‘वैद्यकीचेही गलगोटियाकरण’ हे संपादकीय (२५ फेब्रुवारी) वाचले. पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी सरकारी महाविद्यालयांत सुमारे पाच ते दहा लाख रुपये फी भरावी लागते. खासगी महाविद्यालयांत सरकारी कोट्यातून प्रवेश मिळाला तर सुमारे ५० ते ८० लाख रुपये व मॅनेजमेंट कोट्यातून याच्या दुप्पट-चौपट खर्च येतो. अशा खासगी महाविद्यालयांशी संबंधित रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या कमी असल्याने या विद्यार्थ्यांना फारसा अनुभव मिळत नाही. ते काहीसे अर्धकच्चेच राहतात. तसेच असे डॉक्टर सार्वजनिक आरोग्यसेवेत किंवा ग्रामीण वा शहरी भागांतील गरीब-मध्यम वर्गासाठी काम करत नाहीत. ते अवास्तव दर आकारणार्या, अनेकदा अनावश्यक तपासण्या, प्रोसिजर, शस्त्रक्रिया करणार्या, मुख्यत: उच्च-मध्यम वर्गासाठी, श्रीमंतांसाठी असणार्या कॉर्पोरेट रुग्णालयांमध्ये काम करू लागतात. त्यामुळे खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचे समर्थन करणे बंद केले पाहिजे. रुग्णकेंद्री आरोग्यसेवेसाठी आवश्यक तेवढी वैद्यकीय महाविद्यालये काढणे सरकारचे कर्तव्य आहे. मोदी सरकारच्या २०१७ च्या धोरणानुसार आरोग्यसेवेवर सरकार २०२५ पर्यंत ‘जीडीपी’च्या २.५ टक्के रक्कम खर्च करणार होते. हे प्रमाण अजूनही १.३ टक्केच आहे!
वैद्यकीय महाविद्यालये त्यात पैसे गुंतवणार्यांसाठी किंवा तिथे शिक्षण घेऊन कोणत्याही मार्गाने पैसे कमावू बघणार्यांसाठी नकोत तर, सर्वसामान्य जनतेला सुयोग्य उपचार देणारे डॉक्टर्स घडवण्यासाठी हवीत. अशा हजारो डॉक्टर्सनी दाखवून दिले आहे की, वैद्यकीय नीतिमत्ता पाळून व्यवसाय करून चांगले राहणीमान, सन्मान, रुग्णांचे आशीर्वाद कमावणे शक्य असते. सेवाभावी खासगी संस्थांनी चालवलेली अशी काही मोजकी खासगी वैद्यकीय महाविद्यालये स्वातंत्र्यानंतर अस्तित्वात होती. उदा. वेल्लोरचे ख्रिश्चन मेडिकल कॉलेज. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांपेक्षा जास्त फी न घेणार्या अशा वैद्यकीय महाविद्यालयांनाच फक्त परवानगी द्यायला हवी. उरलेली जास्त फी घेणारी वैद्यकीय महाविद्यालये बंद झाली तर सामान्य जनतेचे काही बिघडणार नाही.
डॉ. अनंत फडके
सर्वच क्षेत्रांचे बाजारीकरण योग्य नव्हे!
‘वैद्यकीचेही गलगोटियाकरण’ हा अग्रलेख वाचला (२५ फेब्रुवारी). निवासी हॉटेलमधील खोल्या रिकाम्या राहतील असे दिसले तर त्या कमी किमतीत देऊन टाकायच्या व तोटा कमी करायचा असा प्रयत्न हॉटेलचा मालक करतो. तसाच काहीसा विचार वैद्यकीय शिक्षणसंस्थांमध्ये रिकाम्या राहणार्या जागांबाबत केला जावा हे धक्कादायक आहे. तसे केल्याने घसरणार्या गुणवत्तेचा फटका अशी व्यवस्था निर्माण करणार्यांना बसत नाही कारण ते स्वत:वर वैद्यकीय उपचार एकतर या देशात करतच नाहीत, आणि केलेच तर पंचतारांकित रुग्णालयात करतात.
