ही अगदी अलीकडची गोष्ट. एका अर्थविषयक नियतकालिकानं वयाच्या चाळिशीच्या आतल्या तरुण उद्योजकांसाठी एक स्पर्धेसारखं काही ठेवलं होतं. सगळे नवउद्यमी. निवड समितीनं त्यांची रितसर चाचणी घेतली. नवउद्यमी असल्यानं अर्थातच उलाढाल किती कोटींची याला फार महत्त्व नव्हतं. म्हणजे शंभर-दोनशे कोटींचे आकडे उडवले जात नव्हते. महत्त्व होतं ते त्यांच्या त्यांच्या कल्पनेला. त्यांनी किती काय काय नवीन सुरू केलंय, या उद्योगाची कल्पना किती वाढू शकते, ती प्रत्यक्ष बाजारपेठेत अंमलात येईल का वगैरे वगैरे. त्याच्या आधारे निवड झाली त्यांची. चाळीसजण होते. फोटोसकट त्यांचा छान परिचय करून दिला गेला. त्यांच्याविषयी परीक्षा समितीतलं कोण कोण काय काय बोललं त्यातलं एखाद-दुसरं वाक्य, त्याच्या उद्योग कल्पनेची छोटीशी ओळख वगैरे असं सगळं. भरगच्च ऐवज. यात एकही मराठी नाव नव्हतं. सिन्हा होते. श्रीवास्तव होते. सुब्रमण्यम होते. भाटिया होते. गोन्साल्वीस होते. खानही होता एक. अगरवाल वगैरे तर होतेच होते. नव्हता एकही मराठी.
जगातल्या बड्या बड्या कंपन्यांचं नेतृत्व कोण कोण करतायत, करत होते म्हणून सहज नजर टाकली यादीवर. सुंदर पिचाई (अल्फाबेट), सत्या नाडेला (मायक्रोसॉफ्ट), वसंत नरसिंहन (नोव्हार्टिस), शंतनू नारायण (अडोब), अरविंद कृष्णा (आयबीएम), लिना नायर (शनेल), नील मोहन (यूट्यूब), निकेश अरोरा (पालो अल्टो), लक्ष्मण नरसिंहन (स्टारबक्स), विमल कपूर (हनीवेल)वगैरे. अशी अनेक नावं मिळाली. नाही म्हणायला एक मराठी दिसलं त्यात. ‘प्रॉक्टर अँड गँबल’चे शैलेश जेजुरीकर. पूर्वी विक्रम पंडित (सिटी बँक) होते. आता तेही नाहीत. बोईंगच्या आशिया विभागात दिनेश केसकर होते. ते निवृत्त झाले असावेत.
सरकारी मालकीच्या बँकांतल्या प्रमुख पदांवर नजर टाकली. पूर्वी यात स्टेट बँकेचे मनोहर भिडे होते. बँक ऑफ इंडियाचे रवींद्र मराठे होते. मराठी नाट्य संगीतावर वसंतरावांसारख्या (देशपांडे) अभ्यासकाकडून उत्कृष्ट कार्यक्रम करून घेणारे वसंतराव पटवर्धन होते. आता एकाही बँकेच्या प्रमुखपदी मराठी दिसत नाही. अगदी ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्यासुद्धा. गंमत अशी की स्टेट बँकेसह पाच महत्त्वाच्या सरकारी बँकांची कार्यालयं मुंबईत आहेत. पण एकाही बँकेत महत्त्वाच्या उच्च पदावर मराठी माणूस दिसत नाही. नुकताच ‘एचडीएफसी’ बँकेत खांदेपालट झाला. तो होताना संभाव्य नावातही मराठी चेहरा नव्हता.
केंद्र सरकारच्या सेवेत महाराष्ट्र केडरचे खूप अधिकारी आहेत. त्यात मराठी नाव असलंच तर औषधापुरतं. संसदेच्या मुख्य सभागृहाला मावळणकर यांचं नाव आहे. ते गणेश वासुदेव मावळणकर. स्वतंत्र भारतातले पहिले लोकसभाध्यक्ष. बिहारच्या मुख्यमंत्र्याचं शासकीय निवासस्थान ज्या रस्त्यावर आहे त्याचं नाव लोकनायक त्र्यंबक बापूजी अणे. दुर्देव असं की या रस्त्याच्या नावाचा सर्रास उच्चार ‘ॲन मार्ग’ असा केला जातो. कोणालाही काहीही वाटत नाही.
शाळेत असताना माझ्या त्यावेळच्या एका मित्राला ‘हॉटेल मॅनेजमेंट’ करायचं होतं. त्यासाठी वाटेल ते करायची त्याची तयारी होती. त्यावेळी हे शिकवणारी कॉलेजेसही नव्हती फार. परळचं एकच एक सरकारी कॉलेज हा अभ्यासक्रम शिकवायचं. प्रवेश मिळणं फारच जिकिरीचं. पण या मित्राची तयारी होती आधीपासूनच. अडचण होती एकच.
