दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांत झालेला आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप, त्यानंतर अटक, नऊ महिने कैद, मग जामीन ते गेल्या वर्षी एप्रिलअखेर दिल्ली उच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) प्रकरण बंद करण्याचा अहवाल स्वीकारेपर्यंत सुरेश कलमाडी या नावाची चर्चा कायम राजकारणातील भ्रष्टाचार याच मुद्द्याभोवती फिरत राहिली. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध होऊ शकत नसल्याने प्रकरण बंद करण्यात येत असल्याचा ‘ईडी’चा अहवाल आला, तोवर कलमाडी यांची राजकीय कारकीर्द एका अर्थी संपली होती. एके काळी ‘सबसे बडा खिलाडी’ अशी ख्याती असलेल्या कलमाडी यांनी आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपामुळे १४ वर्षे अक्षरश: राजकीय वनवास भोगला. या प्रकरणानंतर काँग्रेस पक्षाने दिलेले अंतर आणि २०१४ पासून भारतीय जनता पक्षाची केंद्र, राज्य आणि पुणे महापालिकेच्या स्तरावरही घट्ट होत गेलेली पकड यात सुरेश कलमाडी हे नाव राजकारणातून मागे पडत गेले. अर्थात, त्यामुळे त्यांनी त्याआधी तीन-चार दशके पुणे आणि देशाच्या राजकारणावर टाकलेला प्रभाव न विसरता येण्यासारखा. पुण्याच्या सेंट व्हिन्सेंट शाळेत शालेय शिक्षण आणि नंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) प्रशिक्षण घेऊन कलमाडी हवाई दलात वैमानिक म्हणून दाखल झाले, तेव्हा त्यांना पुढे आपण राजकारणात जाऊ, असे कदाचित वाटलेही नसावे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातही ते सहभागी होते. सामाजिक- राजकीय- सांस्कृतिक जीवन ढवळून काढणाऱ्या याच दशकाच्या उत्तरार्धात एका वळणावर ते राजकारणात शिरले आणि १९७७ मध्ये पुणे युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. सन १९८२ पासून राज्यसभेवर खासदार झाल्यापासून ते एकूण चार वेळा या सभागृहाचे सदस्य होते. १९९६, २००४ आणि २००९ असे तीनदा ते पुण्याचे खासदार म्हणून लोकसभेत गेले. त्यात १९९६ मध्ये रेल्वे राज्यमंत्रीपद भूषविण्याची संधीही त्यांना मिळाली.

कलमाडी यांची खरी ओळख मात्र पुण्याचा राजकीय-सांस्कृतिक चेहरामोहरा बदलणारा नेता अशीच अधिक ठसते. त्यांनी राजकारणही वलयांकित केले. किंबहुना तोच त्यांच्या राजकारणाचा पोत होता. त्यांच्या प्रचाराला येणारे चित्रपट तारे-तारका, त्यांच्या पार्ट्या यांची बरीच चर्चा झाली. नव्वदच्या दशकातील आर्थिक उदारीकरणानंतर कात टाकत असूनही पुणेकरांसाठी तो सांस्कृतिक धक्काच होता. पण वलयांकित उत्सवीकरणही लोकाभिमुख करण्याची हातोटी कलमाडींकडे होती. पुणे फेस्टिव्हल, आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुणेकरांनी स्वीकारले, वाढवले आणि त्यांचीही परंपरा निर्माण झाली.

कलमाडी यांच्या राजकीय प्रवासात ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे मार्गदर्शक. त्यांच्याच जोडीने १९९० च्या दशकात पुणे महापालिकेवर काँग्रेसची सत्ता प्रस्थापित केल्यानंतर आणि विठ्ठलराव गाडगीळ यांच्यानंतर पुण्याचे नेतृत्व एकहाती ताब्यात घेतल्यानंतर कलमाडींनी बराच काळ मागे वळून पाहिले नाही. तत्पूर्वी, १९९१ मध्ये पवारांना पंतप्रधान करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचीही राजकीय इतिहासाने दखल घेतली. पायाभूत सुविधा आणि विज्ञान-तंत्रज्ञानाला चालना देतानाही त्याचे उत्सवीकरण करण्यात त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही, हे त्यांचे वैशिष्ट्य. १९९४ मध्ये पुण्यात झालेली राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, त्यापूर्वी बालेवाडीत बांधले गेलेले श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल ते २००८ मधील राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने त्यांनी रस्ते, वाहतुकीसारख्या विकासाला दिलेले नवे आयाम आणि विज्ञान-तंत्रज्ञानात जैवतंत्रज्ञान, अॅनिमेशन अशा नवीन विषयांचा समावेश हे फक्त वानगीदाखल.

पुणे म्हणजे सुरेश कलमाडी या समीकरणाला पहिल्यांदा तडा गेला तो २००७ च्या महापालिका निवडणुकीत. काँग्रेसमधून फुटून वेगळ्या झालेल्या राष्ट्रवादीने अजित पवारांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीत वेगळी चूल मांडून काँग्रेसला २००२ मधील ६१ जागांवरून ३६ वर आणले. पुणेकरांनी रस्त्यावरील खड्ड्यांचा राग मतपेटीतून व्यक्त केल्याने ती निवडणूक फिरली होती. महापालिका निवडणुकीत दोनच दशकांपूर्वी नागरी समस्यांबद्दलचा रोष असा व्यक्त झाला होता, याची आठवण सद्या वर्तमानात स्वप्नरंजनच. सध्या राज्यात सत्तेत असलेले राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना यांनी त्या वेळीच पुण्यात एकत्र येऊन काही काळ सत्ता राबविली होती, ज्याला ‘पुणे पॅटर्न’ म्हटले गेले. कलमाडींना विरोध म्हणून उभा राहिलेला हा ‘पुणे पॅटर्न’ पुढे फार काळ टिकला नाही, तरी त्याने तोवर येऊ घातलेल्या २०१० च्या दशकाच्या राजकारणाला वेगळे वळण दिले होते.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील घोटाळ्यांच्या आरोपांनंतर कलमाडींच्या कारकीर्दीला आणि पर्यायाने पुण्यातील काँग्रेसलाही ग्रहण लागले, ते अद्याप संपलेले नाही. त्यांचे अनेक जुने सहकारी तर आता आपले सुभे राखण्यासाठी पक्षांतर करून तगून आहेत. नवे नेतृत्व पुढे येऊ न देता एककल्ली कारभार केल्याचा एखाद्या पक्षाला कसा फटका बसतो, याचे हे उदाहरण. सद्या:स्थितीत त्यातूनही बरेच शिकण्यासारखे.