ऐतिहासिक साधनांच्या पहिल्या खंडाची प्रस्तावना संपवण्यापूर्वी वि. का. राजवाडे यांनी संक्षेपाने का होईना, ज्या अनेक मुद्द्यांबद्दल भाष्य केले होते, त्यांतला आणखी एक मुद्दा सांगून त्या प्रस्तावनेची माहिती संपवायची आहे. तो मुद्दा म्हणजे ‘मराठ्यांचा इतिहास लिहावा तरी कसा?’ या प्रश्नाचे उत्तर देताना राजवाड्यांनी लिहिले, ‘मराठ्यांचा इतिहास शास्त्रीय पद्धतीने लिहिला, तरच त्याला काही किंमत देता येईल… इतिहास उत्तम तर्‍हेने कसा लिहिता येईल, याची फोड युरोपातील शास्त्र्यांनी करून ठेवलेली आहे. ह्या फोडीचा फायदा करून घेऊन (= त्या उदाहरणावरून धडे गिरवून) मराठ्यांच्या इतिहासाची इमारत उभारली पाहिजे.’

त्यानंतर मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करणार्‍यांना मार्गदर्शनपर सल्ला देताना राजवाड्यांनी लिहिले, ‘कोणताही पूर्वग्रह बाळगून इतिहास किंवा चरित्रे लिहावयास लागू नये. आतापर्यंत लिहिलेल्या बहुतेक चरित्रांतून हा दोष ढळढळीत दिसून येतो… कित्येकांचा पूर्वग्रह मराठे सर्व प्रकारे श्रेष्ठ होते, असे दाखवण्याचा असतो; कित्येकांचा ह्याच्या उलट असतो. तेव्हा पूर्वग्रहांना टाळा देणे (= ते टाळणे) ही मुख्य गोष्ट होय… भरपूर अस्सल माहिती मिळाल्याशिवाय चरित्र किंवा इतिहासाचा भाग लिहिण्याचा खटाटोप करू नये… तशातूनही लिहावयाचा अगदी संकल्पच असेल, तर आपल्याला कोणती माहिती नाही, ते स्पष्ट लिहावे. अस्सल भरपूर लेखसंग्रह (= संदर्भसामग्री) जवळ असल्यावाचून जो कुणी इतिहास लिहावयाला जाईल, त्याला माहिती नाही, असा शेरा पुष्कळ प्रसंगांसंबंधी मिळाल्यावाचून राहणार नाही.’

‘अस्सल व भरपूर माहितीच्या आधारे इतिहास लिहिणार्‍यांनी त्यावरून काही सिद्धांत (= निष्कर्ष) काढावयाचा असेल, तर काढावा’, असे सांगून राजवाड्यांनी नंतर लगेच त्याचे स्पष्टीकरण देताना लिहिले, ‘हे ताजे म्हणणे जुन्या, पहिल्याच अपेक्षेचे रूपांतर आहे, अशी समजूत होण्याचा संभव आहे; परंतु तसा प्रकार नाही. पहिल्या म्हणण्यात पूर्वग्रहप्रधान पद्धतीचा निर्देश केलेला आहे. यानंतरच्या म्हणण्यात पश्चाद्ग्रहप्रधानपद्धतीचा निर्देश केला आहे. पूर्वग्रह मनसोक्त काढलेलाच असतो. पश्चाद्ग्रह अस्सल भरपूर आधारातून जात जो निघेल, तोच घ्यावयाचा असतो… कित्येक ग्रंथांतून या दोन्हींंची भेसळ झालेली आढळून येते.’

राजवाड्यांनी लिहिले, ‘उदाहरणार्थ एका ग्रंथातील शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानात्मक राज्यपद्धतीविषयीची मांडणी पाहा. त्या मांडणीत तीन सिद्धांत ठरवावयाचे आहेत… अ) शिवाजीची राज्यपद्धती अष्टप्रधानात्मक होती; ब) ती मुसलमानांच्या राज्यपद्धतीहून निराळी होती; क) व युरोपातील क्याबिनेट गव्हन्र्मेंटसारखी ती होती…या मांडणीतील पहिला भाग तेवढा बहुतांशी पश्चाद्ग्रहोत्पन्न म्हणजे साधार आहे. शिवाजीची राज्यपद्धती (अष्ट)प्रधानात्मक होती, असे विधान करण्यास काही हरकत नाही. त्या प्रधानांची संख्या नेमकी आठ होती की नऊ होती की अकरा होती, याबाबतचा वाद असला, तरी ती प्रधानात्मक होती, हा सिद्धांत (=निष्कर्ष) साधार आहे, हे निर्विवाद!’

‘आता ही राज्यपद्धती शिवाजीने अजिबात नवीन शोधून काढली किंवा मुसुलमानांपासून घेतली किंवा पूर्वीच्या संस्कृत नीतिशास्त्रातून घेतली?’ हा प्रश्न उपस्थित करून राजवाड्यांनी जे उत्तर दिले, ते फार महत्त्वाचे आहे. त्यांनी लिहिले, ‘माझ्या मते शिवाजीने ही राज्यपद्धती मुसुलमानांपासून घेतली. पेशवा, मुजुमदार, वाकनीस, सुरनीस, डबीर वगैरे अधिकार्‍यांची नावे मुसुलमानांच्या दरबारातील आहेत. त्यांना मुख्य प्रधान, अमात्य, मंत्री, सचिव, सुमंत ही संस्कृत नावे शिवाजीने दिली. बाकी शिवाजीची पद्धती मुसुलमानी पद्धतीचेच हुबेहूब अनुकरण होते… ही पद्धत प्रस्तुतच्या युरोपातील क्याबिनेट पद्धतीप्रमाणे तर नव्हतीच, परंतु सतराव्या शतकातील युरोपातील कित्येक देशांमधील क्याबिनेट पद्धतीप्रमाणे काहीशी होती; त्या दोन पद्धतींत अंतर असे आहे की, शिवाजीचे न्यायाधीश व पंडितराव या दोन प्रधानांखेरीज बाकीचे सर्व प्रधान लढाया करीत व युरोपातील प्रधानांना हा शिपाईिगरीचा धंदा बहुश: माहीत नसे. सारांश, शिवाजीच्या प्रधानमंडळींचे साम्य युरोपातील कोणत्याही शतकातील क्याबिनेटशी नाही. शिवाजीने केवळ मुसुलमानांचा कित्ता गिरवलेला आहे!’