इराण सोडून युरोपात आश्रय घेऊन, फ्रेंच नागरिकत्व मिळवल्यानंतर मार्जाने सत्रपि हिने स्वत:ची गोष्ट ‘पर्सिपोलिस’ या चित्रकादंबरीतून (ग्राफिक नॉव्हेलमधून) सांगितली. इराणी राजवटीच्या समर्थकांनी या चित्रकादंबरीला ‘इराणविरोधी, इस्लामविरोधी प्रचार’ ठरवले. पण कादंबरी गाजलीच, तिचा दुसरा भागही प्रकाशित झाला, त्यावर मार्जाने हिनेच सहदिग्दर्शन केलेला ‘पर्सिपोलिस’ याच नावाचा सचेतपट (ॲनिमेशन फिल्म)तयार होऊन त्याला ‘कान महोत्सवा’त परीक्षकांचे विशेष पारितोषिक, तर ‘ऑस्कर’च्या तीन नामांकनांपैकी ‘उत्कृष्ट आधारित पटकथालेखना’चा पुरस्कार मिळाला… आपण एवढ्यावरच थांबणार नसल्याचे पुरेपूर संकेत मार्जाने सत्रपि हिने दिले… ‘नवर्याच्या अकाली निधनानंतर वर्षभर पचवलेल्या दु:खातिरेकाने’ वयाच्या अवघ्या ५६ व्या वर्षी तिने प्राण सोडला.
इराणमधल्या ‘हिजाबसक्ती’ इतकाच विरोध फ्रान्समधल्या ‘हिजाबबंदी’ला करताना ‘आम्ही काय परिधान करावं, हे ठरवण्याचं स्वातंत्र्य आम्हा महिला/ मुलींना हवं’ अशा शब्दांत ठणकावणारी; शास्त्रज्ञ नवर्यापेक्षा कर्तृत्ववान असूनही बाई म्हणून अनेकदा डावलली गेलेल्या मारी क्युरीवरचा चित्रपट (रेडिओॲक्टिव्ह – २०१९) दिग्दर्शित करणारी; इराणमधल्या महासा अमीनीच्या मृत्यूनंतर पॅरिसमध्ये निषेधमोर्चा काढण्यासाठी पुढाकार घेणारी; ‘ज्या देशांमध्ये जुलूम होतो आहे म्हणून तिथून इथे येणार्या गरिबांना तुम्ही (युरोपीय देश) अडवताहात, त्यांच्यावर जुलूम करणारे त्या त्या देशांमधले सरकारधार्जिणे धनाढ्य मात्र इथे खुशाल येतात, मजा मारतात’ हे धारदारपणे सुनावणारी आणि ‘माझा इराणीपणा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही’ असे खमकेपणाने बजावणारी… अशी मार्जाने सत्रपि केवळ ‘दु:खातिरेकाने’ आपल्यातून गेली- होत्याची नव्हती झाली- यावर विश्वास ठेवणे अनेकजण/जणींसाठी कठीण आहे. स्त्रीवादी, कार्यकर्ती, कलावंत अशी ओळख गेल्या सुमारे २५ वर्षांत मिळवल्यानंतर अखेर ‘एक विरहव्याकूळ प्रेमिका’ म्हणूनच ती गेली, असाच विचार केला तर व्यक्तिगत भावना व सामाजिक भूमिकांतला विरोधाभास दिसतो. तो असतो, पण हा विरोधाभास दिसेल असे जगण्याची- वा मरण्याचीही- मुभा समाजात नसते. म्हणून मार्जाने सत्रपिच्या निधनाचे कारण विचित्र वाटू लागते.
वास्तविक ‘पर्सिपोलिस’पासून ते अगदी २०२४ सालच्या ‘डिअर पॅरिस’ या चित्रपटापर्यंत, भावनिकतेला कुठेही नकार न देता मार्जाने सत्रपि यांचा कलाप्रवास झाला. या प्रत्येक कलाकृतीत राजकीय आशय आहेच- पण ‘मी काही काळ कृतिशील राजकारणाच्या वळचणीलाही गेले खरी; कारण तेव्हा मला वाटायचे की राजकारणातूनच बदल घडवता येईल- पण झाले उलटेच- राजकारणच मला बदलू लागेल की काय अशी शंका येऊ लागली आणि मी ते राजकारण सोडले… आता माझे राजकारण काहीही जिंकण्यासाठी नाही… ते फक्त लोकांमध्ये स्वप्ने पेरण्यासाठी आहे. असे मार्जाने यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दहा वर्षांपूर्वी (२०१६) मुलाखतीत सांगितले होते. चार चित्रकादंबर्या, सहा चित्रपटांचे दिग्दर्शन आणि त्यापैकी चार चित्रपटांचे लेखन… या त्यांच्या एकंदर कामगिरीपैकी स्वप्नांशी- आणि आप्तवियोगाच्या दु:खाशीही- सर्वाधिक संबंध ‘डिअर पॅरिस’ या दीड तासांच्या चित्रपटात दिसतो. पॅरिसमधल्या सहा-सात माणसांच्या या भिन्न भिन्न गोष्टी, पण मृत्यू हे त्यांना जोडणारे सूत्र आहे. ही माणसे दु:ख विसरतात, ती ‘पॅरिसच्याच आधाराने!’
हा आधार मार्जाने सत्रपिला पॅरिसने नाकारला का, याची चर्चा यापुढेही होत राहील.
