डॉ. हमीद दाभोलकर
देवाच्या अस्तित्वाविषयीच्या जोरदार चर्चा ही अनादी काळापासून चालू असलेली आणि जोपर्यंत मानवी अस्तित्व आहे तोपर्यंत चालू राहील अशी एक चर्चा आहे. महाराष्ट्रात साधारण ३० वर्षांच्या पूर्वी डॉ. श्रीराम लागू यांनी ‘परमेश्वराला रिटायर करा’ अशी भूमिका मांडल्यावर उठलेले वादळ अनेकांना आजही आठवत असेल. याच कालखंडात, देव आणि धर्माच्या नावावर शोषणाला विरोध, पण देव आणि धर्माच्या मानवतावादी रूपाविषयी मैत्रभाव अशी भूमिका घेऊन कार्यरत असलेले डॉ. नरेंद्र दाभोलकर महाराष्ट्र अंनिसचे काम करत होते. डॉ. श्रीराम लागू आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी विवेकजागराचा वाद संवाद नावाने राज्यभर केलेले कार्यक्रम देखील अनेक लोकांना आठवत असतील. हे सर्व नव्याने आठवण्याचे कारण म्हणजे जावेद अख्तर आणि मुफ्ती शमेल रझवी यांच्यामधला एक असाच वाद सध्या गाजत आहे.
या वादामध्ये जावेद अख्तर हे डॉ. श्रीराम लागू यांच्या भूमिकेला जवळ जाणारी- देवाचे अस्तित्व नाकारणारी भूमिका मांडतात; तर मुफ्ती शमेल रझवी हे देवाच्या अतित्वाविषयाची भूमिका मांडतात. ज्या कालखंडात देव आणि धर्म हे आपल्या देशातील समाजकारण आणि राजकारण यांचे मध्यवर्ती विषय झाले आहेत त्या कालखंडात अशी चर्चा समाजात होणे हे औचित्यपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर देव आणि धर्माविषयी तो संपूर्णपणे नाकारणारी किंवा संपूर्णपणे स्वीकारणारी या दोन टोकांच्या भूमिकांपेक्षा मुळातूनच वेगळी असलेली तिसरी भूमिका मांडणे हा या लेखाचा मुख्य उद्देश आहे. गेली ३५ वर्षे महाराष्ट्र अंनिस ही भूमिका घेऊन कार्यरत आहे.
आपण देवाची व्याख्या काय करतो इथून या वादाची सुरुवात होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर करीत असलेल्या मांडणीनुसार, एखादी व्यक्ती देव मानते की नाही याचे उत्तर या व्याखेवर अवलंबून आहे. त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर कोणत्याही धर्मातील देवाच्या व्याख्येमध्ये तीन प्रमुख भाग दिसतात. यापैकी पहिला भाग पाठीराखा, सल्लागार, समुपदेशक अशा स्वरूपाचा. आयुष्यात अडचणीच्या कालखंडात सर्व धर्मांतील अनेक लोकांना या स्वरूपातील देव आठवतो. तो आपल्याला आधार देईल अशी भावना आयुष्यातील अवघड कालखंडातील लढाईला बळ देते. आधुनिक मानसशास्त्रातील समुपदेशकाच्या जवळ जाणारे हे देवाचे रूप आहे. ते योग्य आहे का नाही, याविषयी वाद होऊ शकतात; पण व्यापक मानवतावादी भूमिकेतून ते समजून घेता येऊ शकते. त्याविषयी सहानुभूतीही राखता येऊ शकते
देवाचे दुसरे रूप संपूर्ण जगाचा निर्माता आणि त्याहीपुढे जाऊन नियंता म्हणजे चालक असे समजले जाते. पृथ्वीवरील मानवासहित सर्व प्राणिमात्रांची निर्मिती कशी झाली याचे शास्त्रीय उत्तर आता उत्क्रांतीची प्रक्रिया देते. त्यामुळे जगाच्या निर्मिताचा प्रश्न निकालात निघतो. यातील दुसरा भाग हा जगावरील ‘नियंत्रणा’चा आहे. देव हा पृथ्वीचा नियंता (नियंत्रक) आहे म्हणजे मानवी आयुष्यात त्याने केलेल्या कुठलाही गोष्टीवर त्याचे स्वत:चे नियंत्रण नसून ते दुसरी कोणी शक्ती ठरवत आहे असा त्याचा सरळ सरळ अर्थ होतो. एकदा हे मान्य करायचे ठरले की मानवी कर्तृत्व ही गोष्ट आपल्या जीवनातून पूर्णपणे वजा होते. प्रत्येक धर्मानुसार वेगळा नियंत्रक ही कल्पना करणेदेखील अवघड आहे. एकुणात जगात आपल्या आजूबाजूला होत असलेला विध्वंस आणि संहार पाहिला तर या नियंत्रकांच्या कल्पनेविषयी अनेक प्रश्न निर्माण होतात.