आई-वडील. त्याची आई गृहिणी. वडिलांच्या शब्दाबाहेर नाही. आणि वडिलांचा शब्द अंतिम. ते एका आंतरराष्ट्रीय रसायन कंपनीत बर्यापैकी हुद्यावर होते. आपला मुलगा ‘हे असं’ काही शिकतोय हे त्यांना बिल्कुल पटत नव्हतं. उठता-बसता, मित्रांच्या, नातेवाईकांच्या देखत इतकंच म्हणायचे: आमचे चिरंजीव आयुष्यात वाढपी होऊ इच्छितात. हेच त्यांचं ध्येय !
इतकं खच्चीकरण व्हायचं मित्राचं की विचारायची सोय नाही. भिकेचे डोहाळे काय, लग्नाच्या पंगतीतला वाढपी काय… सारखा पाणउतारा. हा मित्र नाही गेला त्याला जे आवडत होतं ते शिकायला. तो शिकला असता हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग वगैरे तर किती पुढे गेला असता ते माहीत नाही. पण आज ‘मिशेलीन स्टार’ हे रेस्तराँसाठीचं सर्वोच्च मानांकन संबंधित रेस्तराँना मिळवून देणार्यांत एकही मराठी शेफ नाही. त्यात भाटिया आहे. खन्ना आहे. कोचर आहे. अरोरा आहे. तीन-तीनदा हा गौरव संबंधित रेस्तराँला मिळवून देणार्यात सैनी आहे. पण मराठी मात्र नाही. (जाता जाता: एकट्या सिंगापुरात अशी ४५ मिशेलीन स्टार रेस्तराँ आहेत आणि फक्त दुबई शहरात २०)
अर्थात ‘हे मिशेलीन स्टार’वाले कोण लागून गेले, असं विचारण्याची सोय आपल्याला आहेच. मिशेलीनला खुंटीवर टांगण्यासाठी आमचं आमच्यापुरतं नवं मानांकन आम्ही सुरू करू असंही म्हणता येईल. तसं होईलही. पण तोपर्यंत तरी मिशेलीन हे एकच मानक आहे. हे म्हणजे स्वत:चा नकाशा सुरू करेपर्यंत ‘गुगल मॅप’ वापरण्याला पर्याय नाही, असं. ते असो.
मुद्दा मिशेलीन स्टार वगैरेंचा नाही.
तर मराठी मुलं, तरुण करतात काय हा आहे.
एकेकाळी विज्ञान ते अर्थकारण अशा अनेक क्षेत्रात तळपणारी अनेक मराठी नावं दिसत. आता कुठे गेलेत हे सगळे? या महाराष्ट्राचं नक्की असं काय चुकतंय की या मातीत पैदा होणार्या रत्नांची खाण आता अशी अचानक आटली? फारा वर्षांपूर्वीची गोष्ट नाही ही. अगदी अलीकडेपर्यंत सनदी अधिकार्यांत महाराष्ट्रात नेमणूक मिळावी यासाठी स्पर्धा असायची. आता राज्यात आहेत त्यातल्या कित्येकांना अन्यत्र नेमणूक मिळावी असं वाटतंय. तसे प्रयत्न त्यांचे सुरूही असतात. चांगल्या अधिकार्यांना राज्यात कसं राखता येईल ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची चिंता असते. एकेकाळी भारताच्या क्रिकेट संघात एकवेळ स्थान मिळेल. पण महाराष्ट्राची राजधानी मुंबईच्या संघात संधी मिळणं कर्मकठीण, अशी परिस्थिती होती. आता मुंबईच्या संघातही मराठी खेळाडू किती असतात हा प्रश्न.
मूळ मुद्दा मराठी तरुण काय करतायत, त्यांचं काय सुरू आहे हा. मराठी माणसाच्या भवितव्याची आण घेत राजकीय पक्ष जन्माला आले. संयुक्त महाराष्ट्र हवा अशी मागणी इथले साहित्यिक आजही करतात. त्यांना बेळगाव-धारवाडही महाराष्ट्रात हवं आहे. हरकत नाही. पण इथे आहेत त्या मराठी तरुणांसाठी आपलं काय धोरण आहे, यावर कोणीच काहीच बोलताना दिसत नाही.
राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांना लक्षावधी तरुण बसतात. त्यातले तब्बल ९६ टक्के कधी ‘प्रीलिम’देखील उत्तीर्ण करू शकत नाहीत. तरीही वयाच्या चाळिशीपर्यंत त्यांचा एकमेव कार्यक्रम असतो तो म्हणजे या परीक्षांना बसणे. त्यात पेपर फुटतात, उत्तरं चुकतात वगैरे आहेच. तितकेच मराठी. पण पुढे ‘आयएएस’च्या उत्तीर्णांत नाहीत. बँकांमधल्या उच्चपदस्थांत नाहीत. खासगी क्षेत्रातल्या वरिष्ठांत नाहीत. विज्ञान संशोधनात नाहीत. अर्थकारणात नाहीत… मग मराठी तरुणआहेत कुठे?
इथल्या समाजधुरिणांना हा प्रश्न महत्वाचा कधी वाटणार? राजकारण खूप झालं… उद्याच्या महाराष्ट्रासाठी काही भरीव, सकारात्मक करण्याची गरज कधी जाणवणार आपल्याला…? हे प्रश्न पडायला लागले की ‘सिलसिला’तलं गाणं आठवतं… ये कहाँ आ गये हम…
