आनंद हर्डीकर
आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने थोडेसे विषयांतर करायचे आहे. मायमराठीला राजवाड्यांनी दिलेल्या एका देणगीबद्दलची माहिती आज सांगायची आहे; कारण आपल्या जीवनात मिसळून गेलेल्या ‘त्या’ देणगीशी राजवाड्यांचा असणारा संबंध आपल्याला फारसा ठाऊकच नाही. परंतु आज तो अधोरेखित करण्याची चांगली संधी आहे.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारताच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत पाश्चिमात्य विद्येचा मोठा दबदबा प्रस्थापित झाला होता. अनेक नवनवीन संकल्पना समजू लागल्या होता, विचारांची घुसळण सुरू झाली होती. इंग्रजी विद्येच्या पाठोपाठ प्रबोधनाचा प्रकाश सर्वत्र पसरत होता. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतीय भाषांवरही इंग्रजीचा प्रभाव पडत होता. इंग्रजी शब्दांना स्वभाषांमधले प्रतिशब्द शोधून वेगवेगळे शब्दकोश तयार केले जात होते. असाच एक इंग्रजी शब्द होता – ‘कल्चर’ (Culture).  त्या शब्दाची पार्श्वभूमी पाहू जाता ती थेट रोमन वक्ता सिसेरो याच्यापर्यंत जाऊन पोहोचत होती.

‘मानवी प्रगतीची सर्वोच्च संभाव्य उत्तुंगता गाठता यावी म्हणून आत्म्याची मशागत करायला हवी’, असे शेतीक्षेत्रातले रूढ रूपक त्याने आपल्या लेखनात वापरले होते. त्या शब्दाच्या मुळाशी colere  हा लॅटिन शब्द होता आणि त्याचा आशय काळजी घेणे किंवा जबाबदारी स्वीकारणे असा होता.

‘हे लक्षात घेऊन बंगाली भाषकांनी तयार केलेला प्रतिशब्द होता – ‘कृष्टि’. शेतीच्या मशागतीची लक्षणा कायम राखण्याचा त्यांचा तो प्रयत्न होता. साहजिकच त्या शब्दाचा वापर बंगालमधील लोकजीवनात होऊ लागला. तथापि सुप्रसिद्ध बंगाली साहित्यिक रवींद्रनाथ ठाकूर यांना तो काही फारसा पसंत पडला नाही. ते तसे पाहिले, तर दोन्ही भाषांचे उत्तम जाणकार होते. त्यांनी स्वत: चांगला बंगाली प्रतिशब्द तयार करण्याचा प्रयत्न निश्चितच करून पाहिला असणार, पण मनासारखा शब्द गवसत नाही, हे जाणवल्यावर त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील संस्कृतचे प्राध्यापक व गाढे अभ्यासक डॉ. प. ल. वैद्य यांच्याकडे पत्र पाठवून विचारणा केली…’

‘वैद्य सरांनी त्यांना कळवले की, ‘मराठीमध्ये इतिहासकार आणि विचारवंत विश्वनाथ काशीनाथ  राजवाडे यांनी Culture  या इंग्रजी शब्दासाठी घडवलेला ‘संस्कृती’ हा शब्द लोकांना समाधानकारक वाटल्यामुळे चांगला रुळला आहे.’ विशेष महत्त्वाची बाब म्हणजे रवींद्रनाथांना तो शब्द आवडला, त्यांनी तो जसाच्या तसा स्वीकारला आणि वापरलादेखील. तो एक अखिल भारतीय पातळीवर सामायिक शब्द म्हणून रुळण्याचा मार्ग त्यांनी मोकळा केला.’

राजवाड्यांच्या या शब्दनिर्मितीच्या सामथ्र्याची ही वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक नोंद कुणी केली आहे, असा प्रश्न आपल्या मनात उद्भवणे स्वाभाविक आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मराठी भाषाशास्त्रज्ञ, ‘भाषा आणि जीवन’ या वैशिष्ट्यपूर्ण नियतकालिकाचे संस्थापक-संपादक डॉ. अशोक केेळकर यांनी ‘अंतर्नाद’ या मासिकाच्या (संपादक : भानू काळे) ऑक्टोबर २००३च्या अंकामध्ये ही हकीकत सांगितली होती. (‘निवडक अंतर्नाद’ या ग्रंथातही ती चौकट समाविष्ट आहे. पृ.क्र. १२१) केळकर सरांनी अधिकारवाणीने केलेेले त्यानंतरचे भाष्यही तसेच महत्त्वाचे.

‘‘कल्चर’ या शब्दाचे सरधोपट भाषांतर न करता राजवाड्यांच्या प्रतिभेने त्याच्या अर्थातील एक धागा उचलून त्यासाठी आपल्याकडील संस्कार ही परंपरेतील सर्वज्ञात संकल्पना योजली. संस्कारांनी सिद्ध होते ती संस्कृती. मग ते संस्कार बरे असतील किंवा वाईट असतील, जाणिवेतील असतील किंवा नेणिवेतील असतील, स्वकीय असतील किंवा परकीय असतील.

संस्कार म्हणजे व्यक्तीला जो परिसराचा, विशेषत: मानवी परिसराचा अनुभव येतो, त्या अनुभवाचे व्यक्तीवर उमटलेले ठसे. असे हे संस्काराचे ठसे कधी संचित रूपात टिकतात, कधी लोप पावतात, तर कधी कालांतराने स्थितिस्थापित होतात, असे भारतीय परंपरा मानते. संस्कृती म्हणजे अशा संस्कारांचे भांडार. राजवाड्यांच्या योजकतेमुळे कल्चर या शब्दापेक्षा अधिक अर्थघन असा ‘संस्कृती’ हा शब्द आपल्या हाती आला. ‘कल्चर’साठी ‘संस्कृती’ या शब्दाचा वापर हे सर्जनशील भाषांतराचे सुंदर उदाहरण आहे!’

‘संस्कृती’ हा शब्द जेव्हा जेव्हा उच्चारू, तेव्हा तेव्हा राजवाड्यांचे स्मरण आता अनिवार्य!

anand47.hardikar@gmail.com