राजवाड्यांनी ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ या शीर्षकाचे एकूण २२ खंड प्रकाशित केले, त्यांतील सर्व खंडांना काही त्यांनी प्रस्तावना लिहिल्या नाहीत. सहाव्या खंडांपर्यंतच्या प्रस्तावनांचा आपण शक्य तितका परिचय करून घेतला आहे. आता एकाच आठव्या खंडाच्या मोठ्या प्रस्तावनेचा आणि तीन खंडांच्या अगदीच छोट्या प्रस्तावनांचा आढावा घेणे शिल्लक राहिले आहे. याच टप्प्यावर त्यांनी उरलेल्या खंडांमधून वाचकांना काय काय उपलब्ध करून दिले, हे समजून घेणे आवश्यक आहे.

सातवा खंड १९०४ साली मुंबईहून प्रकाशित झाला होता, त्या खंडाची एकूण पृष्ठसंख्या ४३४ असली, तरीही ती ३८ अधिक १० अधिक २२६ अधिक ३२ अधिक १२८ अशा पाच विभागांत विखुरलेली होती. बहुधा तो संपूर्ण खंड एकाच मुद्रणालयात छापला न जाता वेगवेगळ्या छापखान्यांच्या सहकार्याने तयार केला गेला असावा. ‘या खंडाच्या कामकाजात म्हणजे साधनांच्या संकलनात व लिप्यंतरामध्ये ना. कृ. गद्रे, ज. र. घारपुरे, वा. रा. जोशी या तिघांचे आपल्याला साहाय्य झाले’, अशी राजवाड्यांनी नोंद मात्र केली होती. हैदराबाद येथील पेशव्यांचे वकील गोविंदराव काळे यांच्या संग्रहातील पत्रे या खंडात समाविष्ट होती, तसाच खड्र्याच्या लढाईसंबंधीचा काही पत्रव्यवहारही समाविष्ट होता. सरंजामे सरदारांची यादी, दुसर्‍या बाजीरावाविषयीची टिपणे व काही मराठी शब्दांची व्युत्पत्ती कशी झाली, याबद्दलचा खुलासाही या खंडामध्ये होता.

नववा खंड १९०६ साली धुळ्याहून प्रकाशित झाला. तो पृष्ठसंख्येच्या दृष्टीने अगदीच लहान होता, त्यामध्ये फक्त एकाच शिलालेखावरचा मजकूर देण्यात आला होता; पण मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने तो खूप महत्त्वाचा होता. ‘सत्कार्योत्तेजक सभे’च्या ‘प्रभात’मासिकात प्रसिद्ध झालेला तो तंजावरचा शिलालेख तेथील बृहदीश्वर देवालयात कोरलेला असून राजवाड्यांनी तेथे जाऊन प्रचंड सायासाने तो मिळवला म्हणजे शब्दबद्ध केला.

एवढा मोठा शिलालेख अन्यत्र कुठेही पाहण्यात नाही, हे तर त्या शिलालेखाचे एक वैशिष्ट्य होतेच; परंतु तंजावर येथील राजघराण्यामधील अधिकारी पुरुषांच्या आज्ञेवरून तो कोरला गेलेला असल्यामुळेही तो अत्यंत महत्त्वाचाही ठरला. समग्र राजवाडे साहित्याच्या चौथ्या खंडात सर्वांत शेवटी छापलेला तो मजकूर सलग ५९ पानांचा आहे, हे लक्षात घेता शिलालेख म्हणून त्याची असणारी भव्यता आपल्या सहज लक्षात येऊ शकते आणि तो शोधून काढल्याबद्दल व सुबोध लिपीबद्ध स्वरूपात उपलब्ध करून दिल्याबद्दल राजवाड्यांचे अपार ऋण मान्य करावेसे वाटते.

साधनांचा तेरावा व चौदावा खंड बर्‍याच वर्षांनी म्हणजे १९१८ साली राजवाड्यांनी पुण्यातून एकाच वेळी प्रसिद्ध केेले. रायरीकर व खासगीवाले यांच्या दफ्तरांतील थोरल्या माधवरावांच्या काळातील पत्रे या खंडांमध्ये समाविष्ट होती. त्यांची पृष्ठसंख्या अनुक्रमे १६५ व ८२ होती.

पंधरावा खंड पृष्ठसंख्येच्या दृष्टीनेही मोठा होता (४८८) आणि समाविष्ट कागदपत्रांच्या संख्येच्या दृष्टीनेही दखलपात्र होता (४५३) धुळ्याहून १९१२ सालीच प्रकाशित झालेल्या या खंडात राजवाड्यांनी जगदाळे, जेधे देशमुख, गुप्ते, देशपांडे, राजोपाध्ये व ब्रह्मे या सहा घराण्यांतील शिवकालीन पत्रव्यवहाराचा समावेश केला होता.

सोळावा-सतरावा-अठरावा हे तीन छोटे-छोटे खंड मुंबईहून १९१२, १९१३ व १९१४ साली प्रसिद्ध झाले. त्यांची पृष्ठसंख्या अनुक्रमे ८७ (कागदपत्रेही ८७); ५४ (कागदपत्रे ४४) आणि ९३ (कागदपत्रे ६४  व जेधे शकावलीची काही पाने) अशी होती. शिवकालीन विविध घराण्यांची ही कागदपत्रे होती.

एकोणिसावा खंड १९१४मध्येच मुंबईहूनच राजवाड्यांनी प्रसिद्ध केला, तोही पृष्ठसंख्येच्या दृष्टीने लहानच होता (१३८); परंतु हैदर व टिपू यांच्या दरबारातील पत्रांचा व श्रीरंगपट्टण येथील पेशव्यांचे वकील कृष्णाजी नारायण जोशी यांच्या पत्रव्यवहाराचा समावेश असल्यामुळे ऐतिहासिक दृष्टीने तो अधिक महत्त्वाचा होता. पुढे १९१५ साली १६ ठिकाणच्या शिवकालीन कागदपत्रांचे संकलन असणारा ४७६ पृष्ठांचा विसावा खंड पुण्याहून तर ३६० पृष्ठांचा एकविसावा खंड त्यांनी धुळ्याहून १९१९ साली प्रसिद्ध केला. बाविसावा खंड मध्यंतरी १९१७ मध्ये मुंबईहून प्रसिद्ध झाला, तो फक्त १३७ पृष्ठांचाच होता. 
anand47.hardikar@gmail.com