मराठीत दलित कवयित्रींचा पहिला हुंकार ऐकू येतो तो संत साहित्यात. रूढी-परंपरांनी जखडलेल्या समाजव्यवस्थेतही स्त्री म्हणून मनातले भाव मोकळेपणाने मांडण्याचा, समाजरूढींबद्दलचा विद्रोह शब्दांत व्यक्त करण्याचा आणि सामाजिक परंपरेचे पाश तोडण्याचा प्रयत्न संत कवयित्रींनी आपल्या काव्यातून केला. पुढे आधुनिक दलित कवयित्रींनी आपल्या वेदना, समाजातील दमनवृत्ती, त्याविरोधात उभं ठाकण्याची हिंमत कवितांमधून मांडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जसं दलितांचं उत्थान केलं तसंच त्यांच्या कार्यातून महिलांना आणि पर्यायाने या कवयित्रींनाही बळ मिळालं.

किंबहुना आंबेडकरी विचार हीच अनेक कवींची मुख्य प्रेरणा ठरली. तिला जोड मिळाली ‘दलित पँथर’ आणि दलित साहित्यिक चळवळीची. या कवयित्रींमध्ये विद्रोहाचा हुंकार आहे. स्वत्वाची प्रखर जाणीव आहे. ती इतकी खोलवर आहे की, त्यात संपूर्ण समाजव्यवस्थेला हादरवून टाकण्याची ताकद आहे आणि ती त्यांच्या कवितांमधून अधिक तीव्रतेने जाणवत राहते.

मराठीतील अशा तीन पिढ्यांमधल्या प्रमुख दलित कवियित्रींच्या कविता ‘लीपिंग टुवर्डस् द डीप ब्लू स्काय’ या पुस्तकात इंग्रजीत अनुवादित केल्या आहेत. हा अनुवाद केला आहे शृजना एन. श्रीधर आणि श्रीजा राव यांनी. दलित स्त्री साहित्यातील महत्त्वाच्या लेखिका उर्मिला पवार यांची प्रस्तावना म्हणजे या कविता समजून घेणं सुकर करणारी अभ्यासपूर्ण मांडणी आहे. त्यांनी दलित कवयित्रींच्या साहित्याचा उल्लेख करताना दलित आणि स्त्री चळवळीचा थोडक्यात आढावा घेतला आहे.

पुस्तकात छाया कोरेगावकर, दिशा पिंकी शेख, हिरा बनसोडे, प्रज्ञा दया पवार, शीतल साठे, सुरेखा भगत, राज्यश्री गुडी, शारदा नवले, स्नेहा कदम, वर्षा भिसे, संध्या तांबे, उषाकिरण आत्राम या कवयित्रींच्या रचनांचा समावेश आहे. अर्थात या कविता प्रत्यक्ष मराठीत वाचण्याचा अनुभव जास्त दाहक आणि या ्त्रिरयांच्या मनीच्या विद्रोहाची सखोल जाणीव करून देणारा असला तरी या कवितांमधील भाव इंग्रजी अनुवादात उतरविण्याचा प्रयत्नही कौतुकास्पद आहे.

या कवितांची ‘सिस्टर्स’, ‘टिअर धिस हर्ट’, ‘द कारवाँ इज अवर लीड’, ‘आय क्रेव्ह ॲन इल्युजिव्ह ड्रीम’, ‘आय जस्ट वॉन्ट टू मीट मायसेल्फ’, ‘आय जस्ट वॉन्ट टू बी फ्री’ या प्रकरणांमध्ये विभागणी केली आहे. त्यांची शीर्षकं वाचली तरी त्या कवितांचा बाज काय आहे हे लक्षात येतं. एक स्त्री म्हणून समजातील आपलं स्थान, आपल्या घरातील स्वत:चं स्थान, स्वातंत्र्याची ओढ हीच या कवितांमधून दिसू येते. शब्दाशब्दांमध्ये बंडखोरी, स्वत:चं अस्तित्व जपण्याचा प्रयत्न, त्याची मनात असलेली प्रखर जाणीव वाचकाला स्वत:ची नेमकी ओळख शोधण्यास प्रवृत्त करते आणि ही जाणीव फक्त स्त्रियांपुरतीच मर्यादित राहत नाही.

