‘डोह’, ‘सोन्याचा पिंपळ’, ‘पाण्याचे पंख’ आणि ‘कोरडी भिक्षा’ यांसारख्या साहित्यकृतींतून ललित लेखनाची ‘मौज’ अनुभवताना वाचकांना समृद्ध करण्याचे काम श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी केले. अर्धशतकाहून अधिककाळ साहित्यसेवा करणार्या व्रतस्थ लेखकाला विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केल्याने साहित्याचाच गौरव झाला आहे. श्रीनिवास कुलकर्णी यांचे लेखन महाराष्ट्रापुरतेच मर्यादित न राहता धारवाड आणि कोलकतापर्यंत पोहोचले असून त्यांच्या साहित्याचा इंग्रजी अनुवाद झाला आहे.
सांगली जिल्ह्यतील औदुंबर या गावी जन्म झालेल्या श्रीनिवास यांचे प्राथमिक शिक्षण औदुंबरमध्येच झाले, तर सातवीपर्यंतचे शिक्षण अंकलखोप येथे झाले. त्यापुढील शिक्षण सांगलीच्या ‘अनाथ विद्यार्थी आश्रम’ या संस्थेत राहून पूर्ण केले. त्यांचे आजोबा व वडील दोघेही चित्रकार होते. या दोघांच्या सान्निध्यात होणारे कलेचे संस्कार आणि औदुंबरच्या परिसराच्या वातावरणाचा परिणाम यांमधून श्रीनिवास कुलकर्णी यांचे संस्कारशील, संवेदनक्षम मन तयार झाले. शिक्षण संपल्यावर प्रथम दोन वर्षे साइन बोर्ड पेंटिंगचा व्यवसाय व नंतर ओगलेवाडी येथील काचकारखान्यात हिशेब खात्यात नोकरी. त्यानंतर ‘मौज’ या नियतकालिकाच्या संपादन विभागात त्यांनी काम केले. कवितेवर आत्यंतिक प्रेम असलेल्या श्रीनिवास कुलकर्णी यांची पहिली कविता मराठी चौथीत असताना पां. ना. मिसाळ यांच्या ‘बालसन्मित्र’ मध्ये प्रसिद्ध झाली होती. पहिली गोष्ट का. रा. पालवणकरांच्या ‘खेळगडी’च्या शेवटच्या बाललेखांकात प्रसिद्ध झाली. ‘बालकवींच्या प्रतिभेने कविता न लिहिता गद्य लिहिले असते तर ते लेखन श्रीनिवास कुलकर्णी यांचेच झाले असते’, अशा शब्दांत मंगेश पाडगावकर यांनी कुलकर्णी यांच्या लेखनाचे मोल उलगडले. ‘मनातल्या उन्हात’ हा त्यांचा ललित लेख १९६० मध्ये ‘सत्यकथे’त प्रसिद्ध झाला. त्यांचे सर्व लेख प्रथम ‘सत्यकथा’ आणि ‘मौज’ या नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले. ‘पाण्याचे पंख’ या संग्रहात त्यांनी घरात आणि सभोवती असणार्या, वावरणार्या लहान मुलांचे भावविश्व साकारले आहे. अलोक, पदम, मनू, मिकी या लहान मुलांचे हसणे, खेळणे, बागडणे हे लेखकाच्या नजरेतून टिपताना आपल्या सभोवतालच्या लहान मुलांच्या जगाशी त्यांचे नाते जुळलेले दिसते. ‘कोरडी भिक्षा’ या संग्रहातील व्यक्तिचित्रांच्या चित्रणातून पुन्हा वेगळे अनुभव वाचकांसमोर उलगडतात.
त्यांच्या सर्व लेखनाला चित्रदर्शी शब्दकलेची जोड लाभली आहे. चित्रकलेच्या संस्कारातून येणारी दृश्यमयता, निसर्गाच्या सूक्ष्म निरीक्षणामधून वर्णनात येणारा बारकावा आणि अनुभवाचा तळ गाठणारी पारदर्शी लेखनशैली यांमुळे कुलकर्णी यांच्या लेखांमधील आशय एक वेगळीच उंची गाठतो. ललित लेखनाला एक वेगळेच परिमाण देऊन हे लेखन समृद्ध करणारा लेखक म्हणून श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे नाव निश्चितच अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
अशा सारस्वताला महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने यापूर्वी साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता राज्य सरकारच्या ‘विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारा’ने कुलकर्णी यांच्या शिपरेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
