उदयोन्मुख बाजारपेठांमधील गुंतवणुकीचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ गुंतवणूकदार मार्क मोबियस यांचे १६ एप्रिल रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. टेम्पलटन इमर्जिंग मार्केट्स समूहाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांनी ३० वर्षांहून अधिक काळ जबाबदारी पार पाडली होती. ३५ वर्षांपूर्वी भारताची अर्थव्यवस्था परकीय गुंतवणूकदारांसाठी खुली केल्यावर उदयोन्मुख बाजारपेठांपैकी भारतातील गुंतवणूक संधी ओळखणारे ते एक प्रमुख गुंतवणूकदार होते. त्यानंतर भारतातील परकीय गुंतवणूकदारांपैकी टेम्पलटन इमर्जिंग मार्केट्स ही प्रमुख परकीय अर्थसंस्था बनली आणि मार्क मोबियस हे परकीय गुंतवणूकदारांचा सार्वजनिक चेहरा बनले.
पाश्चात्त्य गुंतवणूकदारांसाठी अपरिचित अर्थव्यवस्थांत गुंतवणूक करण्याचे त्यांचे कसब जगमान्य होते. म्हणूनच मोबियस यांना अनेकदा ‘उदयोन्मुख बाजारपेठांचे इंडियाना जोन्स’ असे बिरूद लावले जात असे. गुंतवणूकदारांना सुरक्षितताच हवी असते, पण मोबियस यांनी काही ‘असुरक्षित’ मानल्या जाणार्या देशांमध्येही जम कसा बसवता येईल याचा प्रयत्न केला. त्यासाठी मोबियस यांनी नवनव्या संधींच्या शोधात चार दशकांहून अधिक काळ जगभर प्रवास केला. गुंतवणुकीचा निर्णय केवळ ताळेबंदापुरता सीमित न ठेवता, प्रत्यक्ष बाजारपेठेशी संबंधित संशोधनावर त्यांचा भर होता. अनेक भारतीय कारखाने, कार्यालये, धोरणकर्ते, नोकरशाह आणि स्थानिक व्यवसायांना त्यांनी गुंतवणूक करण्यापूर्वी दिलेल्या भेटींमुळे त्यांच्या निर्णयांना आकार मिळत असे. ते उदयोन्मुख बाजारपेठेत गुंतवणूक करताना ते त्या देशातील राजकीय आणि स्थानिक चलनविषयक जोखमींबद्दल सावध होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतासहित आशिया, लॅटिन अमेरिका वा आफ्रिकेतील काही विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये अमेरिकेचे अब्जावधी डॉलर्स गुंतवले गेले, ज्यामुळे जागतिक पोर्टफोलिओ धोरणांना नवीन आकार मिळाला आणि उदयोन्मुख बाजारपेठा हा अमेरिकेत एक प्रमुख मालमत्ता वर्ग म्हणून नव्वदच्या दशकात उदयास आला.मोबियस टेम्पलटनमधून सेवानिवृत्त झाल्यावर देखील उत्तर आयुष्यातही गुंतवणूक तत्त्वज्ञान प्रसाराबाबत सक्रिय राहिले आणि त्यांनी उदयोन्मुख बाजारपेठांमधील संधींवर प्रकाश टाकणे सुरू ठेवले. अगदी अलीकडे जानेवारीमध्ये, त्यांनी राजकीय बदल झाल्यास व्हेनेझुएलामध्ये पुन्हा व्यवहार सुरू होण्याच्या संभाव्य शक्यतांकडे लक्ष वेधले होते.
गुंतवणुकीपलीकडे, मोबियस यांनी ‘द लिटल बुक ऑफ इमर्जिंग मार्केट्स’ यासह अनेक वाचकमान्य पुस्तके लिहिली, ज्यात त्यांनी बाजारपेठा समजून घेण्यासाठी लोकांना आणि स्थानिक परिस्थितीला समजून घेणे महत्त्वाचे आहे हे अधोरेखित केले.न्यूयॉर्कमध्ये प्युर्टो रिकन आणि जर्मन पालकांच्या पोटी जन्मलेल्या मार्क मोबियस यांनी १९६४ मध्ये मॅसॅच्युसेट्स इ्स्टिटट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अर्थशास्त्रात पीएच.डी. मिळवली. वित्त क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी ललित कला, अध्यापन आणि विपणन यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये अर्थार्जनासाठी काम केले. त्यांनी जागतिक गुंतवणुकीचा एक वारसा मागे ठेवला आहे.
