फारशी भाषेच्या सान्निध्यामुळे शब्दसिद्धीचे काही प्रत्यय मराठीने कसे स्वीकारले, हे स्पष्ट करताना राजवाड्यांनी लिहिले, ‘ये (उच्चार ई) प्रत्यय लागून फारशीत भाववाचक किंवा धंदावाचक नाम होते; जसे दोस्त-दोस्ती. या धर्तीवर मराठीतील नामे अशी होत. वैद्यक-वैद्यकी, एक-एकी, बेक-बेकी; मधुकर-माधुक्री’. हा प्रकार आणखी विशद करण्यासाठी राजवाड्यांनी फारशी प्रत्यय शुद्ध मराठी शब्दांना लावल्याची आणखीही काही उदाहरणे दिली. त्यासाठी त्यांनी एक छोटा तक्ताच दिला. फारशी प्रत्यय, फारशी उदाहरण आणि मराठी उदाहरण अशा तीन स्तंभांच्या त्या तक्त्यामध्ये त्यांनी दिलेली उदाहरणे रंजक व आश्चर्यकारक ठरली.

‘गी : बंदा-बंदगी; पोट-पोटगी, देणे-देणगी… वान् : फील्-फलिवान्; गाडी-गाडीवान… र्दा : र्स-सर्दर; छडी-छडीदार… जी : बोस्तान्-बोस्तानजी; घड्याळ-घड्याळजी… दान् : कलम्-कलम्दान्; धूप-धूपदान, दीप-दीपदान… खाना : कार-कारखाना; गाडी-गाडीखाना, हत्ती-हत्तीखाना… वार : उमेद – उमेदवार; माणूस-माणूसवार इत्यादि.’ अनेक शब्द फारशी प्रत्यय लागून तयार झाले आहेत, हे समजल्यानंतर आश्चर्य वाटणे स्वाभाविकच होते.

राजवाड्यांनी जाताजाता फारशीत प्रचलित असलेल्या परंतु मराठीत टिकू न शकलेल्या षष्ठी प्रत्ययाबद्दलचीही माहिती दिली. त्यांनी म्हटले, ‘फारशीत कित्येक शब्दांचे अनेकवचन आन् हा प्रत्यय लावून करतात. त्याचे अनुकरण जुन्या मराठी ऐतिहासिक पत्रांत केलेले आढळते. उदा. शाहू छत्रपतींच्या रोजनिशीत मोकदमानी हा शब्द आलेला आहे. मूळ फारशी शब्द मोकदम, त्याचे अनेकवचन मोकदमान्. त्या रूपाला मौजा या शब्दाशी जोडण्याकरिता षष्ठीची फारशी ई जोडून मोकदमानी मौजा असा प्रयोग केला आहे. मोकदमान् ई मौजा याचा अर्थ गावाचे मोकदम असा होतो. हा षष्ठीचा ई प्रत्यय मराठीत रूढ झाला नाही, कारण ही ई ज्याची षष्ठी करावयाची, त्या नामाच्या पूर्वी लागते. इंग्रजीत जसे ऑफ हे शब्दयोगी अव्यय नामाच्या पाठीमागे लागते, तशीच ही फारशी ई नामाच्या पाठीमागे लागते. विभक्तीचा प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय नामाच्या मागे लावण्याचा मराठीचा स्वभाव नसल्यामुळे ही षष्ठीची ई मराठीमध्ये टिकली नाही.’

फारशी-मराठी सान्निध्याचा आढावा घेतल्यावर राजवाड्यांनी लक्षवेधी विधान केले. ‘जर आणखी तीनशे वर्षे म्हणजे इ.स. १९००पर्यंत मुसुलमानांचेच राज्य महाराष्ट्रात राहते, तर मराठी येथूनतेथून सर्व फारशी पेहरावच करती, यात संशय नाही.’ आणि आपल्या या विधानाची सत्यता सर्वांना पटावी म्हणून पुढे लगेच त्यांनी तीनशे वर्षांच्या अवधीत साक्सन या एका भाषेची परक्यांच्या राज्यात कशी दैना झाली, त्याची हकीकत सांगितली. ‘हे पाहावयास फार दूर जावयास नको. इंग्लंडात इसवीच्या दहाव्या शतकात साक्सन लोक राहत होते. त्यांच्या भाषेचे नाव आंग्लोसाक्सन. त्या लोकांना १०६६ साली नॉर्मन लोकांनी जिंकले. ते फ्रेंच भाषा बोलत असत. इंग्लंडमध्ये नॉर्मन राज्य झाल्यापासून सरकारदरबारी फ्रेंच भाषा सुरू झाली व आंग्लोसाक्सन मागे पडली. ह्या फ्रेंच भाषेचा अंमल तीनशेे वर्षे होता. तेवढ्या अवधीत साक्सन भाषा केवळ दडपली गेली एवढेच नव्हे, तर तिचे अंत:स्वरूपही छिन्नभिन्न झाले. विभक्तिप्रत्यय नाहीसे झाले, अंत्यस्वरांनी पोबारा केला, क्रियापदांची निरनिराळ्या काळांची रूपे नष्टे झाली. लिंगवचनांत, उच्चारांत वगैरे सर्व बाबींत जमीनअस्मानाचे फेरफार झाले. फ्रेंच व साक्सन भाषांच्या मिश्रणाने बनलेली इंग्लिश अस्तित्वात आली. पूर्वीच्या साक्सनमध्ये व सध्याच्या इंग्रजीत फार साम्य नाही. रा टोम्रेल याने सिद्ध केले की, शब्दकोशातील एकूण ४३,५६६ शब्दांपैकी २९,८५३ शब्द फ्रेंच वा लॅटिन आणि १३,२३० शब्द साक्सन इंग्रजीत आहेत. म्हणजे एक शब्द जर साक्सन असेल, तर अडीच फ्रेंच किंवा लॅटिन असतात. याप्रमाणे नॉर्मन लोकांच्या दडपणाखाली साक्सन भाषा अगदी चिरडून गेली.’

– आनंद हर्डीकर

anand47.hardikar@gmail.com