताना गोविंदपंत तसेच मल्हारराव यांच्या कचखाऊ, वेळ व संधीदवडू वर्तनावर राजवाड्यांनी अशी टीका केली.

त्यामुळे झालेल्या हानीचे स्पष्टीकरण देताना त्यांनी लिहिले, ‘दोन्ही सरदार एकत्र असलियास पठाणाचे पारपत्य उत्तम रीतीने होईल; पठाणात काही फार बल नाही, एकदिल फौज असलिया ते काम सहजात आहे’, असे रघुनाथरावाने पूर्वीच कळवून ठेवले होते. परंतु मल्हाररावाच्या मनात शिंद्यांविषयी अढी पक्की बसली होती. ‘शिंदे पेशव्यांच्या मताने चालतात; नजीबखानाला मारून टाकून पेशव्यांचे राज्य निष्कंटक करून टाकण्याचा शिंद्यांचा आत्मघाती प्रयत्न आहे’, इत्यादी कुकल्पना मनात धरून मल्हाररावाने शिंद्यांना साहाय्य करण्याचे लांबणीवर टाकले व शिंद्यांचा सर्वस्वी नाश झाल्यावर कोटपुतळीस जनकोजीला येऊन तो भेटला. पण त्याच्या येण्याचा फारसा उपयोग झाला नाही. जी गत शिंद्यांची झाली, तीच मल्हाररावांची झाली…’

‘मार्च महिन्याच्या प्रारंभी मल्हाररावाचे सरदार शेट्याजी खराडे, त्याचा मुलगा शिवाजी खराडे, रमाजी यादवाचा मुलगा आनंदरावराम व गंगाधर यशवंत चंद्रचूड यांची व अबदालीची गाठ पडली व चंद्रचूडखेरीज सर्व मंडळी ठार झाली. मल्हारराव होळकर स्वत: मागेच राहिला होता’… हा तपशील नोंदवल्यानंतर राजवाड्यांनी याबद्दलची व्यापक खंत व्यक्त करताना लिहिले, ‘यामागे मागे राहण्याच्या कामी गोविंदपंत बुंदेल्यांशी मल्हाररावांचे साम्य चांगले जुळते. या वेळी मल्हाररावांचे वय ६४ वर्षांचे व गोविंदपंतांचे सुमारे तितकेच असावे. दोघेही वयस्कर झाले असून तरुणपणची तडफ त्यांच्या अंगी राहिली नव्हती. जेथे जातील, तेथे माघार घेण्याचा त्यांचा फार विचार असे. लढाईच्या कामी त्यांचा उत्साह जरी थंडा होत चालला होता, तरी द्वेष, मत्सर, कुढाभाव, स्वामिद्रोह व मित्रद्रोह करण्याच्या कामी या दोघा म्हातार्‍यांचे पाऊल सारखे पुढे होते. द्वेष व मत्सर या गोडतिखट दुर्गुणांना भुलून जाऊन या दोघांनी दत्ताजीचे, पेशव्यांचे (व पर्यायाने मराठेशाहीचेही) अतोनात नुकसान केले.’

शिंद्यांच्या पराजयाची बातमी १७५९ च्या डिसेंबरमध्ये व १७६०च्या जानेवारीत पेशव्यांना समजली. त्या वेळी आपल्या आधीच्या नियोजनानुसार दक्षिण भारतातील उदगीर मोहिमेवर असणारे पेशवे श्रीरंगपट्टणकडे पुढे जाऊ शकणार नाहीत, हे स्पष्ट झाले. ती मोहीम अर्धवट तशीच ठेवून हिंदुस्थानातील सरदारांची पडती बाजू सावरण्याची त्यांना तयारी करावी लागली. त्यासाठी सदाशिवरावभाऊ व बाळाजी बाजीराव ७ मार्च १७६० या दिवशी पडदूर येथे भेटले आणि हिंदुस्थानात कोणी जावे, याबाबत त्या दोघांमध्ये आठ दिवस खलबत झाले… एवढी माहिती देऊन राजवाड्यांनी पुढे लिहिले, ‘पडदूर येथे सदाशिवरावभाऊने हिंदुस्थानात जावे, असा सिद्धांत (निर्णय) झाला. त्याचे मुख्य कारण रघुनाथरावाचा नाकर्तेपणा. राघोबादादाला त्या नाकर्तेपणाची ओळख देता ती त्याला मर्मस्थानी झणाणली व त्याने आपण होऊन उत्तरेत जाण्याचे नाकारले. तसेच घडावे, हे बाळाजी बाजीरावाच्या व सदाशिवरावभाऊच्या मनात होते. कारण आता प्रसंग बिकट होता. माधोसिंग, विजेसिंग, पृथुसिंग, नजीबखान, मल्हारराव, गोविंदपंत व अबदाली असल्या गृहशत्रूंच्या व परशत्रूंच्या पुढे राघोबासारख्या भोळ्या सांबाचा टिकाव क्षणभरही न लागता. असल्या चांडाळचौकडीचा खरपूस समाचार घेण्यास सदाशिवरावभाऊंसारखा पंचतंत्री मुत्सद्दीच हवा होता. बाळाजी बाजीरावाने त्याची केलेली निवड यथायोग्य होती. कारण भाऊ जसा उत्तम मुत्सद्दी म्हणून नावाजला गेला होता, तसा लढवय्या सरदार म्हणूनही त्याचा चांगला लौकिक होता’…

– आनंद हर्डीकर