‘सुजाउद्दौल्याला मराठ्यांच्या बाजूला ओढण्यात’ कोणता फायदा सामावलेला होता, हे स्पष्ट करताना राजवाड्यांनी लिहिले, ‘त्याचा प्रांत रोहिल्यांच्या प्रांताला लागून असल्यामुळे त्याच्या प्रांतातून रोहिल्यांच्या प्रांतात दंगा करण्यास मराठ्यांना चांगली सोय झाली असती; सुजाच्या त्या प्रांतातून अबदालीला दाणावैरणही पोहोचली नसती व त्याच्याकडून अबदालीला पैशाची मदतही झाली नसती. शिवाय सुजाउद्दौल्यासारखा मातब्बर मुसुलमान सरदार अबदालीला मिळाला नसता म्हणजे अहमदखान बंगष, हाफीज रहिमतखान वगैरे लहानसहान संस्थानिकही त्या अबदालीला चिकटून राहिले नसते. तो मराठ्यांच्या बाजूस आणिला असता म्हणजे हिंदुस्थानातील सर्व मुसुलमानांना मराठ्यांविषयी विश्वास उत्पन्न होऊन त्यांचीही मदत मराठ्यांना झाली असती…याच कारणाकरता सदाशिवरावभाऊने गोविंदरावाला शंभर वेळा लिहिले होते.’ सुजाउद्दौलाचे महत्त्व प्रतिपक्षालाही माहीत होते, हे सांगताना राजवाड्यांनी लिहिले, ‘सुजा आपल्याला मिळाला म्हणजे बाकीचे सर्व मुसुलमान संस्थानिक आपल्या बाजूला अवश्य आलेच पाहिजेत, ह्याची अबदालीला पूर्ण खात्री होती. पण सुजाच्या व अबदालीच्या मध्ये गोविंदपंताचा (- मराठ्यांचा) प्रांत व त्याची फौज असल्यामुळे सुजाशी बोलणे करण्याचीच अबदालीला प्रथम अडचण आली. ती काढून टाकण्याकरता १७६० च्या मे महिन्यात त्याने जहानखान व नजीबखान यांना गोविंदपंताकडे पाठवून दिले…गोविंदपंताच्या परीक्षेची हीच वेळ होती. (पुढच्या) जयापजयाची सर्व सूत्रे त्यावेळी गोविंदपंताच्या हाती होती…’

त्या संधीचे गोविंदपंतांनी मातेरे कसे केले, याचाही तपशील राजवाड्यांनी आपल्या विवेचनात समाविष्ट केला. त्यांनी लिहिले की, ‘नजीबखानाची व सुजाची भेट हरएक प्रयत्न करून गोविंदपंताने होऊ द्यावयाची नव्हती. सुजाउद्दौल्याला बिठूर वगैरे ठिकाणी जाऊन भेटण्याचा नजीबखानाचा बेत होता, तो हाणून पाडण्याचे काम गोविंदपंताने मनापासून केले नाही. इटावे प्रांतातील सकुराबाद वगैरे ठिकाणचे गोविंदपंताचे ठाणेदार आपापली ठाणी यवनांच्या देखत सोडून देऊन पळत सुटले. स्वत: गोविंदपंत मागे मागेच राहू लागला…’

‘सुजा बोलून चालून मराठ्यांच्या स्नेहाविषयी उदासीन होता चार महिन्यांपूर्वी मराठे आपल्यावर स्वारी करणार होते, ही गोष्ट त्याने इतक्या थोड्या अवधीत विसरून जावी, हे अशक्यच होते. अबदाली व नजीब यांच्याकडून कोणी बोलायला आले नाही, तोपर्यंत मराठ्यांच्या बाजूचे आपण आहोत, असाच त्याने बोलण्याचा क्रम ठेवला पण गोविंदपंताच्या प्रांतातून नजीबखान व जहानखान जेव्हा बिठूरास आले, तेव्हा मात्र तो त्यांना भेटण्यास गंगा उतरून आला…’ ही वास्तविकता मांडल्यावर राजवाड्यांनी एक बारकावा स्पष्ट केला. जरी सुजा अब्दालीच्या दूतांना भेटणार होता, ‘तरीही त्याने त्याच वेळी जवळ असणार्‍या शामजी रंगनाथ नावाच्या मराठ्यांच्या वकिलाबरोबर सदाशिवरावाला लिहून पाठवले की, गोविंदपंताने इटावे प्रांतातून नजीबखानाला येऊ दिले नसते व त्या प्रांतातील ठाणी कायम राखून ठेवली असती, तर आपल्याला त्यांना भेटणही जरूर न पडते…याच पत्रात त्याने आणखी असेही कळवले की, जर पुन्हा गोविंदपंत इटावे प्रांतात अंमल बसवील, तर आपण फौजेसुद्धा त्याच्या साहाय्याला जाऊ व नंतर गोविंदपंतासह जहानखान व नजीबखान यांजवर चाल करून जाऊ.’

सुजाने तयारी दाखवली; पण गोविंदपंताच्या हातून तो अंमल बसवण्याचे काम काही झाले नाही. उलट त्याने सदाशिवभाऊला सैन्य पाठवण्याची विनंती केली. भाऊला तसे करणे शक्यच नव्हते, कारण तो व गोविंदपंताचा प्रांत यामध्ये दुथडी भरून वाहणार्‍या दोन नद्या होत्या. त्यावर गोविंदपंताने कळवले की, ‘आपण जवळ आल्याखेरीज सुजाला मराठ्यांना येऊन मिळण्याचे धैर्य होत नाही; तेव्हा आपण जलद आग्र्याजवळ येऊन पोचावे म्हणजे दहशत पडून जहानखान व नजीबखान परत अबदालीकडे जातील व सुजा एकटाच राहून आपल्याला येऊन मिळेल.’ हा सल्ला मानून सदाशिवराव तातडीने गंभीर नदीच्या तीरावर जाऊन पोचलासुद्धा, तेव्हाच त्याला बातमी समजली की, नजीबखानाचा उपदेश ऐकून सुजा अब्दालीकडेच जाणार आहे, मराठ्यांना येऊन मिळण्याचा त्याचा विचार नाही… – आनंद हर्डीकर