मराठीत प्रचलित ज्ञानकोश, महाकोश, विश्वकोश हे मूलत: इंग्रजीतील ‘एन्सायक्लोपीडिया’ शब्दाचे पर्यायवाची संज्ञापन होय. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या प्रमुख संपादकत्वाखाली सुरू झालेला ‘मराठी विश्वकोश’ आजमितीस २० संहिता खंड, १ परिभाषासंग्रह, १ सूचिखंड, १ परिचयग्रंथ, कुमारकोश ४ खंड अशा रूपात निरंतर विकासशील वाटचाल करीत आहे. यातील मूळ २० संहिता खंड आता महाजालावर (इंटरनेट) उपलब्ध आहेत. शिवाय ते तबकडी (कॉम्पॅक्ट डिस्क), संचयक (पेनड्राइव्ह) रूपातही उपलब्ध आहेत.
‘एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका’ (१७६८-२०१०)चा प्रारंभ झाला तोच मुळी ‘अपरंपार ज्ञानवृद्धीने मानवी जीवन समृद्ध करण्याच्या उद्देशाने.’ (लेट नॉलेज ग्रो मोअर अँड मोअर, अँड दस बी ह्युमन लाइफ एन्रिच्ड). पुढे हेच जगातील सर्व विश्वकोशांचे ब्रीद होऊन गेले. मराठीत विश्वकोश तयार झाले पाहिजेत, असा विचार गोविंद नारायण माडगावकर यांनी मांडला होता. त्यानुसार पहिला प्रयत्न ‘अनेक विद्या-मूलतत्त्व संग्रह’ (१८६१)च्या रूपाने कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी केला; पण ‘सर्वविषयक संग्राहक कोश’ हे जे ‘वैश्विक ज्ञानकोश’चे आदर्श रूप आहे, त्या स्वरूपाचा पहिला प्रयत्न डॉ. श्री. व्यं. केतकर यांच्या संपादकत्वाने ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश’ (१९२०-२९) रूपात २३ खंडांत प्रसिद्ध झाला होता. त्याच्या व्यक्तिविशिष्ट मर्यादेमुळे तो परिपूर्ण मानला जाऊ शकला नाही. त्याची पूर्तता महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या आधिपत्याखाली तर्कतीर्थांनी केली.
मराठी विश्वकोश निर्मितीचा काळ १९६२ ते २०१९ असा राहिला आहे. यातील २० संहिता खंडांपैकी १५ खंडांचे संपादन तर्कतीर्थांनी केले. या प्रकल्पाचा संकल्प तर्कतीर्थांनी सोडला नि त्याचा अधिकांश भागही यांच्याच प्रयत्नाने पूर्णत्वास गेला.
मराठी विश्वकोशाच्या संकल्प ते सिद्धीचा विधिवत वृत्तांत अद्यापपर्यंत लिहिला गेला नव्हता. त्याची परिपूर्ती ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय’ प्रकल्पातील पहिल्या खंडाच्या (मराठी विश्वकोश नोंदसंग्रह) प्रस्तावनेत काहीएक प्रमाणात करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तर्कतीर्थांनी हा प्रकल्प शास्त्रोक्त व्हावा म्हणून प्रथम एक ‘परिचय ग्रंथह्ण (१९६५) लिहून तो विविध वृत्तपत्रे, नियतकालिके, तज्ज्ञ यांच्याकडे अभिप्रायार्थ धाडून जनप्रतिसाद व जनप्रतिक्रिया अजमावली. जी प्रतिक्रिया, टीका, प्रतिसाद पत्रे आली, त्यांना जाहीर व व्यक्तिश: उत्तरे, प्रतिक्रिया देऊन, प्रकाशित करून ‘मराठी विश्वकोश’ निर्मिती केली. हा प्रकल्प म्हणजे लोकसहभाग नि लोकनिधीतून केलेला ज्ञाननिर्मितीच्या लोकशाहीकरणाचा आदर्श वस्तुपाठ होय. हे कार्य तर्कतीर्थांच्या जीवनातील ज्ञानसाधना व ज्ञाननिर्मितीचे ध्यासपर्व होते. या प्रकल्पपूर्तीने मराठी भाषेत ज्ञानविज्ञानाची परिभाषा वापरून ज्ञान-विज्ञानातील विविध विषय अर्थघनता व विशदार्थतेने परिपूर्ण रूपात संदर्भस्राोत म्हणून उपलब्ध झाले आहेत. तेच तर्कतीर्थांचे मराठी भाषा ज्ञानभाषा करण्यातील योगदान होय. यातील ‘परिभाषासंग्रह’ निर्मिती ही तर्कतीर्थांची मराठीस ज्ञानभाषा सिद्ध करण्यातील खरी कामगिरी होय.
तर्कतीर्थांनी हा प्रकल्प पूर्ण करतानाच्या काळात अत्यल्प मानधन घेतले. त्यांच्या पत्नी सत्यवतीबाई यांनी एका मुलाखतीत ‘पस्तीस रुपये पगारात (मानधन) संसारात जे कौशल्य होते (चालविण्याचे) ते पस्तीसशे मिळाल्यावरही कायम होते,’ हे नमूद करून ठेवले आहे. नोंद लेखनार्थ येणाऱ्या अभ्यागतांना दैनिक भत्ता म्हणून ३५ रुपये मानधन दिले जाई. त्याच हिशेबाने तर्कतीर्थांना मासिक मानधन मिळत होते. सत्यवतीबाईंनी सात रुपये किमतीची तीन लुगडी वर्षाला वापरत आयुष्य काढले. तर्कतीर्थ विविध समारंभ, भाषणे, चर्चासत्रे, परिसंवाद इत्यादींमध्ये नित्य सहभागी होत. त्यातून जे तुटपुंजे मानधन लाभे, त्यात समाधानाने त्यांनी संसार करीत आयुष्य काढले. त्यांना प्रतिष्ठा मोठी होती; पण त्यांचे जगणे काटकसरीचे राहिले.
मराठी विश्वकोश छपाईची जी नियमावली आहे. त्यावरून या कोशाच्या शास्त्रोक्त निर्मितीचे रहस्य अवगत होते. मराठी विश्वकोश निर्मितीसाठी कागद कारखाना, मुद्रणालय चालविणे यांतूनही या ध्यासपर्वाची प्रचीती येते. बहुतांश महत्त्वपूर्ण नोंदींचे संपादन तर्कतीर्थ करीत. ‘मराठी विश्वकोश’ पूर्ण होऊन त्याचा पुनर्लेखन रूपात विकास होत आहे. तथापि सुबोधता, पारिभाषिकता, देशीयता ही नव्या नोंदींपुढची आव्हाने होत. या कोशाचे किमान हिंदी, इंग्रजीत भाषांतर झाल्याशिवाय हा मराठी समृद्ध ज्ञानकोश खऱ्या अर्थाने विश्वकोश सिद्ध होणार नाही.