घसरणार्या गुणवत्तेला आरक्षणाचे वळण देऊन टाकले की चर्चा भलतीकडेच वळवणे सोपे होते. शिक्षण क्षेत्रातील वाढते खासगीकरण आणि त्यातून आलेले महागडे वैद्यकीय शिक्षण यामध्ये गुणवत्तेचे स्वरूप हेच मुळात ‘कोट्यवधी रुपये खर्च करू शकणार्या वर्गामधील गुणवत्ता’ असे झाले आहे, या कळीच्या मुद्द्याचा मग सर्वांनाच विसर पडतो! यातील दुसरा मुद्दा म्हणजे एकीकडे नागरी भागात प्रचंड प्रमाणात वाढलेल्या वैद्यकीय सुविधा व डॉक्टरांची संख्या आणि दुसरीकडे ग्रामीण भागातील त्यांची कमतरता. प्रचंड खर्च करून शिक्षण घेतले असल्याने व व्यापारी दृष्टिकोनातूनच सारे बघितले गेल्यामुळे ‘मार्केट’ कुठे आहे आणि त्याचा ‘विस्तार’ कसा होईल हा विचार ओघाने आल्यास दोष कोणाला देणार? त्यातून निर्माण होणार्या कुप्रथांवर बरेच लिहिले गेले आहे. एकेकाळी डॉक्टरांना जाहिरात करण्यास मनाई होती. आता एखाद्या पर्यटन कंपनीप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रातही निरनिराळी ‘पॅकेजेस’ असतात व त्यांची सर्रास जाहिरातही केली जाते.
श्रद्धा (म्हणजे प्रार्थनास्थळे), शिक्षण, आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये पैसा, व्यापारी दृष्टिकोन, व नफेखोरी यांना स्थान असू नये (फक्त सेवाभाव असावा) अशी अपेक्षा असते. प्रत्यक्षात हीच तीन क्षेत्रे प्रचंड आर्थिक उलाढाल करताना दिसतात. वैद्यकीय शिक्षण म्हणजे तर आरोग्य आणि शिक्षण यांना एकत्र जोडणारे असल्यामुळे प्रश्न अधिकच गंभीर होतो. सारे काही बाजारावर सोडून का चालत नाही, संमिश्र अर्थव्यवस्थेची गरज का, कशी आणि कुठे असते अशा मुद्द्यांपाशी शेवटी येऊन थांबणारा हा विषय आहे असे वाटते.
प्रसाद दीक्षित, ठाणे</strong>
व्यवसायांना धंद्याचे स्वरूप
‘वैद्यकीचेही गलगोटियाकरण’ हा अग्रलेख वाचला. या स्थितीला जबाबदार कोण? खरे तर सरकार. आजचे सरकार कालच्या सरकारकडे बोट दाखवते आणि या टोलवाटोलवीत मूळ मुद्द्याला बगल दिली जाते. आजवर शिक्षण, वैद्यक या व्यवसायांत केवळ आर्थिक फायदा महत्त्वाचा मानला जात नव्हता, पण आता या दोन्ही व्यवसायांना धंद्याचे स्वरूप येऊ लागले आहे. फायदा हे एकमेव उद्दिष्ट घेऊन या दोन्ही क्षेत्रांकडे सरकार आणि इतर संबंधित पाहात आहेत त्यामुळे सामान्य माणूस हा या बाबतीतील धोरणे ठरवताना नगण्य ठरला आहे. त्याच्या हिताचा विचार कोणीही करत नाही.
गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर (मुंबई)
शाश्वत विकास महत्त्वाचा!