देवाची तिसरी कल्पना ही मात्र देवाच्या नावावर केलेल्या शोषणाची आहे. यानुसार काही कर्मकांड आणि विधी यांच्या माध्यमातून देव पावतो किंवा काही गोष्टी केल्याने तो कोपतो अशीही देवाच्या रूपातील शासकाची कल्पना आहे. हा शासक स्वत: दिसत नसल्याने मग देवाचे अवतार म्हणवून घेणारे सर्वधर्मीय लोक, देवाच्या नावावर दीनदुबळ्या लोकांची फसवणूक करणारे महाभाग यामध्ये येतात. अशा मध्यस्थीला विरोध करणे हे आपले कर्तव्य आहे, हे मध्ययुगीन काळापासून इथल्या संत आणि समाजसुधारकांनी सांगून ठेवले आहे, त्यामुळे या गोष्टीला ठाम विरोधच व्हायला हवा. तो विरोध ही तिसरी भूमिका करते.
त्यामुळे तिन्ही गोष्टींचे सार एका वाक्यात सांगायचे झाले तर, ‘देव आणि धर्माच्या कल्पनांची सकारात्मक चिकित्सा आणि मानवतावादी देव आणि धर्म कल्पनांशी मैत्री’ अशी ही भूमिका आहे. ‘जे का रंजले गांजले। त्यांसि म्हणे जो आपुले।। तोच साधू ओळखावा। देव तेथेच जाणावा।। ही तुकाराम महाराजांनी सांगितलेली किंवा ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ या साने गुरुजीच्या धर्मकल्पनेला जवळ जाणारी ही भूमिका आहे – ही कुठल्या परकीय भूमीतून आलेली कल्पना नसून इथल्या संत आणि समाजसुधारकांच्या मांडणीमध्ये पुन्हा पुन्हा अधोरेखित झालेली भूमिका आहे!
ही भूमिका स्वीकारणे, मांडणे हा केवळ धोरणीपणा नसून ती अंनिसची प्रामाणिक भूमिका आहे. अंनिसने केलेले पर्यावरणपूर्वक सण उत्सवांच्या विषयीचे लढे हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. पर्यावरणपूरक गणपतीचा आग्रह धरण्यात विरोध हा गणपती उत्सवाला नाही. यामध्ये आपला उत्सव हा पर्यवरणपूरक असावा त्याने पर्यावरणाची हानी होऊ नये अशी साद घातली गेली आहे. स्वाभाविक आहे की धर्माच्या नावावर कट्टरपंथीय विचार जाणीवपूर्वक पसरवल्या जाणाऱ्या या कालखंडातदेखील त्याला समाजमनाचा प्रतिसाद मिळत राहतो. ज्या कोल्हापुरात तीस वर्षांपूर्वी विसर्जित गणपती दान मोहिमेला विरोध झाला होता त्याच कोल्हापुरात आज हजारो लोक स्वयंप्रेरणेने गणपती दान करतात याचे एक महत्त्वाचे कारण यामागची भूमिका आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
देवाच्या अस्तित्वाविषयीची चर्चा धर्माच्या संदर्भाशिवाय करणे हा एक महत्त्वाचा असला तरी केवळ बौद्धिक पातळीवरचा वादविवाद राहतो, हेही आपण समजून घेतले पाहिजे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे देवाच्या अनुषंगाने येणारे सगळे वर्तन धर्म नियमांनी बांधलेले असते आणि त्या नियमांचा अर्थ लावण्याची परवानगी मात्र मोजक्या लोकांना असते, हे आहे. केवळ तितकेच नाही तर देवाच्या कल्पनेवर विश्वास न ठेवणारे नास्तिक हे आपापल्या धर्माच्या वर्चस्ववादासाठी मात्र अतिशय टोकाची भूमिका घेताना दिसतात. याची बोलकी उदाहरणे भारताच्या इतिहासात सावरकर आणि जिना यांच्या रूपात आहेत, हेदेखील आपण समजून घेतले पाहिजे.