या संग्रहातून दलित स्त्रियांचा संघर्ष, त्यांच्यातील भगिनीभाव, दलित स्त्रीवादी अभिव्यक्ती जाणवत राहते. प्रस्थापित पितृसत्तेला केवळ विरोध करून समाधान न मानता ती सत्ताच नाकारण्याची हिंमत या कवितांतून दिसून येते. जातीआधारित समाजव्यवस्थेविरोधात ठामपणे उभं राहणं, एक स्त्री म्हणून स्वत:चं स्वातंत्र्य जपताना ‘माणूस’ म्हणून जगण्याला प्राधान्य मिळावं यासाठी संघर्ष करणं, परंपरा, रूढींचं मानेवरचं जोखड धाडकन् फेकून देणं… अशा अनेक हिमतीच्या गोष्टी या कवितांमधून प्रखरपणे जाणवतात. 

स्त्रीवादी अस्मिता, आंबेडकरी विचारसरणी आणि सामाजिक वास्तवावर बोट ठेवणार्‍या छाया कोरगावकर, सामाजिक, राजकीय पातळीवर ठोस व थेट भूमिका घेणार्‍या प्रज्ञा दया पवार, तृतीयपंथीयांच्या वेदना ठळकपणे मांडणार्‍या दिशा पिंकी शेख, स्त्रीसुलभ भावना कधी हळव्या शब्दांत तर कधी प्रखरपणे मांडणार्‍या हिरा बनसोडे, विद्रोहाचे ज्वलंत उद्गार उमटवणार्‍या शीतल साठे, शोषित समाजाच्या वेदना समर्थपणे शब्दांत मांडणार्‍या सुरेखा भगत, कवितांमध्ये उपजत गेयता असलेल्या राज्यश्री गुडी, सामाजिक, कौटुंबिक नातेसंबंध सहज सोप्या शब्दांत, पण ताकदीने मांडणार्‍या शारदा नवले, अन्यायाविरूद्ध लढण्यास बळ देणारी कविता लिहिणार्‍या स्नेहा कदम, आंबेडकरी जाणिवा समर्थपणे मांडणार्‍या वर्षा भिसे, माणसांतील निर्मळ मनाला साद घालणार्‍या संध्या तांबे, सामाजिक वास्तव दाहकपणे मांडणार्‍या उषाकिरण अत्राम यांच्या कवितांचा समावेश या पुस्तकात आहे.

या कवितांमध्ये बंडखोरी हा समान धागा असला तरी प्रत्येकीच्या भाषेचा पोत वेगळा, विद्रोहाचा हुंकार वेगळा… पण प्रत्येकीची भावना आंबेडकरी विचारांशी बांधलेली आहे. हेटाळणीच वाट्याला आलेल्या आयुष्यात या बायका आंबेडकरी विचारांच्या जोरावर आभाळ पेलण्याचं बळ राखतात आणि सहज पेलतातही. त्यामागे एक आंतरिक प्रेरणा असावी. आंबेडकरी विचारांचं मोल या कवितांमधून जाणवत राहतं. त्या विचारांनी प्रेरित होऊन दमदारपणे लिहिणार्‍या या कवयित्रींचं लिखाण भाषांच्या मर्यादा ओलांडून सर्वत्र पोहोचणं गरजेचं आहे. हे पुस्तक महत्त्वाचं ठरतं ते त्यामुळेच!

लीपिंग टुवर्डस् द डीप ब्लू स्काय
संपादन- शृजना एन. श्रीधर
अनुवाद- श्रीजा राव, शृजना एन. श्रीधर
प्रकाशक- मावेली प्रकाशन
पाने-१३१, किंमत- २९९ रु.