‘गोविंदपंताच्या हातून सांगितलेली कामे नीट होत नाहीत, हे लक्षात आल्यावर सदाशिवरावभाऊने त्याला कामावरून काढून टाकावयाला हवे होते, पण तसे एकदम करणे दुरापास्त होते. मल्हारराव होळकर व जनकोजी शिंदे यांच्या खालोखाल वजनदार माणूस म्हणजे गोविंदपंतच होता. त्याला काढले म्हणजे त्याच्या जागी या सरदारांपैकी कोणीतरी त्या प्रांतात पाठवणे आवश्यक झाले असते; परंतु हे दोघे सरदार त्यावेळी अगदी हैराण झाले होते, त्यांना आपल्या जवळच ठेवणे भाग होते.
शिवाय त्या सरदारांच्या सैन्याला (बरोबर) घेतल्याशिवाय आपल्याला अबदालीशी बरोबरीच्या नात्याने सामना करता येईल, अशी भाऊची समजूत नव्हती. त्यामुळे गोविंदपंताला एकाएकी तोडणे भाऊला प्रशस्त वाटेना… थोडे कडक बोलले, थोडासा धाक दाखवला म्हणजे तो ताळ्यावर येईल व सांगितलेली कामगिरी बजावील, असा भाऊचा अंदाज होता. त्यावरच भिस्त ठेवून भाऊने गोविंदपंताला अंतर्वेदीत राहू देऊन त्याच्याकडे आणखी काही कामगिर्या सोपवल्यासुद्धा…’ अशा शब्दांत राजवाड्यांनी भाऊबद्दलच्या विवेचनाचा एक टप्पा पूर्ण केला.
‘यमुना नदीला भरपूर पाणी आल्यामुळे आणि जड सामान नेण्यास नावा वेळेवर न मिळाल्यामुळे सदाशिवरावभाऊला यमुना उतरून अबदालीचे पारपत्य करण्याचे साधले नाही; तेव्हा त्याने शत्रूच्या पारपत्याची दुसरी योजना केली’, अशी माहिती सांगत राजवाड्यांनी भाऊच्या युद्धनेतृत्वाच्या वैशिष्ट्याचा गौरव सूचित केला. लढवय्या सेनानी अशा वेळी पर्यायी योजना बनवून ती अमलात आणण्यामागे लागतो. सदाशिवभाऊने नेमके तसेच केले. त्याबद्दल राजवाडे यांनी लिहिले, ‘अबदाली, नजीब खान व सुजाउद्दौला हे त्यावेळी दिल्लीजवळ यमुनेच्या उत्तरतीराला शिकंदर्याला जाऊन बसले होते.
त्यांच्या पाठीला गंगा नदी होती. डाव्या बाजूला सकुराबादपर्यंत जाटांची, मराठ्यांची व गोविंदपंताची ठाणी बसली होती. उजव्या बाजूला मात्र वेळ पडल्यास सरहिंदाकडे निसटून जाण्यास त्यांना मार्ग होता. सदाशिवरावाला जर यमुना उतरता आली असती, तर त्याने अबदालीला पूर्वेकडून पश्चिमोत्तर दिशेकडे रेटीत नेले असते. आता मात्र सदाशिवभाऊच्या मनात अशी योजना आली की, यमुनेच्या दक्षिणतीराने मथुरा, दिल्ली, कुंजपुरा या शहरांवरून जाऊन पश्चिमोत्तरेकडून यमुना उतरून अंतर्वेदीत यावे व अबदालीला पूर्वेकडे कोळजळेश्वर, सकुराबाद वगैरे ठाण्यांवरून रेटीत गोविंदपंताच्या अंगावर नेऊन सोडावे.
या योजनेप्रमाणे सदाशिवराव स्वत: मथुरेच्या दिशेने चालता झाला व गोविंदपंताने कोळजळेश्वर ऊर्फ अलिगडपर्यंत मराठ्यांची ठाणी बसवावीत, अबदालीच्या भोवतालचा मुलूख वैराण करावा, रोहिल्यांच्या मुलखात सोरमच्या घाटाने उतरण्याची आवई उठवावी व सुजाउद्दौल्याच्या प्रांतात दंगे माजवावेत, असे त्याने ठरवले.’
या योजनेची अंमलबजावणी कसकशी होत गेली आणि टप्प्याटप्प्याने अबदालीला शह कसा दिला गेला, याचे धावते वर्णन करताना राजवाडे लिहितात, ‘सदाशिवराव १६ जुलैला मथुरेस आला. तेथून शिंदे, होळकर व बळवंतराव गणपत मेहेंदळे यांना त्याने दिल्लीस पुढे रवाना केले. स्वत: ३० जुलैला तो त्या शहरी जाऊन पोहोचला. दिल्ली शहर बळवंतरावने अगोदरच सर केले होते.
आतील किल्ला घ्यावयाचा राहिला होता, तो सदाशिवरावभाऊ आल्यावर १ आगस्टला मराठ्यांच्या हाती पडला. याकूबअल्ली खान म्हणून अबदालीचा कोणी सरदार किल्ल्यात होता, तो एकटाच इतर लोकांना (मागे) टाकून नावेतून पळून गेला…किल्ल्याच्या आत अबदालीकडील लोक होते, त्यांस कौल देऊन हत्यारांसुद्धा (=सह)बाहेर काढून दिले व पावसाळा सुरू झाला म्हणून मराठे दिल्लीभोवती सुमारे दोन महिने तळ देऊन राहिले… मराठ्यांनी दिल्ली घेतली, ही बातमी हिंदुस्थानात लवकरच पसरली.
दिल्ली शहर म्हणजे पातशाहीचे मुख्य ठिकाण. मराठ्यांनी ते अबदालीच्या लोकांपासून हिसकावून घेतले, या गोष्टीने मराठ्यांचा दरारा पूर्वी होता त्यापेक्षाही आता जास्त वाढला आणि त्याच मानाने अबदालीचा कमी झाला. खुद्द अबदालीच्या सैन्यात व त्याच्या साथीदारांत फूटफाट होऊ लागली. कित्येक गिलचे व अफरीदी लोकही अबदालीला सोडून निघाले…’
(अवतरणांतील शब्द मूळ शुद्धलेखनाप्रमाणे)