‘अणुऊर्जा नको, अक्षयऊर्जाच हवी!’ हा डॉ. संजय मंगला गोपाळ यांचा विचारप्रवर्तक लेख वाचला. ऊर्जा धोरणाविषयी नव्या दृष्टिकोनाची गरज जाणवते. अणुऊर्जा निर्मितीची कार्यक्षमता सुमारे ३० ते ३७ टक्के इतकी आहे. म्हणजे निर्माण झालेल्या ऊर्जेपैकी जवळपास ६३ ते ७० टक्के ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते. ही अतिरिक्त उष्णता पर्यावरणात सोडली गेल्यामुळे उष्णता प्रदूषण (थर्मल पोल्युशन) होऊ शकते, ज्याचा परिणाम जलस्रोत व परिसंस्थेवर होतो.
याशिवाय अणुऊर्जा निर्मितीसाठी लागणारे इंधन (युरेनियम) हे मर्यादित स्वरूपाचे असून ते भविष्यात संपुष्टात येऊ शकते. तसेच किरणोत्सारी कचर्याच्या सुरक्षित व्यवस्थापनाचा प्रश्नही गंभीर आहे. त्यातुलनेत सौर, पवन व जलऊर्जेसारख्या अक्षय ऊर्जास्रोतांचे नैसर्गिकरीत्या पुनर्भरण होते. ते दीर्घकालीन व पर्यावरणपूरक पर्याय आहेत. त्यातून कार्बन उत्सर्जन अत्यल्प होते आणि भविष्यातील पिढ्यांसाठी शाश्वत ऊर्जा सुरक्षा मिळू शकते. म्हणूनच देशाच्या ऊर्जा धोरणात शाश्वत विकासाचा विचार करून अक्षयऊर्जा निर्मितीवर अधिक भर देणे ही काळाची गरज आहे.
अमोल हारदे, मोहेगाव (नाशिक )
अन्यायाची भावना संपवणे मोठे आव्हान
‘नक्षलनाशानंतर…?’ हा अग्रलेख वाचला. नक्षलनाश हा शेवट नसून नवी सुरुवात आहे. या चळवळीचा बीमोड हा सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक टप्पा असू शकतो; परंतु केवळ लष्करी/पोलीस कारवाईने प्रश्न संपत नाहीत. अनेक दशकांपासून राज्ययंत्रणा व आदिवासी समाजात निर्माण झालेली दरी भरून काढणे ही पुढची मोठी जबाबदारी आहे.
गेल्या काही दशकांत फोफावलेल्या नक्षल चळवळीचा बीमोड हा राजकीय, आर्थिक व सुरक्षेच्या कारणास्तव गरजेचा होता. आपल्या मागण्यांसाठी नक्षलींनी सुरू केलेला हिंसाचार व त्यात गेलेल्या बळींनी कायदा व सुरक्षेची समस्या निर्माण केली होती. नक्षल चळवळीमुळे एका विशाल भूभागात विकासाच्या संभाव्य वाटा अवरुद्ध झाल्या होत्या. नक्षलींच्या प्रभावक्षेत्रात असलेली जंगल व खनिज संपत्ती ही संघर्षाची आर्थिक बाजू आहे. नक्षलनाशानंतर ही नवी आर्थिक संधी निर्माण झाली असली तरी तिचा उपसा करताना पर्यावरणीय समतोल, जैवविविधतेचे संरक्षण, जलस्रोतांचे जतन आणि हवामान बदलाच्या परिणामांचा विचार प्रामुख्याने व्हायला हवा. नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करताना शाश्वत विकास व स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ द्यायला हवे. वनाधारित उद्योग, लघुउद्योग, वनउत्पादन प्रक्रिया केंद्रे यांना प्राधान्य देऊन विकासाची जबाबदारी केवळ एखाद-दुसर्या उद्योगपतीच्या हाती न सोपवता, विश्वास, संवाद आणि सहभाग या त्रिसूत्रीचा वापर करून स्थानिक आदिवासींना त्यात सामील करायला हवे. एकूणच, नक्षलवादाने ज्या अन्यायाच्या भावनेवर पाय रोवले, ती संपवणे मोठे आव्हान आहे. न्याय, समान संधी आणि सन्मान यांची हमी मिळाली तरच भविष्यात अशा चळवळींना खतपाणी मिळणार नाही. हेमंत पाटील, नालासोपारा