याच संदर्भातील दुसरा मुद्दा म्हणजे भारतातील बहुतांश समाजसुधारकांनी धर्म नाकारण्यापेक्षा धर्माच्या चिकित्सेची भूमिका घेतली आहे. महात्मा फुले यांची निर्मिक कल्पना आणि सार्वजनिक सत्य धर्म, बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारलेला बौद्ध धम्म ही त्याची ठळक उदाहरणे आहेत. महात्मा गांधीनीदेखील आपली भूमिका ‘ईश्वर हेच सत्य आहे’ पासून बदलून ‘सत्य हेच ईश्वर आहे’ अशी केली होती याची आपण नोंद घ्यायला हवी. ‘जगातील धर्म मानणारे बहुतांश लोक हे नास्तिकच असतात, पण इतर धर्मांतील देवांविषयी!’ हे प्रसिद्ध वचन आस्तिक आणि नास्तिक वाद हिरिरीने खेळणाऱ्या सगळ्यांनाच विचार करायला लावणारे आहे.
भारताची राज्यघटना इथल्या नागरिकांमध्ये देव, धर्म मानणे अथवा न मानणे यावरून भेदभाव करीत नाही. प्रत्यक्षात मात्र इथल्या शासनाची वाटचाल याला पूर्ण विपरीत चाललेली आपल्याला दररोज दिसून येते. धर्माधिष्ठित राज्य स्थापनेच्या घोषणा उच्चरवात केल्या जातात. इतर धर्मांच्या लोकांचे सण साजरे करणाऱ्यांवर हल्ले केले जातात. धर्माच्या नावावर चालेल्या शोषणाला विरोध करणाऱ्यांना धर्मद्रोही आणि देशद्रोही ठरवून त्यांना ट्रोल केले जाते. ते जर त्याला देखील घाबरले नाहीत तर त्यांचे खून केले जातात असा हा कालखंड आहे. देवाच्या अस्तित्वाविषयीच्या वादाचे औचित्य तर आहेच पण त्याचा संबंध आपल्या दैनंदिन जीवनातील धार्मिक वर्तनापासून दूर, वेगळा ठेवणे हे केवळ आपली बौद्धिक खुमखुमी भागवणारे ठरेल असे वाटते. आपण कुठलाही देव आणि धर्म पाळत असलो तरी त्याची आपण चिकित्सा करणार नसू तर, त्यामध्ये आपल्याला देवाच्या आणि धर्माच्या नावावर फसवले जाण्याचा धोका आहे म्हणूनच विधायक काल सुसंगत धर्मचिकित्सेला पर्याय नाही. ‘देव रोकडा सज्जनी’ या संत तुकारामांनी सांगितलेल्या भूमिकेपर्यंत आपल्याला हाच मार्ग घेऊन जाऊ शकतो.
–डॉ. हमीद दाभोलकर, कार्यकर्ता महाराष्ट्र अंनिस
hamid. dabholkar@gmail. com
