‘‘ज्या लोकांच्या संस्कृतीतील साहित्य संपन्न असते, तीच संस्कृती उच्च संस्कृती म्हणून नांदत असते. आजच्या आधुनिकदृष्ट्या सुधारलेल्या व पुढारलेल्या पश्चिमी राष्ट्रांच्या संस्कृतीमध्ये ज्ञान-विज्ञानांनी संपन्न जे साहित्य निर्माण झाले आहे, ते त्या त्या पश्चिमी राष्ट्रांच्या भाषेत निर्माण झाले आहे. त्यामुळे तेथील संस्कृती उच्च म्हणून गणली जाते. भारत, चीन, अरब व अन्य पूर्वेकडील राष्ट्रांना आधुनिकदृष्ट्या उच्च संस्कृतीची राष्ट्रे म्हणता येत नाही. याचे कारण, या राष्ट्रांच्या भाषांमध्ये ज्ञान-विज्ञानांनी संपन्न असे साहित्य अजून आवश्यक तितक्या प्रमाणात निर्माण झालेले नाही.’’ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आपल्या एका लेखात (‘पूर्वा’- ऑगस्ट, १९७८) भाषा, साहित्य आणि आधुनिकता यासंदर्भात जो वरील निकष लावला आहे, या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘मराठी भाषेचे भवितव्य’ विषयावर जे विचार व्यक्त केले आहेत, ते विचार करण्याजोगे होत.
त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘‘ज्या ज्या समाजाची भाषा दुबळी असते, ते ते समाज दुबळेच असतात. भारतीय साक्षर लोकभाषा खालच्या पातळीवर राहिल्या, तर पश्चिमी संस्कृतीच्या अनुकरणाने निर्माण झालेल्या भारतीय आधुनिक सामाजिक व राजकीय संस्थाही मागासलेल्या सामाजिक पातळीवर जाऊन अंधकारामध्ये रूपांतरित होण्याचा धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. या मूलभूत सांस्कृतिक सिद्धांताच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची भाषा व साहित्य यांच्या भवितव्याबद्दल विचार करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र म्हणजे मराठी भाषिक समाज ज्या प्रदेशात बहुसंख्येने राहतो तो प्रदेश. महाराष्ट्र राज्य निर्माण होऊन इतकी वर्षे होऊन गेली तरी माध्यमिक, महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षणात मराठी भाषेची अक्षम्य उपेक्षा चालली आहे. ही उपेक्षा अशीच चालू राहिल्यास महाराष्ट्राला सांस्कृतिकदृष्ट्या भवितव्यच नाही, असे खेदाने म्हणावे लागते. भारतीय व महाराष्ट्रीय सामान्य माणूस एकोणिसाव्या शतकापर्यंत अविकसित राहिला, याचे कारण त्याचे भाषिक साहित्य मागासलेले राहिले.
उच्च शिक्षण म्हणजे इंग्रजी भाषेचे शिक्षण, असे समीकरण मांडून इंग्रजीला माध्यम म्हणून सर्व शिक्षणामध्ये महत्त्व देण्याचे धोरण आखून ते अंगीकारल्यास त्याचा तर्कसिद्ध परिणाम म्हणजे मराठी भाषेचा सामान्यजनांना पूर्ण विसर पडणे होय. मराठी भाषेला शिक्षणात महत्त्वाचे स्थान ज्या साहित्याद्वारे देण्याचा प्रयत्न अलीकडे होत आहे, त्यात शेकडो व हजारो सामान्य आणि पारिभाषिक शब्द संस्कृतमधून घेतल्यामुळे त्या शब्दांची सत्ताधाऱ्यांना आणि बहुजन समाजाच्या तथाकथित प्रशासकांना फार भीती वाटते, परंतु अनुभवावरून असे दिसून येते की, शिक्षणाच्या प्राथमिक व माध्यमिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या मुला-मुलींना हे संस्कृत शब्द इंग्रजीतील शब्दांपेक्षा फार लवकर आत्मसात करता येतात आणि ही मुले आधुनिक ज्ञान-विज्ञानाचे शब्द व वाक्यप्रयोग मोठ्या ऐटीने करीत असतात.
शब्द हे पाठ करावेच लागतात, मग ती मातृभाषा असो वा परकीय असो. जन्मत:च कोणतीच भाषा मनुष्यास येत नसते. हे साधे सत्यही या प्रतिनिधींच्या लक्षात येत नाही, हे मोठे दुर्दैव होय. या दुर्दैवामुळे महाराष्ट्राचे व इतर प्रदेश राज्यांचे सांस्कृतिक मरण टाळण्याच्या प्रयत्नांची दिशा सापडत नाही. वस्तुत: या भारतीय भाषांच्या पाठीमागे पाच हजार वर्षे टिकून राहिलेली महान भारतीय संस्कृती आहे. त्या संस्कृतीमुळे मराठी भाषेला अभिव्यक्तीचे महान सामर्थ्य प्राप्त झाले आहे. हे सामर्थ्य ओळखणाऱ्या मराठी भाषक विद्वानांना पश्चिमी ज्ञान-विज्ञानाचे मराठीकरण शक्य होते, हा आमचा अनुभव आहे. कितीही कठीण विज्ञान असले तरी ते मराठी भाषा अलगद रीतीने आपल्या पोटात समाविष्ट करू शकते. मराठी विश्वकोश कार्यालयामध्ये येणाऱ्या भौतिक व सामाजिक शास्त्रांच्या पंडितांनी पश्चिमी ज्ञान-विज्ञानाच्या सगळ्या महत्त्वाच्या कक्षा चोखाळून त्यांना मराठी साहित्याचे रूप देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे, परंतु शासन आणि विद्यापीठे ही अजून सुस्त व स्वस्थ झाली आहेत. त्यामुळे मराठी भाषेच्या उज्ज्वल भवितव्याबद्दल मन अत्यंत साशंक होते.’’
या सर्व लेखातून तर्कतीर्थांची मराठी भाषा व साहित्याविषयीची जी सांस्कृतिक तळमळ स्पष्ट होते, ती त्यांच्या भाषा व साहित्याप्रति असलेल्या अविचल निष्ठेचीच प्रचीती होय. या विचारांची अंमलबजावणी अनिवार्य आहे.
