सुजाउद्दौला, नजीबखान आणि अबदाली या तिघांच्याही खर्याखुर्या मनसुब्यांचा अंदाज घेऊन त्यानुसार आपली पुढची व्यूहरचना आखावयाची, असे सदाशिवरावभाऊंनी ठरवले होते. त्या तिघांची दिल्लीच्या तख्ताबद्दलची भूमिका लक्षात घेणे आवश्यक होते. त्याबद्दलची पार्श्वभूमी राजवाड्यांनी अगदी थोडक्यात सांगितली ती अशी : ‘अलमगीर पातशहाचे सूत्र आतून अबदालीकडे आहे, असे समजून आल्यानंतर १७५९ च्या नोव्हेंबर महिन्यात गाजुद्दिन वजिराने त्याला ठार मारले आणि त्याच्या जागी कामबक्षाचा पुत्र शहाजहान यास पातशहा केले. या शहाजहानचे राज्य म्हणीतल्याप्रमाणे औट घटकेचेच ठरले. १७६० च्या जानेवारीत अबदालीने दिल्ली घेतली, त्यावेळी या राजश्रींचे राज्य संपले. त्या वेळपासून सदाशिवरावाने दिल्ली आगस्टात घेतली, तोपर्यंत तख्तावर कोणी पातशहा नव्हता.’
ही महत्त्वाची माहिती सांगितल्यावर राजवाड्यांनी पाठोपाठ त्याबाबतच्या राजकारणाचे पदर उलगडूनही दाखवले. ‘अबदालीच्या हातात दिल्ली शहर आठ-दहा महिने होते, परंतु त्याने दिल्लीच्या तख्तावर बाबरशहाच्या कुळातील कोणी पातशहा मुद्दामच बसवला नाही. स्वत:ला पातशाही मिळाली तर पाहावे, ह्या हेतूने अबदालीने तख्त रिकामे ठेवले.’ एका बाजूला अबदालीच्या संदर्भातला हा बारकावा जसा राजवाड्यांनी नोंदवला, तसाच सुजाउद्दौला व नजीबखान यांच्या बाबतीतला तपशीलही आवर्जून सांगितला. त्यांनी नमूद केले, ‘बाबरशहाने स्थापिलेल्या तैमुरियाच्या पातशाहीविषयी या दोघांच्या मनात यत्किंचितही भक्ती नव्हती… त्यांच्या मनात अबदालीला पातशहा करावयाचे होते व वजिरी, बक्षीगिरी आपापसात वाटून घ्यावयाची होती. नजीबखान व सुजाउद्दौला पातशाहीच्या संरक्षणार्थ भांडत नव्हते. मराठ्यांशी लढण्यात त्यांचा मुख्य हेतू आपापल्या जहागिर्या जतन कराव्यात व पातशाहीत हवा तसा धांगडधिंगा घालता यावा, हा होता.’
दिल्लीच्या तख्ताभोवती घोटाळणारी आणखी एक महत्त्वाची व्यक्ती होती, अलीगोहर हा आलमगीरचा पुत्र. त्याच्याबद्दलचीही महत्त्वाची माहिती राजवाड्यांनी कागदपत्रांमधून धुंडाळली आणि वाचकांसमोर ठेवली. ‘१७५९ च्या नोव्हेंबरमध्ये भिऊन तो जो पाटण्यास पळून गेला, तो काही केल्या परत येईना. (विशेष म्हणजे) अबदालीने व सदाशिवरावभाऊने दोघांनीही त्याला बोलावणी पाठवली; परंतु कोणाकडेही येण्याची आपली खुषी (इच्छा) नाही, असे त्याने साफ कळवले… पुढे भाऊने जेव्हा दिल्ली घेतली, तेव्हा मात्र त्याने मराठ्यांच्या बाजूला येण्याचा कल दाखवला. मराठ्यांचा वकील शिऊभट त्यावेळी अलीगोहरापाशी होता. त्याच्या उपदेशामुळे अलीगोहर मराठ्यांच्या बाजूला आला खरा; पण लढाईचा कायमचा निकाल झाल्यापासून आपली दिल्लीस यायची खुषी नाही, असे त्याने कळवले व आपला पुत्र जवानबख्त यास भाऊकडे पाठवून दिले.’
परिस्थितीमध्येे हे किंचितसे अनुकूल परिवर्तन झाल्यावर त्यास फायदा घेण्यासाठी आणि अबदालीसह नजीबखान व सुजाउद्दौला यांचेही अंतस्थ हेतू धुळीला मिळवण्यासाठी भाऊने लगेच हालचाल केली, हे स्पष्ट करताना राजवाड्यांनी लिहिले, ‘या जवानख्ताला सदाशिवराभाऊने नाना पुरंधरे व अप्पाजी जाधवराव यांच्या हस्ते १० ऑक्टोबर १७६० रोजी वलीअहद केले (युवराज बनवले), इतकेच नव्हे, तर अलीगोहराला शहाअलम हे नाव देऊन त्याच्या नावाचे गजशिक्केही चालवले… थोडक्यात अलीगोहराला पातशहा करून सदाशिवरावाने अबदालीचा (सुप्त) हेतू समूळ विध्वंसून टाकला… मराठ्यांच्या मनात दिल्लीच्या तख्तावर विश्वासरावाला (बाळाजी बाजीरावाच्या ज्येष्ठ पुत्राला, पेशवेपदाच्या वारसदाराला) बसवायचे आहे, वगैरे ज्या बाजारगप्पा त्यावेळी चोहोकडे पसरल्या होत्या, त्या जागच्या जागी बसवून टाकल्या… दिल्लीच्या तमाम लोकांनी नजरा केल्या व सर्वत्र खुशहाली झाली.’
‘बाबरच्या कुळातील कोणीतरी औरस पुरुष दिल्लीच्या तख्तावर बसवावयाचा व त्याची वजिरी आपण स्वत: करावयाची’, असा सदाशिवरावभाऊचा त्यावेळी बेत होता, हे स्पष्ट करताना राजवाड्यांनी पुढे लिहिले, ते फार महत्त्वाचे होते. ‘सातारच्या छत्रपतींची पेशवाई करून पेशव्यांनी महाराष्ट्रातील सर्व सत्ता जशी आपल्या हातांती घेतली, तशीच दिल्लीच्या पातशहाची वजिरी करून सर्व हिंदुस्थानची सत्ता कायदेशीर रीतीने, विशेष बोभाट न होता व लोकांची मने न दुखविता मिळवावयाची, असा सदाशिवरावाचा विचार होता.’
(अवतरणांतील शुद्धलेखन, व्याकरण मूळ उतार्याप्रमाणे)
