scorecardresearch

व्यक्तिवेध : डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

सामाजिक भान जपून केलेले त्यांचे लेखन आणि त्यासाठी त्यांनी केलेला व्यासंग हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खास गुण.

व्यक्तिवेध : डॉ. नागनाथ कोत्तापल्ले
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची ओळख अधिक प्रमाणात समीक्षक म्हणून असली, तरी त्यांचे ललित लेखन त्यांच्या स्वभावप्रकृतीची खरी ओळख सांगणारे. त्या लेखनातही त्यांची दृष्टी आणि त्यांची विचारशैली याची स्पष्ट छाप दिसते. स्वभावाने अतिशय शांत, वैचारिक वाद त्याच सभ्यतेने करण्याचा अट्टहास, आक्रस्ताळेपणाचा, एकारलेपाणाचा शिक्का बसता कामा नये, अशी सर्वसमावेशकता ही कोत्तापल्ले यांची ओळख. मराठी भाषेतील साहित्याचा त्यांनी घेतलेला धांडोळा वेगळा अशासाठी, की त्यामागे त्यांची स्वत:ची अभ्यासपूर्ण बैठक होती. त्यामुळे त्यांच्या समीक्षेतही त्याचे प्रतििबब पडलेले दिसते.

लेखक आणि समीक्षक अशा दोन्ही पातळय़ांवरील त्यांचे व्यक्तिमत्त्व मुळीच वेगळे नव्हते. त्यामुळेच त्यांच्या स्वभावातील मृदुता, सभ्यता आणि कणखरपणा याचे दर्शन त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून सतत होत असे. मराठी साहित्याबद्दल, त्यातही वेगळय़ा धाटणीच्या आणि प्रकारच्या साहित्याबद्दल आपुलकी असणाऱ्या कोत्तापल्ले कोणत्याही साहित्यिक वादविवादात पडल्याचे दिसले नाहीत. साहित्याचा छंद जपण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेत कारकुनी करण्यात त्यांना वाईट वाटले नाही. त्या पदापासून थेट मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंत त्यांनी केलेला प्रवास त्यांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष देणारा आहे. बीडच्या महाविद्यालयातील अधिव्याख्याता ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदापर्यंतचा त्यांचा अध्यापकीय प्रवासही त्यांच्या कौशल्याची साक्ष ठरणारा आहे. नेमस्त साहित्यिक आणि समीक्षक म्हणून त्यांनी निर्माण केलेली ओळख अधिक महत्त्वाची. गेल्या पाच दशकांत साहित्याच्या विविध प्रांतांत त्यांनी आपले स्थान निर्माण केले.

कथा, दीर्घकथा, कविता, ललित, कादंबरी अशा साहित्यसर्जनाच्या सगळय़ा प्रांतात त्यांनी केलेली सर्जनशील मुशाफिरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पदर उलगडून दाखवणारी आहे.‘देवाचे डोळे’, ‘राजधानी’, ‘गांधारीचे डोळे’, ‘साहित्याचा अवकाश’, ‘मराठी कविता: एक अन्वयार्थ’, ‘मराठी साहित्य संमेलने आणि सांस्कृतिक संघर्ष’ यांसारखी त्यांची विविध ग्रंथसंपदा त्यांच्या लेखनाच्या सीमा किती रुंदावलेल्या आहेत, हे स्पष्ट करतात. या अशा लेखनामुळे पुरस्कार पाठोपाठ येणे, यात नावीन्य नाही. त्यांच्या ‘मूड्स’, ‘सुंदर दिवसासाठी’, ‘संदर्भ’, ‘गांधारीचे डोळे’ या पुस्तकांचा पारितोषकाने सन्मान झाला. त्याशिवाय न. चिं. केळकर साहित्य पुरस्कार, परिमल पुरस्कार, यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार असे अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले. सामाजिक भान जपून केलेले त्यांचे लेखन आणि त्यासाठी त्यांनी केलेला व्यासंग हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खास गुण. मराठी भाषेबद्दलचा त्यांचा जिव्हाळा लक्षात घेऊनच त्यांना राज्य शासनाच्या भाषा सल्लागर समितीचे अध्यक्षपदही मिळाले.

लेखनात केवळ मार्दव न राहता, कणखर भूमिका घेण्याची त्यांची क्षमता लक्षात राहणारी ठरेल. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवर नितांत श्रद्धा असलेल्या कोत्तापल्ले यांनी आयुष्यात साहित्य आणि अध्यापन हेच आपले कार्यक्षेत्र निवडले आणि त्यातच ते रमलेही. निष्ठेने आणि कर्तृत्वाने आपले श्रेष्ठत्व जपणे यासाठी आपल्या स्वभावात आणि व्यक्तिमत्त्वातही ऋजुता असावी लागते. नागनाथ कोत्तापल्ले यांच्यामध्ये हे गुण होतेच. त्यामुळे सतत माध्यमांमध्ये पुढे राहण्याची त्यांना कधीच आवश्यकता वाटली नाही, हे विशेष. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यात सर्वंकष पातळीवर काम केलेला एक महत्त्वाचा साहित्यिक आणि समीक्षक काळाच्या पडद्याआड गेला आहे.

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 05:06 IST

संबंधित बातम्या